(पूर्वार्ध)
एखाद्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अजिबात पटण्यासारखी नसते किंवा ती तुम्हाला अगदी हास्यास्पद वाटते (आणि तुम्ही म्हणता,) “तो असा आहे, तो तसा वागतो, तो असे असे म्हणतो, तो अशा अशा गोष्टी करतो.” अशावेळी तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हटले पाहिजे, “बरं, ठीक आहे, पण मी देखील कदाचित माझ्या नकळतपणे तशाच गोष्टी करत नसेन कशावरून? टीका करण्यापूर्वी मी स्वतःकडेच नीट लक्षपूर्वक असे पाहिले पाहिजे की, थोड्या वेगळ्या पद्धतीने असेल कदाचित, पण मीसुद्धा तीच गोष्ट तर करत नाहीये ना? याची मला खात्री करून घेतली पाहिजे.’’
प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचा धक्का बसतो तेव्हा तेव्हा, उपरोक्त विचार करण्यासाठी लागणारी चांगली जाणीव आणि बुद्धिमत्ता जर तुमच्यापाशी असेल, तर तुमच्या असे लक्षात येईल की, जीवनामध्ये तुमचे इतरांशी असणारे संबंध हे जणू एखाद्या आरशाप्रमाणे असतात. तुमच्यामध्ये ज्या ज्या अपूर्णता, दुर्बलता आहेत त्या तुम्हाला अगदी सहजतेने आणि अगदी स्पष्टपणे पाहता याव्यात यासाठी, (आरशाच्या माध्यमातून) त्या तुमच्यासमोर मांडण्यात आलेल्या असतात.
सर्वसाधारणपणे आणि जवळजवळ निरपवादपणे सांगायचे झाले तर, तुम्हाला इतरांमधील जी गोष्ट खटकत असते, अगदी नेमकी तीच गोष्ट कमीअधिक झाकलेल्या रूपात, कमीअधिक गुप्त रूपात, कदाचित किंचितशा वेगळ्या वेषात तुम्ही स्वतःमध्ये बाळगून असता. ही तीच गोष्ट असते जिच्यामुळे तुमची फसगत होण्याची शक्यता असते. स्वतःमधील जी गोष्ट तुम्हाला फारशी त्रासदायक वाटत नसते तीच गोष्ट जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसते, तेव्हा ती एकदम भयंकर वाटू लागते. याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला त्याची पुष्कळच मदत होईल. आणि त्यामुळे इतरांबरोबर असणाऱ्या तुमच्या नात्याबाबत तुमच्यामध्ये एक सूर्यप्रकाशवत् सहिष्णुता उदयाला येईल; समजूतदारपणातून येणारी सदिच्छा उदयाला येईल आणि मग त्यातून, अगदी निरर्थक असणाऱ्या भांडणतंट्यांचा देखील शेवट होईल.
(उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 10 : 21-22)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…