पूर्णयोगाचे अधिष्ठान – २४
साधकाकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. या गोष्टी जर साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यामुळे घडून येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘समर्पण’. विश्वास, भरवसा आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवणे हे या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते.
अभीप्सा असेल तरच विश्वास आणि भरवसा असतो असा काही नियम नाही. उलट, अगदी अभीप्सा नसतानासुद्धा, जडत्वाच्या, तामासिकतेच्या दबावामुळे भरवसा, विश्वास आणि धैर्यसुद्धा टिकून राहू शकते. अभीप्सा झाकोळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले तर, तेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा साधक म्हणत असतो की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा आता मला आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली, तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?”
पण याच्या उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. आत्ता जरी मला श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्णपणे सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्यावर नैराश्याचादेखील काही परिणाम होऊ शकत नाही; पण समजा अगदी नैराश्य आलेच तर त्या नैराश्यालाच अपयशी होऊन परतावे लागते. हे काही ‘तामसिक समर्पण’ नव्हे.
पण “मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे; अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील आवश्यक नाहीत. त्या गोष्टीसुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते ‘तामसिक समर्पण’ असते. हा जो दृष्टिकोन असतो तो काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा असतो आणि दुसरा दृष्टिकोन असतो साधकाचा. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.
असा साधक जे जे सर्वोत्तम असते ते ते सारे काही करतो, परंतु जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात आणि साधक काही काळासाठी अक्रिय होतो तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवून असतो आणि (बऱ्यावाईट) साऱ्या गोष्टींमागे त्यांचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. त्याच्या या विश्वासामुळेच तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकदा साधना करू लागतो.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 139-140)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…