साधना, योग आणि रूपांतरण – २८१
शरीराचे रूपांतरण
तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर आधारावरच व्यक्ती ‘ईश्वरी’ कार्यासाठीचे संपूर्णतया प्रभावी असे साधन (instrument) बनू शकते.
व्यक्ती असे साधन झाली तरीदेखील अजून या साधनभूत व्यक्तीचे गतिमान रूपांतरण (dynamic transformation) साध्य करून घेणे शिल्लक असते. आणि ते रूपांतरण मन, प्राण आणि शरीरामध्ये होणाऱ्या उच्चतर आणि अधिक उच्चतर अशा चेतनाशक्तीच्या अवतरणावर अवलंबून असते. अतिमानसिक ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ यांच्या जे अधिकाधिक समीप आहे, त्याचा अर्थबोध येथे ‘उच्चतर’ अस्तित्व या शब्दाने होतो.
मी ज्याचा उल्लेख केला त्याच्या आधारावरच या उच्चतर शक्तीचे अवतरण करणे शक्य असते. त्यासाठी चैत्य पुरुष (psychic being) सातत्याने अग्रभागी राहणे तसेच साधनभूत झालेल्या मन, प्राण व शरीर आणि अस्तित्वाच्या या उच्चतर स्तरांच्या दरम्यान त्याने मध्यस्थ म्हणून कार्य करणे आवश्यक असते. म्हणून प्रथम हे पायाभूत स्थिरीकरण (stabilisation) पूर्ण झाले पाहिजे.
*
शारीर-चेतनेमध्ये उच्चतर स्तरावरील समग्र ऊर्जा किंवा अनुभूती खाली उतरविणे शक्य नसते. रूपांतरणकार्यासाठी साहाय्य करण्यासाठी म्हणून त्यांचा फक्त प्रभाव खाली येतो. एकदा का हे रूपांतरण घडून आले की मग, शरीर अधिक सक्षम होईल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 362-363)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…