सत्यशोधनाची प्रामाणिक इच्छा
(अंतरात्म्याचा आवाज कसा असतो, आणि मन व प्राण यांचे आवाज कसे असतात, हे आपण जाणून घेतले. आज त्याचा शेवटचा भाग…)
सत्य शोधनाची आणि सत्यानुसार आचरण करण्याची तुमची इच्छा जर खरोखरच प्रामाणिक असेल तर तुम्ही अंतरात्म्याचा तो सौम्य आवाज अधिकाधिक चांगल्या रितीने ऐकायला शिकू लागता, तुम्ही अधिकाधिक विवेक बाळगायला शिकू लागता. त्यासाठी जरी तुम्हाला परिश्रम करावे लागले, किंवा त्यासाठी तुम्हाला काही वेदना सोसाव्या लागल्या तरीदेखील, आता तुम्ही त्याची आज्ञा पालन करण्यास शिकता. तुम्ही एकदा जरी त्याच्या आज्ञेचे पालन केलेत तरीदेखील ती एक मोठी शक्तिशाली मदत ठरते. आत्मा काय असतो आणि काय नसतो यामध्ये तारतम्य करण्याच्या मार्गावरील ती लक्षणीय प्रगती असते. आवश्यक तो प्रामाणिकपणा जर तुमच्यामध्ये असेल तर, या विवेकाच्या साहाय्याने तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार याची खात्री बाळगा.
परंतु तुम्ही घाईगडबड करता कामा नये, तुम्ही अधीर होता कामा नये, तुम्ही चिकाटी बाळगली पाहिजे. अन्यथा तुम्ही एक योग्य गोष्ट करण्याऐवजी दहा चुकीच्या गोष्टी करता. (पण आणखी एक गोष्टदेखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवली पाहिजे. ती गोष्ट अशी की,) जेव्हा तुमच्या हातून एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा निराश होऊन तुम्ही सारेकाही सोडून देता कामा नये; तुम्ही स्वतःला असे समजावून सांगितले पाहिजे की, ही चूक झाली म्हणून ईश्वरी कृपा काही मला सोडून जाणार नाही. या वेळी चूक झाली, पण पुढच्या वेळी मी अशी चूक करणार नाही, असे तुम्ही स्वतःला बजावले पाहिजे.
सारांश रूपाने सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, गोष्टी जशा आहेत तशा त्या जाणून घ्यायच्या असतील तर, प्रथम तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी एकात्म पावले पाहिजे आणि आत्म्यैक्य साधण्यासाठी, असे ऐक्य साधण्याची सातत्यपूर्ण आणि दृढ इच्छा तुमच्यामध्ये असली पाहिजे. ध्येयावरील एकाग्रता जेवढी अधिक, तेवढा मार्ग अधिक निकटचा होऊ शकतो.
– श्रीमाताजी (CWM 10 : 25-26)
- तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी - September 29, 2026
- सत्यशोधनाची प्रामाणिक इच्छा - September 28, 2026
- अंतरात्म्याचा आवाज - September 27, 2026





