साधना, योग आणि रूपांतरण – २४२
नमस्कार वाचकहो,
मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.
‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.
आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.
मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.
धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…