साधना, योग आणि रूपांतरण – २१७
चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.
सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.
जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025