आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

आत्मसाक्षात्कार – ०४

साधक : माताजी, ‘ईश्वराचा साक्षात्कार होणे’ याचा नेमका काय अर्थ आहे ?

श्रीमाताजी : स्वत:च्या अंतरंगात असणाऱ्या किंवा आध्यात्मिक शिखरावर असणाऱ्या ‘ईश्वरी उपस्थिती’बाबत सजग होणे, सचेत होणे आणि एकदा का तुम्ही त्या ईश्वरी उपस्थितीबाबत सचेत झालात की, ईश्वराच्या इच्छेव्यतिरिक्त, तुमची स्वतःची अशी कोणतीही स्वतंत्र इच्छा शिल्लक राहणार नाही, इतक्या पूर्णपणे त्याला समर्पित होणे आणि अंतिमतः स्वत:ची चेतना ही त्याच्या चेतनेशी एकरूप करणे, याला म्हणतात ‘ईश्वराचा साक्षात्कार’!

*

‘ईश्वराचा साक्षात्कार’ होणे अशक्य आहे असा या जगात कोणीही नाही. मात्र काही जणांना त्यासाठी अनेक जन्म लागतील, तर काहीजण अगदी याच जन्मामध्ये तो साध्य करून घेऊ शकतील. हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इथे निवड तुम्ही करायची असते. पण मी हे निश्चितपणे सांगेन की, सद्यकालीन परिस्थिती त्यासाठी विशेष अनुकूल आहे.

– श्रीमाताजी (CWM 16 : 409-410)

आत्मसाक्षात्कार – ०३

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ म्हणतात. अशा प्रकारे वैयक्तिक, सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्व्यक्तिक, निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतानासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे आणि युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात असतानादेखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनयुक्त प्रयत्न करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे मग पुढे, अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसं खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकुर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल, इतकेच.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

आत्मसाक्षात्कार – ०२

आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.

२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.

ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

आत्मसाक्षात्कार – ०१

‘अध्यात्म’ हा शब्द उच्चारला की त्याला जोडूनच साधना, अनुभव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी शब्द येतात. हे शब्द उपयोजिले जातात खरे, पण बरेचदा त्या शब्दांचा गर्भितार्थ काय, त्याची खोली किती आहे याची आपल्याला क्वचितच जाण असते. ‘आत्मसाक्षात्कार’ हादेखील असाच एक शब्द आहे.

आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, काय केले असता आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, त्यामध्ये वैयक्तिक प्रयत्नांचे स्थान काय व किती असते आणि त्यामध्ये ईश्वरी शक्तीचे व ईश्वरी कृपेचे महत्त्व किती असते, ‘पूर्णयोगा’मध्ये आत्मसाक्षात्कार हा अंतिम टप्पा मानला जातो का, अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) आणि साक्षात्कार यामध्ये काय संबंध असतो, इत्यादी सर्व मुद्द्यांचा सखोल विचार आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘आत्मसाक्षात्कार’ या मालिकेद्वारे करणार आहोत. वाचकांचा या मालिकेलाही नेहमीप्रमाणेच उदंड प्रतिसाद लाभेल असा विश्वास वाटतो.

धन्यवाद!
डॉ. केतकी मोडक
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

भारताचे पुनरुत्थान – १६

‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १९ जून १९०९

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो.

मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वातून वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक सखोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्या, आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील. निसर्गाच्या शक्तींना आरामदायक सुखसोयींच्या दिमतीस जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, मनुष्याचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करून आणि बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच त्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान होणे गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता असल्यामुळेच, भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे.”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)

भारताचे पुनरुत्थान – १५

(इ. स. १९१८ साली ‘राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा’निमित्त श्री. अरविंद घोष यांनी दिलेला संदेश)

हा असा काळ आहे की, जेव्हा अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याची पावले कोणत्या दिशेने वळण घेणार आहेत हे येणाऱ्या शतकासाठी म्हणून दमदारपणाने निर्धारित केले जात आहे. आणि हे निर्धारण कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे नाही तर, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक व बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत असे हे शतक आहे आणि हे एक महान निर्णायक वळण आहे.

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, त्या कर्मांची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत. आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या देशवासीयांच्या अंतरात्म्याला देण्यात आलेली ही एक संधी असणार आहे; देशवासीयांना इथे एक (जाणीवपूर्वक) निवड करावी लागणार आहे आणि त्याबरोबरच, ती त्यांच्यासाठी एक कसोटीदेखील असणार आहे. ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडेल, अशी आपण सदिच्छा बाळगू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 413)

भारताचे पुनरुत्थान – १४

उत्तरार्ध

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला आवाहन करू शकता आणि तुम्ही तसे केल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ वास्तविक ‘ईश्वरी इच्छे’सहित परिपूर्ण श्रद्धा असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला जाण असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असल्याने, ईश्वरी इच्छा काय आहे हे त्या दृष्टीला स्पष्ट दिसते आणि तिला हेसुद्धा ज्ञात असते की, जे घडणार आहे ते ईश्वराच्या इच्छेनुसारच घडणार आहे. श्रद्धा अंध नसते; उलट आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणल्यामुळे श्रद्धा सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह तात्पुरत्या किंवा स्थायी स्वरूपात ती त्या सर्वांना प्रदान करू शकते. एकांतवासात राहणाऱ्या एखाद्या माणसाचा विचार हा, निःस्वार्थ व निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यामुळे, राष्ट्राचा विचार बनू शकतो. एखाद्या एकट्या वीराची इच्छा ही लाखो भित्र्या लोकांच्या हृदयांमध्येदेखील धैर्य निर्माण करू शकते. ही साधना आपण सिद्धीस नेलीच पाहिजे. आपल्या मुक्तीची ही पूर्वअट आहे.

आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित सदोष व अपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हलविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते कार्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वराच्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ या आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १३

पूर्वार्ध

लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.

ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १२

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८

मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी समता, मानवी बंधुता यांच्या खऱ्या उगमस्रोताकडे वळविणे हे भारताचे जीवितकार्य आहे. मनुष्य जेव्हा आत्मस्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा इतर सर्व स्वातंत्र्य त्याच्या सेवेला हजर असतात; कारण ईश्वर हा ‘मुक्त’ असतो आणि तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. मनुष्य जेव्हा भ्रांतीपासून मुक्त झालेला असतो तेव्हा त्याला या जगामध्ये अंतर्भूत असलेल्या दिव्य समत्वाचा बोध होतो. प्रेम आणि न्याय यांच्या माध्यमातून हे दिव्य समत्व स्वतःची परिपूर्ती करत असते. व्यक्तीला जेव्हा असा बोध होतो तेव्हा तो बोधच स्वयमेव शासनाच्या व समाजाच्या कायद्यामध्ये रूपांतरित होतो.

एखाद्या व्यक्तीला जेव्हा या दिव्य समत्वाचा बोध होतो तेव्हा तो अखिल जगाचा बंधू होतो आणि त्याला कोणत्याही पदावर विराजमान केले तरी तो प्रेमाच्या व न्यायाच्या कायद्याने, बंधुत्वाच्या नात्याने, सर्व मानवांची सेवा करतो. जेव्हा हा बोध धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक अनुमानांचा तसेच राजकीय आकांक्षांचा आधार बनेल तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजव्यवस्थेच्या रचनेमध्ये त्यांच्या त्यांच्या योग्य जागी विराजमान होतील आणि मग पुन्हा ‘सत्ययुग’ अवतरेल.

हे लोकशाहीचे आशियाई आकलन आहे आणि ते जगाला ज्ञात करून देण्यापूर्वी भारताने प्रथम लोकशाहीचा स्वत:साठी म्हणून पुनर्शोध घेतला पाहिजे. मनुष्याने आत्म्यामध्ये मुक्त असावे आणि सक्तीने नव्हे तर, प्रेमाने सेवाकार्यास बांधील असावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. आत्म्याप्रमाणे समान असावे आणि इतरांच्या स्वार्थी हितसंबंधांनुसार नव्हे तर, समाजाची सेवा करण्याची त्याची जी क्षमता असेल त्यानुसार त्याने स्वत:चे समाजातील स्थान निर्धारित करावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. त्याच्या बंधुभगिनींशी त्याचे नाते सुसंवादी असावे, दोघांमध्ये शोषक व शोषिताचे किंवा भक्ष्य व भक्ष्यकाचे नाते नसावे, तसेच दास्यत्वाच्या बेड्यांनी नव्हे तर परस्परांच्या प्रेमाने व सेवाभावामुळे एकमेकांशी संबंधित असावे; हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे.

लोकशाही ही माणसाच्या हक्कांवर आधारलेली असते असे म्हटले जाते; त्याला प्रत्युत्तर देताना असे म्हटले जाते की, ती हक्कांपेक्षा मनुष्याच्या कर्तव्यांवर आधारली गेली पाहिजे; परंतु हक्क असोत वा कर्तव्य या दोन्ही संकल्पनाच मुळात युरोपियन आहेत. जेथे स्वार्थीपणा हाच कृतीचा मूलाधार असतो अशा जगाच्या दृष्टिकोनातून, हक्क आणि कर्तव्य हे द्वंद्व (कृत्रिमरित्या) तयार करण्यात आलेले असते. मात्र धर्म ही अशी एक भारतीय संकल्पना आहे की, ज्या संकल्पनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोहोंमधील कृत्रिम द्वंद्व मावळून जाते आणि त्यांच्यामधील सखोल व शाश्वत ऐक्य त्यांना पुन्हा प्राप्त होते. धर्म हाच लोकशाहीचा आधार आहे हे सत्य आशियाने ओळखले पाहिजे. कारण युरोपचा आत्मा आणि आशियाचा आत्मा या दोहोंमधील फरक नेमका येथेच आहे. आशियाई उत्क्रांती धर्माच्या माध्यमातून तिच्या परिपूर्णतेला पोहोचते, हे तिचे रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 931-932)