पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४
पूर्वार्ध
एकीकडे तुम्ही असे म्हणत असाल की, मी स्वतःला ‘श्रीमाताजीं’प्रति खुले ठेवले आहे आणि त्याच वेळी तुम्ही समर्पण मात्र हातचे राखून ठेवत असाल तर, तुमच्या त्या म्हणण्याला फारसा आध्यात्मिक अर्थ नाही. जे पूर्णयोगाची साधना करतात त्यांनी आत्मदान करावे किंवा समर्पण करावे असे अभिप्रेत असते. कारण, व्यक्तीच्या अशा प्रकारच्या प्रगमनशील (progressive) समर्पणाखेरीज, ध्येयाच्या जवळपास पोहोचणे देखील अशक्यप्राय असते.
स्वतःला खुले ठेवणे म्हणजे तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी श्रीमाताजींच्या ‘शक्ती’स आवाहन करणे. पण तुम्ही जर त्या शक्तीला समर्पित झाला नाहीत तर, त्याचा परिणाम असा होतो की, एकतर तुम्ही तुमच्यामध्ये त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देत नाही किंवा तुम्हाला ते कार्य ज्या पद्धतीने व्हावे असे वाटते त्या पद्धतीने होणार असेल तरच, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देता. म्हणजेच, त्या शक्तीला तुम्ही तिच्या पद्धतीने म्हणजे दिव्य सत्याच्या पद्धतीने कार्य करू देत नाही.
अशा प्रकारच्या अटी घालणे हे सहसा कोणत्यातरी विरोधी शक्तीकडून केले जाते किंवा मनाच्या किंवा प्राणाच्या एखाद्या अहंभावात्मक घटकाकडून केले जाते. त्याला ईश्वरी ‘कृपा’ किंवा ‘शक्ती’ हवी असते पण ती त्याला स्वतःच्या हेतुसाठी वापरायची असते; त्याला ईश्वरी उद्दिष्टासाठी जीवन जगण्याची इच्छा नसते. त्याला ईश्वराकडून जे जे मिळविणे शक्य असते ते सर्व हवे असते पण तो स्वतःला मात्र ईश्वराप्रति अर्पण करू इच्छित नसतो. उलटपक्षी, सत्-अस्तित्व (true being), आत्मा हा ईश्वराभिमुख होतो आणि त्याला ईश्वराप्रति समर्पण करण्याची केवळ इच्छाच असते असे नाही तर, तो आनंदाने समर्पण करण्यासाठी तत्पर असतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 32 : 140-141)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…