आध्यात्मिकता ४०

(पूर्वार्ध)

जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण, किंवा काही मिनिटे, किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. आणि तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाहीतर त्या गोष्टी शोधून काढता. ही अगदी सार्वत्रिक बाब आहे. लहानमोठे सारेच जण, कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा त्यांचा मार्ग म्हणजे मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा असतो.

पण, कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा, त्यापेक्षा एक अधिक चांगला मार्ग आहे, तो म्हणजे स्मरण ठेवणे. तुमच्याजवळ जेव्हा थोडासा रिकामा वेळ असतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे प्रयोजन जगण्यासाठी, ‘सत्य’ आणि ‘शाश्वता’प्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे.”

तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर अशा गोष्टी केल्यात तर, तुम्ही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. तुमचा वेळ वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये, तुमची चेतना ज्यामुळे निम्नतर पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये घालविण्यापेक्षा; तसेच तुम्हाला चंचल, विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम.

– श्रीमाताजी [CWM 03 : 250]

आध्यात्मिकता ३९ (उत्तरार्ध)

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असा – अभ्यास असो, खेळ असो, कोणतेही काम असो – कोणत्याही गोष्टीसाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रतेची शक्ती वाढविणे. आणि जेव्हा तुम्ही अशी एकाग्रता साध्य करता, तेव्हा मग ती एकाग्रता तुम्हाला थकवणारी नसते. साहजिकच आहे की, सुरुवाती-सुरुवातीला त्यामुळे काहीसा ताण निर्माण होतो पण तुम्हाला एकाग्रतेचा अवलंब करण्याची सवय झाली की तो ताण नाहीसा होतो आणि मग एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्ही अशा रीतीने एकाग्र नसता, जेव्हा तुम्ही विखुरलेले असता, अनेकानेक गोष्टींनी तुम्हाला गिळंकृत केले तरी चालेल अशी मुभा जेव्हा तुम्ही त्यांना देता, म्हणजेच तुम्ही जे करत आहात त्याकडेच तुम्ही लक्ष एकाग्र केलेले नसते, तेव्हाच तुम्हाला थकवा येतो.

एकाग्रताशक्तीमुळे व्यक्ती कोणत्याही गोष्टी अधिक चांगल्या रीतीने आणि अधिक वेगाने करण्यामध्ये यशस्वी होते. आणि अशा प्रकारे, तुम्ही विकसनाचे एक साधन म्हणून दैनंदिन कामाचा उपयोग करू शकता…

(उत्तरार्ध समाप्त)

श्रीमाताजी [CWM 04 : 138]

आध्यात्मिकता ३८

(पूर्वार्ध)

 

साधक : आम्ही जेव्हा एखादे काम करत असतो आणि ते काम आम्ही सर्वोत्तम करू इच्छित असतो, तेव्हा ते करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ आवश्यक असतो. पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपण घाईत असतो. मग घाईगडबडीत असतानादेखील सर्वोत्तमप्रकारे काम कसे करावे ?

श्रीमाताजी : हा अतिशय रोचक विषय आहे आणि एक ना एक दिवस मला तुमच्याशी या विषयाबाबतीत सविस्तर बोलायचेच होते. सहसा, माणसं जेव्हा घाईगडबडीत असतात तेव्हा, जे काम करायचे असते ते काम, ते पूर्णपणे करत नाहीत; अथवा, त्यांनी जर ते काम केलेच तर ते काम अगदी वाईट पद्धतीने करतात. खरंतर आणखीही एक मार्ग असतो, तो मार्ग म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रता अधिक तीव्र करायची. तुम्ही जर एकाग्रता वाढवलीत तर, तुम्ही निम्मा वेळ वाचविलेला असतो, तोही अगदी कमीत कमी वेळामध्ये! एक अगदी साधे उदाहरण घ्या. स्नान करून, कपडे घालून तयार व्हायला लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असतो, नाही का? पण असे गृहीत धरूया की, वेळेचा अपव्यय न करता, किंवा अजिबात घाईगडबड न करता, व्यक्तीला या साऱ्या गोष्टी करण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्धा तास लागतो. तुम्ही जर गडबडीत असाल तर दोनपैकी एक गोष्ट हमखास घडते – एकतर तुम्ही स्नान नीट करत नाही किंवा मग तुम्ही कपडे वगैरे नीट आवरत नाही.

पण अन्यही एक मार्ग असतो – व्यक्तीने आपले अवधान आणि आपली सर्व ऊर्जा एकवटली पाहिजे. आपण जे काही करत आहोत फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा, अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, घाईघाईने खूप हालचाली करायच्या नाहीत, अचूक तेवढ्याच गोष्टी अगदी अचूक रीतीने करायच्या, (हा अनुभवाचा भाग आहे.) त्यामुळे तुम्हाला पूर्वी जी गोष्ट करायला अर्धा तास लागत होता तीच गोष्ट आता तुम्ही पंधरा मिनिटांमध्ये करू शकता आणि ती सुद्धा अगदी उत्तम रीतीने, कधीकधी तर अधिक चांगल्या रीतीने तुम्ही ती करता, कोणतीही गोष्ट न विसरता, करायचे काहीही शिल्लक न ठेवता, केवळ एकाग्रतेच्या तीव्रतेमुळे तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता.

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 137-138]

आध्यात्मिकता ३७

(श्रीमाताजींकृत प्रार्थना…)

बाह्य जीवन, दररोजची प्रत्येक कृती आणि प्रत्येक घटना, ही आपल्या तास न् तास केलेल्या चिंतनासाठी आणि ध्यानासाठी अनिवार्यपणे पूरकच नसते का?

…आपले दैनंदिन जीवन ही एक प्रकारची ऐरण आहे; आणि चिंतनामधून जी प्रदीप्तता येते ती स्वीकारण्यासाठी आणि धारण करण्यासाठी दैनंदिन जीवनातील सर्व घटनांचे शुद्धीकरण व्हावे, त्या परिशुद्ध व्हाव्यात, त्या अधिक लवचीक आणि परिपक्व व्हाव्यात, म्हणून या घटना त्या ऐरणीवरून सरकणेच आवश्यक असते. समग्र विकसनासाठी बाह्य कृती अनावश्यक ठरत नाही तोपर्यंत हे सर्व घटक एकापाठोपाठ एक मुशीमधून गेलेच पाहिजेत. नंतर, पात्र घडविणे आणि ते प्रकाशित करणे या दुहेरी कार्यासाठी चेतनेची इतर केंद्रसुद्धा जागृत व्हावीत म्हणून, हे ईश्वरा, या कृती तुला आविष्कृत करण्याची माध्यमं बनतात. आणि त्यामुळेच आत्मप्रौढी आणि आत्मसंतुष्टता या गोष्टी सर्व अडथळ्यांमधील सर्वाधिक वाईट असा अडथळा असतात.

अगणित घटकांपैकी काही घटकांचे तरी शुद्धीकरण करण्यासाठी आणि तिंबून, मळून त्यांना घडणयोग्य बनविण्यासाठी, त्यांना निर्व्यक्तिक बनविण्यासाठी, त्यांना ‘स्व’चे विस्मरण आणि परित्याग करण्यास शिकविण्यासाठी आणि भक्ती, उदारता आणि हळूवारपणा शिकविण्यासाठी, आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या छोट्याछोट्या सर्व संधींचा आपण अतिशय विनम्रपणे लाभ घेतला पाहिजे. आणि अस्तित्वाच्या या सर्व पद्धती जेव्हा त्यांच्या अंगवळणी पडतील, तेव्हा ते सारे घटक या ‘निदिध्यासा’मध्ये सहभागी होण्यासाठी, परम ‘एकाग्रते’मध्ये तुझ्याबरोबर एकात्म पावण्यासाठी सिद्ध झालेले असतील.

आणि म्हणूनच मला असे वाटते की, आकस्मिकपणे झालेला बदल हा सर्वांगीण नसतो आणि म्हणूनच हे कार्य अगदी उत्तमात उत्तम साधकांसाठीसुद्धा दीर्घकालीन आणि धीम्या गतीने होणेच आवश्यक असते. आकस्मिक बदल हे व्यक्तीचा दृष्टिकोन बदलवून टाकतात, ते बदल व्यक्तीला निश्चितपणे सुयोग्य मार्गावर आणतात; परंतु खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व प्रकारच्या आणि सर्व घटकांच्या अगणित अनुभवांची आवश्यकता असते, त्यापासून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही.

…माझ्यामध्ये आणि प्रत्येक वस्तुमात्रामध्ये तेजोमयतेने प्रभासित होणाऱ्या हे ‘परम प्रभू’, तुझा ‘दिव्य प्रकाश’ आविष्कृत होऊ दे आणि तुझ्या ‘दिव्य शांती’चे साम्राज्य सर्वांवर पसरू दे. – श्रीमाताजी [CWM 01 : 06-07]

आध्यात्मिकता ३६

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य-चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे. सत्य-चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे केवळ एक साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

*

(बडोदा येथील वास्तव्यामध्ये महाराष्ट्रातील योगी विष्णु भास्कर लेले यांनी श्री. अरविंद घोष यांना मन कसे निःस्तब्ध करावे यासंबंधी मार्गदर्शन केले होते. आणि तीन दिवसांच्या साधनेने श्री. अरविंद घोष ‘शांत-ब्रह्मा’च्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचले होते. पुढे त्याच अवस्थेमध्ये ते लेले यांच्यासमवेत (इ. स. १९०८ मध्ये) मुंबई येथे राजकीय दौऱ्यावर गेले होते. लेले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उपस्थित जनसमुदायाला ईश्वर समजून अभिवादन केले आणि भाषणास सुरूवात केली होती. या सर्व अनुभवमालिकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या, आपल्या साधनेबाबत श्रीअरविंद १९३८ साली सांगत आहेत…)

कलकत्त्याला जाण्यासाठी मी मुंबईहून निघालो होतो, तेव्हा मी लेले यांना विचारले की, “मी माझ्या साधनेबाबत काय केले पाहिजे?”

ते काही काळ शांत राहिले, कदाचित त्यांच्या अंतरंगातून येणाऱ्या आवाजाची ते प्रतीक्षा करत असावेत. आणि मग त्यांनी उत्तर दिले, “दिवसातील एका ठरावीक वेळी ध्यान करत जा आणि अंतःकरणातून येणारा आतला आवाज ऐकत जा.”

मला अंतःकरणातून कोणताही आवाज ऐकू आला नाही पण मस्तकाच्या वरच्या बाजूने एक काहीसा निराळा असा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मी एका ठरावीक वेळी ध्यान करणे सोडून दिले – कारण माझे ध्यान सदासर्वकाळ चालू असे.

(Talks with Sri Aurobindo – Vol 01 by Nirodbaran : 03)

आध्यात्मिकता ३५

एक अशा प्रकारचे ध्यान असते, ज्या ध्यानामध्ये व्यक्ती कोणत्याही विचारांना थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, पण शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण जे विचार निव्वळ यांत्रिक स्वरूपाचे असतात, ते तुम्ही थांबविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील, आणि तरीसुद्धा तुम्हाला परिणामाची खात्री देता येणार नाही. म्हणून विचार थांबविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, (अशा प्रकारच्या ध्यानामध्ये) तुम्ही तुमची सर्व चेतना एकवटून, शक्य तितके शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बाह्य गोष्टींमध्ये आता स्वारस्य उरलेले नसल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त करा, आणि मग अचानक, तुमच्या अभीप्सेची ज्योत प्रज्वलित होईल. तुमच्यापाशी जे जे काही येते ते ते सारे तुम्ही या अभीप्सारूपी अग्नीमध्ये हवन करा, ज्यामुळे ती ज्वाला अधिकाधिक उच्च, उच्चतर होत जाईल. तुम्ही त्या अभीप्सारूपी ज्वालेशी एकात्म व्हा आणि उर्ध्वगामी होत, तुम्ही तुमच्या चेतनेच्या आणि अभीप्सेच्या सर्वोच्च बिंदुपाशी जाऊन पोहोचा. अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. ही अभीप्सा वर वर उसळत राहते, ऊर्ध्वगामी होत राहते, ती किंचितदेखील परिणामाचा विचार करत नाही, परिणाम काय होईल किंवा विशेषतः काय होणार नाही याचा क्षणमात्रदेखील ती विचार करत नाही, एवढेच नव्हे तर, वरून काही अवतरित व्हावे अशी इच्छादेखील ती बाळगत नाही तर इथे केवळ, ऊर्ध्वगामी होत राहणाऱ्या अभीप्सेचा आनंद तेवढा असतो. सातत्याने केलेल्या एकाग्रतेमुळे ती अभीप्सा अधिकाधिक उत्कट होत राहते. आणि अशा वेळी मी तुम्हाला खात्री देऊ शकते की जे काही घडेल ते, सर्वोत्तम शक्य असेल तेच घडेल. म्हणजे असे की, तुम्ही जेव्हा हे सारे करता तेव्हा, तुमच्या क्षमता साकार होण्याची ती परम सीमा असते. या क्षमता प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असू शकतात.

पण तुम्ही असे केलेत तर, शांत राहण्याचा प्रयत्न, दृश्य रूपांच्या मागे जाण्याचा प्रयास, प्रतिसाद देणाऱ्या शक्तीला आवाहन, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून खोळंबून राहणे, या साऱ्या गोष्टींबाबतच्या चिंता, अ-वास्तव असणाऱ्या एखाद्या वाफेप्रमाणे नाहीशा होऊन जातात. तुम्ही या अभीप्सारूपी ज्वालेमध्ये, या ऊर्ध्वगामी झालेल्या अभीप्सेच्या स्तंभामध्ये, जाणीवपूर्वक जीवन जगण्यात जर यशस्वी झालात तर याचा परिणाम अगदी त्वरित जरी आढळून आला नाही तरी, कालांतराने काहीतरी नक्कीच घडून येणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 104-105]

आध्यात्मिकता ३४

एका कोपऱ्यात बसून ध्यान करण्याची क्षमता असणे ही आध्यात्मिक जीवनाची खूण आहे, असे काही जणांना वाटते. ही अगदी सार्वत्रिक कल्पना आहे. मला टिका करायची नाहीये पण, जे लोक त्यांच्या ध्यान करण्याच्या क्षमतेचे मोठे अवडंबर माजवतात त्यांच्यापैकी बहुतांश जण, एक तासाच्या ध्यानाच्या बैठकीमध्ये एक मिनिटसुद्धा खऱ्या अर्थाने ध्यानस्थ होत नाहीत. जे खऱ्या अर्थाने ध्यान करत असतात ते त्याची कधीही वाच्यता करत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ती अगदी स्वाभाविक गोष्ट असते. तुम्हाला जेव्हा ध्यानाची मातब्बरी वाटत नाही आणि तुमच्यासाठी ती एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट होते, तेव्हा तुम्ही प्रगती करत आहात, असे तुम्ही म्हणू शकता. जे लोक ध्यानाविषयी बोलत राहतात आणि ध्यान करतात म्हणून इतरांपेक्षा स्वतःला अधिक श्रेष्ठ समजू लागतात, तेव्हा तुम्ही निश्चित समजा की, ते बहुतांश वेळा पूर्णपणे जडतेच्या स्थितीमध्ये असतात.

ध्यान करणे अतिशय कठीण असते. ध्यानाचे अनेक प्रकार असतात… तुम्ही एक कल्पना करू शकता आणि त्या कल्पनेचा मागोवा घेतघेत एका निष्कर्षाप्रत येऊन पोहोचता, हे ‘सक्रिय ध्यान’ असते; ज्यांना एखादी समस्या सोडवायची असते किंवा ज्यांना काही लिखाण करायचे असते, तेव्हा त्यांच्या नकळतपणे ते अशा प्रकारचे ध्यान करत असतात. काहीजण ध्यानाला बसतात आणि एखाद्या कल्पनेचा मागोवा घेण्याऐवजी ते कोणत्यातरी एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करतात — स्वतःची एकाग्रताशक्ती अधिक तीव्र करण्यासाठी एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिंदूवर लक्ष एकाग्र करता तेव्हा सहसा पुढील गोष्टी घडून येतात : एखाद्या बिंदूवर, मग तो बिंदू मानसिक असो, प्राणिक असो किंवा भौतिक असो, जर तुम्ही तुमची एकाग्रतेची क्षमता पुरेशी एकवटण्यामध्ये यशस्वी झालात तर, तुम्ही एका विशिष्ट क्षणी त्या बिंदुतून आरपार जाता आणि एका वेगळ्या चेतनेमध्ये प्रवेश करता. आणि इतर जण मात्र त्यांच्या डोक्यातून सर्व मानसिक आंदोलने, कल्पना, प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया हटविण्यासाठी व एका खरोखर शांत प्रशांत स्थितीप्रत पोहोचण्यासाठी धडपडत असतात. हे अतिशय कठीण असते; अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी पंचवीस-पंचवीस वर्षे प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही, कारण असे करू पाहणे म्हणजे बैलाची शिंगे पकडून त्याच्या आधारे बैलाला पकडण्यासारखे आहे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 103-104]

आध्यात्मिकता ३३

आपण वाचन करतो, आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, आपण स्पष्टीकरण करतो, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हजारो स्पष्टीकरणांपेक्षा आणि लाखो शब्दांपेक्षा, खऱ्या अनुभवाचा एक क्षणदेखील आपल्याला बरेच काही शिकवून जातो. त्यामुळे पहिला प्रश्न येतो तो असा की, ”हा अनुभव घ्यायचा कसा?”

स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रवेश करणे ही पहिली पायरी आहे.

तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या सद्वस्तुची (reality) जाणीव होण्याइतपत, तुमच्या अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर जाण्यात एकदा का तुम्ही यशस्वी झालात की मग, तुम्ही स्वतःला क्रमाक्रमाने, पद्धतशीरपणे व्यापक करायचे आणि या ब्रह्मांडाएवढे विशाल व्हायचे आणि स्वतःच्या सीमिततेची जाणीव दूर करायची.

पूर्वतयारी करून घेणाऱ्या या पहिल्या दोन प्रक्रिया आहेत. आणि या दोन्ही गोष्टी शक्य तितक्या जास्तीत जास्त स्थिरपणे, शांतपणे आणि प्रशांततेमध्ये केल्या पाहिजेत. ही शांती, ही प्रशांतता, मनामध्ये नीरवता आणि प्राणामध्ये स्थिरपणा निर्माण करते. हा प्रयत्न, हा प्रयास अगदी नियमितपणे, चिकाटीने पुन्हा पुन्हा नव्याने करत राहिला पाहिजे. आणि मग काही विशिष्ट कालावधीनंतर, (हा कालावधी कमी किंवा जास्त असू शकतो) तुम्हाला अशा एका वास्तविकतेची (त्या सद्वस्तुची) जाणीव होऊ लागते की जी वास्तविकता, सर्वसामान्य, बाह्य चेतनेला वास्तवाचा जो बोध होतो त्यापेक्षा निराळी असते.

स्वाभाविकपणे, बाह्य चेतना आणि आंतरिक चेतना यांमधील पडदा अंतरंगामधूनच ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीमुळे अचानक दूर केला जाऊ शकतो आणि तुमचा एकाएकी खऱ्या सत्यामध्ये प्रवेश होऊ शकतो. पण असे घडून आले तरीसुद्धा, या अनुभूतीचे संपूर्ण मूल्य आणि संपूर्ण परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी, तुम्ही स्वतःला कायम आंतरिक ग्रहणशीलतेच्या (inner receptivity) स्थितीमध्ये ठेवले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही दररोज अंतरंगामध्ये प्रवेश करणे आवश्यकच असते.

– श्रीमाताजी [CWM 10 : 19-20]

आध्यात्मिकता ३२

‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे, आध्यात्मिकता म्हणजे काय नाही आणि खरी आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजावून घेतले. आध्यात्मिकतेविषयीची पारंपरिक समजूत आणि त्याची ‘पूर्णयोगा’वर आधारित संकल्पना यामधील फरकही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या आध्यात्मिक पुरूषाचा (spiritual being) शोध घेणे हे मनुष्याचे केवळ कर्तव्यकर्म आहे असे नव्हे तर, ते त्याचे जीवितकार्य आहे, हेही आपण समजावून घेतले. खऱ्या आध्यात्मिकतेची कसोटी म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण (Reversal of consciousness) हेही आपण जाणून घेतले.

आता प्रश्न निर्माण होतो की, आध्यात्मिक पुरुषाचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी ध्यानधारणा करायची? की अन्य काही करायचे? का मन एकाग्र करायचे? दैनंदिन व्यावहारिक जीवनाच्या धकाधकीमध्ये, त्यातील भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे सामान्य माणसाच्या जिवाला स्वस्थता नसते, मग अशा धकाधकीच्या जीवनात अध्यात्म करायचे तरी कसे? दैनंदिन व्यवहार न सोडता, भौतिक जीवनापासून पलायन न करता, आहे त्याच जीवनाला ‘दिव्यत्वा’चे वळण कसे द्यायचे? त्यासाठी नेमके काय करायला हवे ? यासारखे अनेकानेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाले असतील. हे व अशाच प्रकारचे प्रश्न त्यावेळच्या साधकांच्या मनातही निर्माण झाले होते; त्यांनी ते प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारले होते, आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यातील काही निवडक प्रश्नोत्तरे, काही पत्रे, काही लिखाण, संवाद यांच्या माध्यमातून आपण उद्यापासून त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘पूर्णयोगा’च्या साधनेचे – अंतरंग साधना आणि बहिरंग साधना असे दोन प्रकार आहेत. चेतना अंतर्मुख करून चैत्य पुरुषाचा (Psychic being) शोध आणि चेतना ऊर्ध्वमुख करून आत्मतत्त्वाचा (Soul) शोध घेणे; चेतना विशाल करत करत, ती विश्वात्मक करत नेणे या सर्व गोष्टींचा समावेश अंतरंग साधनेमध्ये होतो; तर अंतरंग साधनेमधून प्राप्त झालेल्या शांती, स्थिरता, प्रकाश, प्रेम, समता यांसारख्या गोष्टी दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्षात आचरणात आणणे यांचा समावेश बहिरंग साधनेमध्ये होतो. या दोन्ही साधनापद्धतींसंबंधी काही मार्गदर्शन येथे मिळेल आणि अध्यात्म मार्गावर पहिलीवहिली पावले टाकण्यासाठी ही शिदोरी आपणा सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आध्यात्मिकता ३१

(भाग ०३)

व्यक्ती जोपर्यंत मानसिक चेतनेमध्ये जीवन जगत असते, – भलेही ते जीवन कितीही उच्च स्तरावरील असले तरी, जेव्हा ती बाहेरून आध्यात्मिक जीवनाकडे पाहते तेव्हा व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्षमतांनुसार त्या जीवनाचे परीक्षण करते, शोधार्थ धडपडायचे, चुका करायच्या, त्या दुरूस्त करायच्या, थोडेसे प्रगत व्हायचे आणि पुन्हा शोधासाठी धडपडायचे या सवयीनुसार ती त्या जीवनाचे परीक्षण करू पाहते. ती व्यक्ती असा विचार करते की आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही अशाच अक्षमतांचा त्रास सहन करावा लागतो पण असा विचार करणे ही एक घोडचूक आहे, असे म्हणावे लागेल.

जेव्हा व्यक्तीमध्ये चेतनेचे प्रतिक्रमण घडून येते तेव्हा या साऱ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या असतात. आता व्यक्ती शोधासाठी धडपडत नाही, तिला गोष्टी ‘दिसतात’. आता व्यक्ती तर्क करत नाही, अनुमाने काढत नाही, तर तिला गोष्टी ‘ज्ञात’ असतात. आता व्यक्ती चाचपडत बसत नाही, तर ती ‘ध्येयाच्या दिशेने सरळ चालत’ जाते. आणि व्यक्ती जेव्हा अशी पुढे जाते अगदी थोडीशी जरी पुढे गेली तरी व्यक्तीला परम सत्य उमगते, जाणवते, व्यक्ती ते ‘परम सत्य’ जगते; ते परम सत्य हे असते की, एकमेव ‘परमोच्च सत्य’च कार्यरत असते, ‘परम ईश्वर’च मानवी जिवांच्या माध्यमातून संकल्प करतो, तोच जाणतो आणि तोच कार्य करतो. अशावेळी मग त्रुटी राहण्याची शक्यताच कशी असू शकेल? तो जे करतो, ते तो करतो कारण तसे करण्याची ‘त्याची’ इच्छा असते.

आपल्या सदोष दृष्टीला या कृती कदाचित अनाकलनीय असतात पण त्यांना काही अर्थ असतो, त्यांचे काही उद्दिष्ट असते आणि त्या ज्या दिशेने जाणे आवश्यक असते तेथेच त्या नेल्या जातात. व्यक्तीला जर इतरांना आणि या जगाला मदत करण्याची खरी प्रामाणिक इच्छा असेल तर, व्यक्ती त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी करू शकते की, इतरांनी जसे असावे असे व्यक्तीला वाटते तसे तिने स्वतः बनले पाहिजे – केवळ उदाहरण म्हणून नाही, परंतु, असे केल्याने, व्यक्ती तेजस्वी शक्तीचे एक केंद्र बनू शकते, आणि तिच्या तशा रितीने अस्तित्वात असण्यामुळेच, उर्वरित जगाला ती रूपांतर घडविण्यासाठी भाग पाडू शकते.

( ….समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 09 : 415-416]