ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

46 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago