(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे आहे.)

कधीही चूक करू नका.
कधीही रागावू नका.
नेहमीच समजावून घ्यायचा प्रयत्न करा.

एखादी गोष्ट का घडली, त्यापाठीमागे कोणती भावना होती, मुलांची आंतरिक जडणघडण कशी झाली आहे, त्यांच्यामधील कोणती गोष्ट अधिक सशक्त करण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामधील कोणत्या गोष्टीस प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींचे नीटपणे निरीक्षण करून त्या समजावून घेतल्या पाहिजेत.

शिक्षक म्हणून तुम्ही एवढेच करायचे आहे आणि मग मुलांना मुक्त सोडा. त्यांना मोकळेपणाने बहरू द्या. त्यांना अनेक गोष्टी पाहण्याची, अनेक गोष्टी हाताळण्याची, शक्य असतील तितक्या गोष्टी करण्याची संधी द्या. त्यामध्ये त्यांना खूप मजा वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, तुम्हाला जे माहीत आहे असे तुम्हाला वाटते, ते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका.

त्यांच्यावर कधीही रागावू नका. नेहमी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जे सांगाल ते समजून घेण्याची जर त्या मुलाची क्षमता असेल तर त्याला ते अधिक स्पष्ट करून सांगा. ते समजावून घेण्याचीही जर त्याची कुवत नसेल आणि त्याच्यामधील चुकीचे स्पंदन खऱ्या स्पंदनाने बदलून टाकण्याची तुमच्या अंगी क्षमता असेल तर तसे करा.

शिक्षकांसाठी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे, तसा तो आखला तर ते अतिशय उत्तम होईल. अगदी लहान मुलांपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. ती मुलं इतकी घडणक्षम असतात की, कोणत्याही छोट्याशा गोष्टीचा सुद्धा त्यांच्या मनावर खूप खोलवर ठसा उमटतो. लहान असताना मुलांना जर सत्याचे बाळकडू पाजले तर, जेव्हा ती मुलं मोठी होतील तेव्हा ती अगदी स्वाभाविकपणे बहरून येतील. आणि हे एक खरोखरच चांगले कार्य असेल.

– श्रीमाताजी (Conversation with a disciple : April 05, 1967)

जीवनऋतू – १७

(मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण कालच्या भागात विचारात घेतले.)

तुम्ही स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी मला अवास्तव, अशक्यप्राय, भ्रमरूप आहेत असे वाटत आहे त्याच खऱ्या आहेत आणि मला त्यांची जोपासना केलीच पाहिजे.” (येथे शरीराच्या दिव्यत्वाचा संदर्भ आहे, सामान्य जाणिवेला ती दिव्यता भ्रमरूप वाटत असते.) आणि मुलांनाही तीच शिकवण तुम्ही दिली पाहिजे. नेहमी कोणत्या ना कोणत्या अक्षमतेने तुम्ही मर्यादाबद्ध होता कामा नये किंवा सदानकदा कोणत्या तरी दुरिच्छेमुळे आपले पाय मागे खेचले जाऊ नयेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये एक प्रकारची अशी खात्री रुजविली पाहिजे की, तीच गोष्ट मूलतः खरी आहे आणि तीच गोष्ट प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. तसे झाले तर मग तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये एक श्रद्धा जागी होते. तुमच्या शरीरामध्येसुद्धा त्याला एक प्रतिसाद मिळताना तुम्हाला आढळतो. जर त्याला आंतरिक इच्छेची जोड मिळाली, बळकटी मिळाली, तिचे मार्गदर्शन लाभले तर, साऱ्या मर्यादा हळूहळू नाहीशा होऊन जातील आणि खुद्द शरीरालाच तसे जाणवू लागेल.

…परंतु अगदी लहानपणापासूनच जर तुम्हाला सर्व तऱ्हेच्या नाउमेद करणाऱ्या, निराशाजनक गोष्टी शिकविल्या गेल्या असतील, म्हणजे ज्या गोष्टींमुळे विभाजन होते, विघटन होते अशा गोष्टी शिकविल्या गेल्या असतीत तर, हे बिचारे शरीर त्याच्या परीने उत्कृष्ट तेच करत असते पण ते त्या गोष्टींमुळे विकृत, दूषित झालेले असते, ते आता सुस्थितीत राहिलेले नसते आणि मग त्याच्या अंगी त्याच्या आंतरिक सामर्थ्याची, त्याच्या आंतरिक शक्तीची किंवा परिस्थितीला तोंड देण्याच्या शक्तीची जाणीव शिल्लक राहिलेली नसते. शरीर असे दूषित होऊ नये म्हणून योग्य ती काळजी जर घेतली गेली असेल तर त्यामध्ये विजयाबद्दलची एक स्वाभाविक खात्री असते. आपण आपल्या विचारांचा चुकीचा वापर करतो आणि त्याचा शरीरावर जो पगडा असतो त्यामुळे शरीर विजयाची खात्री गमावून बसते.

विजयाबद्दलची ही खात्री नाहीशी न करता उलट, ती जोपासली पाहिजे. आणि जेव्हा अशी खात्री असते तेव्हा अभीप्सा बाळगण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत, तर विजयावरचा हा आंतरिक विश्वास सहजतेने उमलून येतो. शरीर स्वतःमध्ये स्वतःच्या दिव्यत्वाची जाणीव बाळगून असते. पण ही जाणीव जर तुमचे शरीर हरवून बसले असेल तर ती जाणीव तुम्ही पुन्हा तुमच्या अंतरंगामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

एखादे मूल जेव्हा तुम्हाला त्याचे सुंदरसे स्वप्न सांगत असते; म्हणजे त्याच्या त्या स्वप्नामध्ये त्याच्याकडे बऱ्याचशा शक्ती होत्या, सर्व गोष्टी खूप सुंदर होत्या, असे जेव्हा ते मूल तुम्हाला सांगत असते तेव्हा त्याला, “हे असं काही खरं नसतं, जीवन असं नसतं,’’ असे सांगण्याची चूक कधीही करू नका. त्याउलट तुम्ही त्याला असे सांगा की, “हो, जीवन तसेच असले पाहिजे आणि ते नक्की तसे होईल.”

– श्रीमाताजी (CWM 09 : 163 & 165)

 

 

(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला.)

मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले गेले नाही किंवा त्यांच्या उत्साहाला मुरड घातली गेली तर, त्यांची जाणीव एका (नकारात्मक) सवयीमध्ये बदलते आणि जरा कोठे काही चांगले झालेले दिसले की, अशा मुलांच्या मनात लगेच असा विचार येतो की, “हं! हे काही फार दिवस टिकणार नाही.” जेव्हा एखादा माणूस दयाळू आहे असे त्याला दिसते तेव्हा, त्याच्या मनात लगेच असा विचार येतो की, “या माणसाचा दयाळूपणा फार काळ टिकणार नाही; तो लवकरच बदलेल.” स्वत:ला एखादी गोष्ट करायला जमते आहे असे जेव्हा त्या मुलाला आढळते तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो की, “ठीक आहे, (आज मला ही गोष्ट चांगल्या रितीने करता आली) पण उद्या मला हीच गोष्ट इतक्या चांगल्या रितीने करता येईलच असे काही सांगता येणार नाही.” आणि अशी वृत्ती एखाद्या ॲसिडप्रमाणे काम करते; म्हणजे भावी काळातील संभाव्यतांबद्दलची आशा, विश्वास, खात्री उद्ध्वस्त करणाऱ्या एखाद्या विघातक ॲसिडप्रमाणे ती काम करते.

जेव्हा एखादे मूल अतिशय उत्साहात असते तेव्हा त्याच्या उत्साहाला कधीही मुरड घालू नका. “हे बघ बाळा, जीवन असे नसते,” असे त्याला कधीही सांगू नका. तुम्ही त्याला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि असे सांगितले पाहिजे की, “आज ज्या (वाईट) गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी नेहमी तशाच राहणे, हे काही आवश्यक नाही. आज त्या दिसताना कुरूप दिसत असतील; पण वास्तविक त्याच्या पाठीमागे एक सौंदर्य दडलेले आहे आणि ते अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे (हे तू लक्षात घेतले पाहिजेस.) तू त्या सौंदर्यावर प्रेम केले पाहिजेस. तुझ्या स्वप्नांचे, तुझ्या आशाआकांक्षांचे ते उद्दिष्ट असले पाहिजे.”

आणि लहानपणीच जर असा (सकारात्मक) विचार मुले करू शकली तर मग पुढे जाऊन, त्यांना फार अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. अन्यथा त्यांना लागलेल्या चुकीच्या वळणाचे दुष्परिणाम त्यांना आधी नाहीसे करावे लागतात; वर सांगितली ती कंटाळवाणी आणि ग्राम्य सामान्य जाणीव त्यांना आधी नाहीशी करावी लागते. सामान्य जाणीव की जी, जीवनापासून कोणत्याच चांगल्या गोष्टींची अपेक्षा बाळगत नाही; जी जीवनाला रटाळ, कंटाळवाणे बनविते आणि सर्व आशाआकांक्षांच्या आणि सौंदर्याच्या तथाकथित भ्रमांच्या विरोधात जाते अशा सामान्य जाणिवेपासून त्याला स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. (क्रमश:)

• श्रीमाताजी (CWM 09 : 163)

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो अशा मुलाच्या स्वप्नांमध्ये नेहमीच एक प्रकारची अभीप्सा असते. ती त्या मुलाच्या चेतनेच्या दृष्टीने एक प्रकारची आकांक्षा असते. म्हणजे सौंदर्याला कुरुपतेचा कलंक नसावा, अन्यायविरहित न्याय असावा, अमर्याद चांगुलपणा असावा आणि एक सचेत, सातत्यपूर्ण यश मिळावे, एक निरंतर चमत्कार घडावा असे त्याला वाटत असते. काहीतरी चमत्कार घडावेत अशी स्वप्नं ते पाहत असते. जगातील सर्व दुष्टपणा नाहीसा होऊन जावा आणि प्रत्येक गोष्ट नेहमी तेजोमय, सुंदर, आनंदी असावी असे त्याला वाटत असते. आणि म्हणूनच ज्या गोष्टींचा शेवट गोड होतो अशा गोष्टी मुलांना आवडतात. व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

जेव्हा शरीराला वेदनांची किंवा स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते तेव्हा व्यक्तीने शरीरामध्ये अमर्याद सामर्थ्य, कुरुपताविरहित सौंदर्य आणि अद्भुत क्षमतांचे स्वप्न रुजविले पाहिजे. हवेमध्ये उंच भरारी घेण्याची, जिथे आवश्यकता आहे तिथे उपस्थित राहण्याची किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची, आजारी व्यक्तीस बरे करण्याची अशी अनेकानेक स्वप्नं मूल लहानपणी पाहत असते. परंतु बरेचदा त्यांचे पालक किंवा शिक्षक त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवतात आणि म्हणतात, “असं स्वप्नातच घडतं, असं काही खरं नसतं.” वास्तविक त्यांनी याच्या बरोबर उलट केले पाहिजे.

मुलांना असे सांगितले पाहिजे की, “तुला जे वाटतं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजेस. तू जे म्हणतो आहेस ते शक्य आहे आणि ती गोष्ट शक्य करून दाखविणारा जो अंश तुझ्यामध्ये आहे, त्याच्या संपर्कात तू आलास तर, ती गोष्ट तू निश्चितपणे करू शकशील. सामान्य जग त्याला काल्पनिक मानते. पण तू त्या खऱ्या वास्तविकतेच्या दिशेने स्वतःला विकसित केले पाहिजेस, त्या दिशेने तू तुझ्या जीवनाची आखणी केली पाहिजेस, जीवनाला दिशा दिली पाहिजेस.” मुलांना असे घडविले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 162)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ (Utilitarianism) म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणू त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांची पारख केली जाते, असे दिसते. एखादी गोष्ट जर उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा जे थोडे का होईना उपयुक्त आहे, ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल; उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी? याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, ज्या गोष्टीमधून पैसा मिळविता येतो, जे अर्थोत्पादन करू शकते ते ते उपयुक्त असते. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे; इतका की या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहिली पाहिजेत त्या वयात, आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि हा पैसा कसा मिळवायचा याचीच त्यांना चिंता लागली आहे. म्हणून मुले जेव्हा अभ्यासाचा विचार करत असतात तेव्हा, त्यांना काय उपयोगी पडू शकेल; म्हणजे काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येईल; याचाच ती अधिक विचार करत असतात.

त्यांच्या दृष्टीने एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते; आणि ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगली अधिकार-पदे प्राप्त होऊ शकतील आणि त्यातूनच ते भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्या दृष्टीने अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्या व्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काहीही स्वारस्य नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे; प्रकृतीचे आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे; चेतनेचा विकास घडविण्यासाठी स्वतःला शिक्षित करणे; आत्मप्रभुत्व मिळविण्यासाठी स्वयंशिस्त लावणे; स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे; अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी स्वत:ची तयारी करणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त याच गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.

– श्रीमाताजी [CWM 12 : 351-352]

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने स्वतःची प्रगती केली पाहिजे, गुणांची जोपासना केली पाहिजे, स्वतःच्या दोषांवर मात केली पाहिजे. स्वतःला अज्ञान आणि अक्षमतेमधून बाहेर काढण्यासाठी मिळालेली एक संधी या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. व्यक्तीने असे केले तर मग जीवन विलक्षण स्वारस्यपूर्ण होईल आणि मग त्यासाठी कष्ट सोसणे अधिक श्रेयस्कर होईल.

*

सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, इंद्रियांना वळण लावणे, शिक्षण घेणे, संस्कृती जोपासणे या सर्व गोष्टी म्हणजे असंस्कृत उपजत प्रेरणा, इच्छावासना आणि कामना यांमध्ये सुधारणा घडविण्याची साधनं असतात. या प्रेरणा, इच्छावासना, कामनादी गोष्टींना नष्ट करणे हा त्यावरचा उपाय नाही; तर त्यांच्यामध्ये सुसंस्कृतता आणली पाहिजे, त्यांची जोपासना विचारपूर्वक केली पाहिजे, त्यांच्यामध्ये उच्च अभिरुची रुजवली पाहिजे. त्यांच्यामध्ये सुधारणा घडविण्याचा हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. चेतनेची प्रगती आणि विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढीस जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुसंवादाची जाणीव वाढीस लागू शकेल; आकलनात नेमकेपणा येऊ शकेल. तो मानवाच्या शिक्षणाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124, 120-121)

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण घेतात. त्याचा संदर्भ येथे आहे.)

विद्यार्थी : मैदानावर रोज खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर आम्ही एक मिनिटभर एकाग्र होऊन शांत बसतो. त्यावेळी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही जी कृती करणार आहात ती कृती प्रथम ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला आत्मनिवेदित भावाने (spirit of consecration) करता येईल. नंतर, “ईश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही अधिकाधिक सुपात्र असे साधन व्हावे यासाठी, आमच्यामध्ये प्रगतीची इच्छा वाढीस लागू दे,” अशी प्रार्थना तुम्ही ईश्वराकडे करा. खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला ईश्वराप्रत शांतपणे अर्पित करू शकता. आणि खेळून झाल्यावर निश्चल-नीरवपणे ईश्वराप्रत कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. म्हणजे, मनामध्ये नुसते शब्दोच्चारण होत आहे पण त्यामध्ये भाव नाहीत अशी ती कृती असता कामा नये. ती कृती अगदी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 354-355)

(श्रीमाताजी येथे ‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद-आश्रमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन आबालवृद्ध सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल.)

आपण इथे एका नूतन चेतनेच्या (अतिमानासिक चेतनेच्या) बहरासाठी आणि एका नवीन जीवनासाठी स्वतःला घडविण्यासाठी आलो आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे, जे जे कोणी शिकू इच्छितात त्या सर्वांना सांगत आहे की, नेहमी अधिकाधिक आणि उत्तमात उत्तम असे शिकत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही त्या नूतन शक्तीप्रत स्वतःला खुले करण्यास सक्षम व्हाल आणि त्याद्वारे ती नूतन शक्ती या जडभौतिक स्तरावर आविष्कृत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यासाठी हा शारीरिक शिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला त्याचा विसर पडता कामा नये.

तुम्ही येथे का आहात याचे खरे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती अशी की, आपल्याला शक्य तितके परिपूर्ण साधन व्हायचे आहे; ईश्वरी इच्छा या जगामध्ये अभिव्यक्त करण्याचे साधन आपल्याला व्हायचे आहे आणि साधनं जर परिपूर्ण व्हायची असतील तर त्यांची जोपासना केली पाहिजे; ती शिक्षित, प्रशिक्षित केली पाहिजेत; ती विकसित केली पाहिजेत. ती साधनं पडीक किंवा खडकाळ जमिनीसारखी ठेवता कामा नयेत. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतरच त्याचे सौंदर्य खुलून दिसते. तुमच्याबाबतीतही अगदी तसेच आहे.

अतिमानसिक चेतनेच्या आविष्करणासाठी तुमचे शरीर हे एक परिपूर्ण साधन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याची जोपासना केली पाहिजे. ते पीळदार बनविले पाहिजे, त्याच्यावर संस्करण केले पाहिजे; त्याच्यामध्ये ज्या उणिवा, कमतरता आहेत त्या भरून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आधीपासूनच ज्या क्षमता आहेत त्या परिपूर्ण करत नेल्या पाहिजेत.

– श्रीमाताजी (CWM 12 : 72-73)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ (naughty) आहोत याची जाणीव झाल्यामुळे खजील होऊन, मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते, कारण भीती म्हणजे चेतनेचा ऱ्हास असतो.

• श्रीमाताजी (CWM 12 : 362)