साधना, योग आणि रूपांतरण – २६७
प्राणाचे रूपांतरण
कृती ‘ईश्वरा’र्पण करणे आणि ते करताना त्यामध्ये जी प्राणिक अडचण उद्भवते त्याविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, ही अडचण टाळणे शक्य नसते. तुम्हाला त्यामधून जावेच लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रयत्न करू लागता त्याक्षणी, या परिवर्तनाला विरोध करण्यासाठी, प्राण त्याच्या सर्व अस्वस्थ अपूर्णतांसह उभा ठाकतो. असे असले तरी, त्या अडचणीची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ती अडचण कमी करण्यासाठी तीन उपाय तुम्ही करू शकता –
१) या प्राणिक-शारीरिक स्तरापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करा. ‘तो स्तर म्हणजे तुम्ही नाही’ या भूमिकेतून तुम्ही त्याचे निरीक्षण करा, त्याला नकार द्या. त्याच्या मागण्यांना, त्याच्या भावावेगांना संमती देण्यास नकार द्या, परंतु जो नकार द्याल तो साक्षी ‘पुरुष’ या भूमिकेतून शांतपणे द्या की ज्याच्या नकाराचा अंतिमतः विजय होणेच आवश्यक आहे. तुम्ही जर आधीपासूनच निर्व्यक्तिक, निर्गुण ‘आत्म्या’मध्ये (impersonal Self) अधिकाधिक राहायला शिकला असाल तर, स्वत:ला अलिप्त करणे तुम्हाला कठीण जाण्याचे काहीच कारण नाही.
२) जेव्हा तुम्ही या निर्व्यक्तिकतेमध्ये नसाल, तेव्हाही तुमची मानसिक इच्छाशक्ती आणि तिची संमती किंवा नकार देण्याची शक्ती उपयोगात आणा. हे करताना कोणताही वेदनादायी संघर्ष नको तर अगदी त्याच पद्धतीने, शांतपणे, इच्छावासनांच्या मागण्यांना नकार द्या. जोपर्यंत अनुमती किंवा संमती न मिळाल्यामुळे या मागण्यांची पुन्हा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्ती शमत नाही आणि ती शक्ती अधिकाधिक क्षीण होत नाही आणि बाहेर पडत नाही, तोपर्यंत मानसिक इच्छाशक्तीचा उपयोग करत राहा.
३) तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या किंवा तुमच्या हृदयांतरी असणाऱ्या ‘ईश्वरा’विषयी तुम्ही जर सजग झालात तर तेथूनच, त्याच्या साहाय्यासाठी त्याला आवाहन करा, स्वयमेव त्या प्राणामध्येच परिवर्तन व्हावे म्हणून प्रकाशाला आणि शक्तीला आवाहन करा. आणि जोपर्यंत तो प्राण स्वतःहून या परिवर्तनासाठी प्रार्थना करायला शिकत नाही तोपर्यंत त्या प्राणाला आग्रहपूर्वक सांगत राहा.
शेवटी, ‘ईश्वरा’बद्दल असलेल्या तुमच्या अभीप्सेच्या प्रामाणिकतेद्वारे आणि तुमच्या समर्पणामुळे, तुमच्या हृदयामध्ये गुप्त असलेला ‘चैत्य पुरुष’ (psychic being) तुम्ही जागृत करू शकलात तर त्यामुळे तो अग्रभागी येईल आणि कायम तेथेच राहील. आणि, तो मन, प्राण आणि शारीरिक चेतनेच्या सर्व गतिविधींवर प्रभाव टाकेल आणि तत्क्षणी तुमच्या अडचणी अगदी कमी होऊन जातील. त्यानंतरसुद्धा रूपांतरणाचे कार्य करावेच लागणार आहे, परंतु त्या क्षणानंतर मात्र ते कार्य तितकेसे कठीण आणि कष्टदायक असणार नाही.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 113-114)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…