(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला.)

मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले गेले नाही किंवा त्यांच्या उत्साहाला मुरड घातली गेली तर, त्यांची जाणीव एका (नकारात्मक) सवयीमध्ये बदलते आणि जरा कोठे काही चांगले झालेले दिसले की, अशा मुलांच्या मनात लगेच असा विचार येतो की, “हं! हे काही फार दिवस टिकणार नाही.” जेव्हा एखादा माणूस दयाळू आहे असे त्याला दिसते तेव्हा, त्याच्या मनात लगेच असा विचार येतो की, “या माणसाचा दयाळूपणा फार काळ टिकणार नाही; तो लवकरच बदलेल.” स्वत:ला एखादी गोष्ट करायला जमते आहे असे जेव्हा त्या मुलाला आढळते तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो की, “ठीक आहे, (आज मला ही गोष्ट चांगल्या रितीने करता आली) पण उद्या मला हीच गोष्ट इतक्या चांगल्या रितीने करता येईलच असे काही सांगता येणार नाही.” आणि अशी वृत्ती एखाद्या ॲसिडप्रमाणे काम करते; म्हणजे भावी काळातील संभाव्यतांबद्दलची आशा, विश्वास, खात्री उद्ध्वस्त करणाऱ्या एखाद्या विघातक ॲसिडप्रमाणे ती काम करते.

जेव्हा एखादे मूल अतिशय उत्साहात असते तेव्हा त्याच्या उत्साहाला कधीही मुरड घालू नका. “हे बघ बाळा, जीवन असे नसते,” असे त्याला कधीही सांगू नका. तुम्ही त्याला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि असे सांगितले पाहिजे की, “आज ज्या (वाईट) गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी नेहमी तशाच राहणे, हे काही आवश्यक नाही. आज त्या दिसताना कुरूप दिसत असतील; पण वास्तविक त्याच्या पाठीमागे एक सौंदर्य दडलेले आहे आणि ते अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे (हे तू लक्षात घेतले पाहिजेस.) तू त्या सौंदर्यावर प्रेम केले पाहिजेस. तुझ्या स्वप्नांचे, तुझ्या आशाआकांक्षांचे ते उद्दिष्ट असले पाहिजे.”

आणि लहानपणीच जर असा (सकारात्मक) विचार मुले करू शकली तर मग पुढे जाऊन, त्यांना फार अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. अन्यथा त्यांना लागलेल्या चुकीच्या वळणाचे दुष्परिणाम त्यांना आधी नाहीसे करावे लागतात; वर सांगितली ती कंटाळवाणी आणि ग्राम्य सामान्य जाणीव त्यांना आधी नाहीशी करावी लागते. सामान्य जाणीव की जी, जीवनापासून कोणत्याच चांगल्या गोष्टींची अपेक्षा बाळगत नाही; जी जीवनाला रटाळ, कंटाळवाणे बनविते आणि सर्व आशाआकांक्षांच्या आणि सौंदर्याच्या तथाकथित भ्रमांच्या विरोधात जाते अशा सामान्य जाणिवेपासून त्याला स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. (क्रमश:)

• श्रीमाताजी (CWM 09 : 163)

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो अशा मुलाच्या स्वप्नांमध्ये नेहमीच एक प्रकारची अभीप्सा असते. ती त्या मुलाच्या चेतनेच्या दृष्टीने एक प्रकारची आकांक्षा असते. म्हणजे सौंदर्याला कुरुपतेचा कलंक नसावा, अन्यायविरहित न्याय असावा, अमर्याद चांगुलपणा असावा आणि एक सचेत, सातत्यपूर्ण यश मिळावे, एक निरंतर चमत्कार घडावा असे त्याला वाटत असते. काहीतरी चमत्कार घडावेत अशी स्वप्नं ते पाहत असते. जगातील सर्व दुष्टपणा नाहीसा होऊन जावा आणि प्रत्येक गोष्ट नेहमी तेजोमय, सुंदर, आनंदी असावी असे त्याला वाटत असते. आणि म्हणूनच ज्या गोष्टींचा शेवट गोड होतो अशा गोष्टी मुलांना आवडतात. व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

जेव्हा शरीराला वेदनांची किंवा स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते तेव्हा व्यक्तीने शरीरामध्ये अमर्याद सामर्थ्य, कुरुपताविरहित सौंदर्य आणि अद्भुत क्षमतांचे स्वप्न रुजविले पाहिजे. हवेमध्ये उंच भरारी घेण्याची, जिथे आवश्यकता आहे तिथे उपस्थित राहण्याची किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची, आजारी व्यक्तीस बरे करण्याची अशी अनेकानेक स्वप्नं मूल लहानपणी पाहत असते. परंतु बरेचदा त्यांचे पालक किंवा शिक्षक त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवतात आणि म्हणतात, “असं स्वप्नातच घडतं, असं काही खरं नसतं.” वास्तविक त्यांनी याच्या बरोबर उलट केले पाहिजे.

मुलांना असे सांगितले पाहिजे की, “तुला जे वाटतं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजेस. तू जे म्हणतो आहेस ते शक्य आहे आणि ती गोष्ट शक्य करून दाखविणारा जो अंश तुझ्यामध्ये आहे, त्याच्या संपर्कात तू आलास तर, ती गोष्ट तू निश्चितपणे करू शकशील. सामान्य जग त्याला काल्पनिक मानते. पण तू त्या खऱ्या वास्तविकतेच्या दिशेने स्वतःला विकसित केले पाहिजेस, त्या दिशेने तू तुझ्या जीवनाची आखणी केली पाहिजेस, जीवनाला दिशा दिली पाहिजेस.” मुलांना असे घडविले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 162)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ (Utilitarianism) म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणू त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांची पारख केली जाते, असे दिसते. एखादी गोष्ट जर उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा जे थोडे का होईना उपयुक्त आहे, ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल; उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी? याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, ज्या गोष्टीमधून पैसा मिळविता येतो, जे अर्थोत्पादन करू शकते ते ते उपयुक्त असते. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे; इतका की या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहिली पाहिजेत त्या वयात, आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि हा पैसा कसा मिळवायचा याचीच त्यांना चिंता लागली आहे. म्हणून मुले जेव्हा अभ्यासाचा विचार करत असतात तेव्हा, त्यांना काय उपयोगी पडू शकेल; म्हणजे काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येईल; याचाच ती अधिक विचार करत असतात.

त्यांच्या दृष्टीने एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते; आणि ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगली अधिकार-पदे प्राप्त होऊ शकतील आणि त्यातूनच ते भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्या दृष्टीने अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्या व्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काहीही स्वारस्य नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे; प्रकृतीचे आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे; चेतनेचा विकास घडविण्यासाठी स्वतःला शिक्षित करणे; आत्मप्रभुत्व मिळविण्यासाठी स्वयंशिस्त लावणे; स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे; अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी स्वत:ची तयारी करणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त याच गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.

– श्रीमाताजी [CWM 12 : 351-352]

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने स्वतःची प्रगती केली पाहिजे, गुणांची जोपासना केली पाहिजे, स्वतःच्या दोषांवर मात केली पाहिजे. स्वतःला अज्ञान आणि अक्षमतेमधून बाहेर काढण्यासाठी मिळालेली एक संधी या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. व्यक्तीने असे केले तर मग जीवन विलक्षण स्वारस्यपूर्ण होईल आणि मग त्यासाठी कष्ट सोसणे अधिक श्रेयस्कर होईल.

*

सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, इंद्रियांना वळण लावणे, शिक्षण घेणे, संस्कृती जोपासणे या सर्व गोष्टी म्हणजे असंस्कृत उपजत प्रेरणा, इच्छावासना आणि कामना यांमध्ये सुधारणा घडविण्याची साधनं असतात. या प्रेरणा, इच्छावासना, कामनादी गोष्टींना नष्ट करणे हा त्यावरचा उपाय नाही; तर त्यांच्यामध्ये सुसंस्कृतता आणली पाहिजे, त्यांची जोपासना विचारपूर्वक केली पाहिजे, त्यांच्यामध्ये उच्च अभिरुची रुजवली पाहिजे. त्यांच्यामध्ये सुधारणा घडविण्याचा हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. चेतनेची प्रगती आणि विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढीस जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुसंवादाची जाणीव वाढीस लागू शकेल; आकलनात नेमकेपणा येऊ शकेल. तो मानवाच्या शिक्षणाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124, 120-121)

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण घेतात. त्याचा संदर्भ येथे आहे.)

विद्यार्थी : मैदानावर रोज खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर आम्ही एक मिनिटभर एकाग्र होऊन शांत बसतो. त्यावेळी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही जी कृती करणार आहात ती कृती प्रथम ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला आत्मनिवेदित भावाने (spirit of consecration) करता येईल. नंतर, “ईश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही अधिकाधिक सुपात्र असे साधन व्हावे यासाठी, आमच्यामध्ये प्रगतीची इच्छा वाढीस लागू दे,” अशी प्रार्थना तुम्ही ईश्वराकडे करा. खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला ईश्वराप्रत शांतपणे अर्पित करू शकता. आणि खेळून झाल्यावर निश्चल-नीरवपणे ईश्वराप्रत कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. म्हणजे, मनामध्ये नुसते शब्दोच्चारण होत आहे पण त्यामध्ये भाव नाहीत अशी ती कृती असता कामा नये. ती कृती अगदी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 354-355)

(श्रीमाताजी येथे ‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद-आश्रमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन आबालवृद्ध सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल.)

आपण इथे एका नूतन चेतनेच्या (अतिमानासिक चेतनेच्या) बहरासाठी आणि एका नवीन जीवनासाठी स्वतःला घडविण्यासाठी आलो आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे, जे जे कोणी शिकू इच्छितात त्या सर्वांना सांगत आहे की, नेहमी अधिकाधिक आणि उत्तमात उत्तम असे शिकत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही त्या नूतन शक्तीप्रत स्वतःला खुले करण्यास सक्षम व्हाल आणि त्याद्वारे ती नूतन शक्ती या जडभौतिक स्तरावर आविष्कृत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यासाठी हा शारीरिक शिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला त्याचा विसर पडता कामा नये.

तुम्ही येथे का आहात याचे खरे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती अशी की, आपल्याला शक्य तितके परिपूर्ण साधन व्हायचे आहे; ईश्वरी इच्छा या जगामध्ये अभिव्यक्त करण्याचे साधन आपल्याला व्हायचे आहे आणि साधनं जर परिपूर्ण व्हायची असतील तर त्यांची जोपासना केली पाहिजे; ती शिक्षित, प्रशिक्षित केली पाहिजेत; ती विकसित केली पाहिजेत. ती साधनं पडीक किंवा खडकाळ जमिनीसारखी ठेवता कामा नयेत. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतरच त्याचे सौंदर्य खुलून दिसते. तुमच्याबाबतीतही अगदी तसेच आहे.

अतिमानसिक चेतनेच्या आविष्करणासाठी तुमचे शरीर हे एक परिपूर्ण साधन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याची जोपासना केली पाहिजे. ते पीळदार बनविले पाहिजे, त्याच्यावर संस्करण केले पाहिजे; त्याच्यामध्ये ज्या उणिवा, कमतरता आहेत त्या भरून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आधीपासूनच ज्या क्षमता आहेत त्या परिपूर्ण करत नेल्या पाहिजेत.

– श्रीमाताजी (CWM 12 : 72-73)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ (naughty) आहोत याची जाणीव झाल्यामुळे खजील होऊन, मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते, कारण भीती म्हणजे चेतनेचा ऱ्हास असतो.

• श्रीमाताजी (CWM 12 : 362)

लहान मुलांना भीती का वाटते? कारण ती दुर्बल असतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा शारीरिकदृष्ट्या ती दुर्बल असतात आणि सहसा ती प्राणिक व मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत असतात. दुर्बलतेच्या भावनेतून भीती उद्भवते. तथापि, भीतीपासून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असतो.

ईश्वरी कृपेवर श्रद्धा ठेवणे आणि सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये तिने तुमचे संरक्षण करावे म्हणून तुम्ही तिच्यावर विसंबून असणे हा तो मार्ग होय. तुमच्या आत्म्याशी म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी असणारा संपर्क तुम्ही वाढवत नेलात तर आणि तुम्ही जो विचार कराल, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जे काही कराल त्या सर्व गोष्टी म्हणजे अंतरंगात असणाऱ्या सत्याची अभिव्यक्ती ठरली पाहिजे असा प्रयत्न जर तुम्ही नेहमीच करत राहिलात तर, तुम्ही जसजसे मोठे होत जाल तसतसे तुम्ही या भीतीमधून बाहेर पडाल.

तुम्ही जेव्हा त्या सत्यामध्येच जाणीवपूर्वक निवास करू लागाल तेव्हा तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागातून (शरीराने, प्राणाने किंवा मनाने) तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण तेव्हा तुम्ही या जगाचे संचालन करणाऱ्या वैश्विक सत्याशीच एकात्म पावलेले असाल.

श्रीमाताजी (CWM 12 : 125)

कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे मूल काहीही करत असले तरी त्याला पुरेशी झोप मिळालीच पाहिजे. वयानुसार झोपेचे तास कमीअधिक होतील. बाळ पाळण्यात असताना, ते जितका वेळ जागे असते त्याच्यापेक्षा अधिक वेळ त्याने झोपले पाहिजे. जसजसे ते मूल मोठे होत जाईल तसतसे त्याच्या झोपेचे प्रमाण कमीकमी होत जाईल. परंतु मुलाची वाढ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याने किमान आठ तास तरी झोपलेच पाहिजे. जिथे शांतता आहे आणि जिथे खेळती हवा आहे अशा जागी त्याने झोपले पाहिजे.

लहान मुलांना विनाकारण उशिरापर्यंत जागे राहायला लावता कामा नये. मज्जातंतूंना विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने मध्यरात्रीपूर्वीचे तास हे सर्वात उत्तम असतात. एवढेच काय पण ज्यांना मज्जागत संतुलन (nervous balance) कायम ठेवायचे आहे त्यांनी दिवसासुद्धा थोडी विश्रांती घेणे आवश्यक असते. मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना स्नायूंना आणि मज्जातंतूंना आराम कसा द्यायचा याची कला शिकविली पाहिजे.

पण बरेच पालक असेही असतात की, जे मुलांना कोणती ना कोणती तरी कृती करण्यास भाग पाडत असतात. जेव्हा मूल शांत असते तेव्हा पालकांना असे वाटते की, जणू ते आजारी आहे. मुलांना आराम करू न देता किंवा त्यांना थोडीही विश्रांती घेऊ न देता, कामामध्ये गुंतवून ठेवण्याची वाईट खोडसुद्धा काही पालकांना असते. …आपल्या कुटुंबाला मदत करण्याचे जर मुलाने स्वतःहून ठरविले असेल आणि काम करण्याची त्याला आवड असेल तरच त्याला तशा प्रकारचे काम करू दिले पाहिजे. मात्र त्यामध्ये एक खबरदारी घेतली गेली पाहिजे. आणि ती अशी की, त्याच्या शरीराचे कार्य व्यवस्थितपपणे चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीचे तास त्यामुळे कमी होता कामा नयेत.

* श्रीमाताजी (CWM 12 : 15-16)