(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक अनुभूती व साक्षात्कार या गोष्टींची त्यास मदत होते का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे; त्याला श्रीमाताजींनी दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग…)

आपल्यामध्ये परिवर्तन घडावे ही प्रामाणिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल तर तिला आंतरिक अनुभूती व साक्षात्कार यापासून खूप साहाय्य मिळते; कारण त्यातून व्यक्तीला परिवर्तनासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि परिवर्तनासाठी आवश्यक असणारा आधार मिळतो. मात्र परिवर्तन घडावे अशी खरी प्रामाणिक इच्छा त्या व्यक्तीकडे असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 349)

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता न बाळगणे.

स्वतःची चूक ओळखण्याची (आणि ती मान्य करण्याची) इच्छा नसणे आणि अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे असे श्रीमाताजींनी सांगूनदेखील, त्यांच्याशी प्रतिवाद करत, मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे म्हणजे स्व-समर्थन (Self-justification) करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 54)

नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा‌’ प्रत्यक्षात तसे ‘असणे‌’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा‌’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्‌‍-तत्त्व‌च (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 268)

साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?

श्रीमाताजी : वास्तविक मी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे, पण त्याबद्दल पुनश्च एकदा सांगण्याची ही संधी आहे. तो गुण आहे प्रामाणिकपणा (sincerity). हा प्रामाणिकपणा निरपेक्ष आणि परिपूर्ण असला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हेच अध्यात्म-मार्गावरील तुमचे एकमेव संरक्षण असते.

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर अगदी पुढच्याच पावलावर तुम्ही पडणार व तुमचा कपाळमोक्ष होणार हे निश्चित. आपल्या सभोवार सर्व प्रकारच्या शक्ती, इच्छा, प्रभाव, जीव वावरत असतात आणि तुमच्या प्रामाणिकपणामध्ये एखादी तरी लहानशी फट आढळते का, याच्या ते शोधातच असतात आणि तशी फट दिसताच तिच्यामधून ते झपाट्याने तुमच्यामध्ये शिरकाव करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात.

म्हणून, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करून पाहताना सर्वप्रथम याची खात्री करून घ्या की, तुम्ही प्रामाणिक आहात ना? आणि एवढेच नव्हे तर, अधिकाधिक प्रामाणिक बनण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ना? (तुम्हाला स्वत:बद्दल ही खात्री पटणे आवश्यक आहे.) कारण प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 247-248)

आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते. पूर्णयोगाच्या साधकाकडे जे गुण अत्यावश्यक असतात त्यापैकी एक गुण म्हणजे प्रामाणिकपणा (sincerity).

आपण व्यवहारात वावरत असताना ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो तो प्रामाणिकपणा आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी ज्याचे प्रतिपादन करतात, तो प्रामाणिकपणा; या दोन्हीमध्ये काही साम्य-भेद आहेत का, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.

साधनेच्या संदर्भात तर या प्रामाणिकपणाचे मोल अधिकच उजळलेले दिसते. कारण आपण आपली साधना किती प्रामाणिकपणाने करत आहोत यावर साधनेची यशस्विता अवलंबून असते. तेव्हा श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना अभिप्रेत असणारा प्रामाणिकपणा म्हणजे नेमके काय, तो अंगी कसा बाणवता येतो, यासंबंधीचा विचार येथे केला आहे. प्रामाणिकपणाचे साधनेतील स्थान किती महत्त्वाचे आहे, तसेच अप्रामाणिकपणाचे निर्मूलन कसे करावे या मुद्द्यांचाही विचार आपण करणार आहोत.

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘प्रामाणिकपणा‌’ या मालिकेचे आपण नेहमीप्रमाणेच स्वागत कराल अशी आशा आहे.

– संपादक,
अभीप्सा मराठी मासिक

‘प्रामाणिकपणा’चा अर्थ

‘प्रामाणिकपणा’मध्ये नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ‘ईश्वरा’चे साधन बनण्याची आणि ‘ईश्वरा’शी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यातील ‘प्रामाणिकपणा’चा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने ‘अभीप्सा’ बाळगत असतो व ‘ईश्वरा’व्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 50]

प्रामाणिकपणा – ४७

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे बक्षिस अनुस्यूत असते. शुद्धीकरणाची भावना, ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे, व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे मिळालेली मुक्ती, या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे बक्षिस असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकता ही एक रूपांतरकारी शक्ती असते.
– श्रीमाताजी [CWM 08 : 400]

प्रामाणिकपणा – ४६

एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असल्या किंवा कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी ते दरवाजे कधीच बंद नसतात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हाकधी त्या आवरणाचा भेद करते तेव्हा, आत्म्याच्या उत्तुंगतेकडे जाताना ते तत्त्व, त्या दोन्ही आवरणांचे दहन करू शकते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

प्रामाणिकपणा – ४५

तुम्हाला घरी राहून आणि कार्यमग्न असतानादेखील साधना करणे शक्य आहे. त्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट आवश्यक असते की, जितके जमेल तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे, शक्य असेल तेवढा, त्या ‘दिव्य माता’ आहेत असा विचार करून, दररोज एका ठरावीक वेळी हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करा, त्या तुमच्यामध्येच आहेत अशी जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून अभीप्सा बाळगा. तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करा आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे आणि तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्याकडे प्रार्थना करा. ही प्राथमिक पायरी आहे पण बहुतेक वेळा या पायरीवरच बराच वेळ द्यावा लागतो. परंतु जर का एखादी व्यक्ती यातून प्रामाणिकपणे आणि चिकाटीने पार झाली तर, हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, जिच्याद्वारे साधकाला अंतरंगामधून ‘श्रीमाताजीं’च्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते; प्रकृतीमधील, जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला, साक्षात्काराच्या दिशेने द्वारे खुली करणाऱ्या इतर कोणत्यातरी आध्यात्मिक अनुभूतीची जाणीव होऊ लागते.

– श्रीमाताजी
[CWSA 32 : 186]