साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

श्रीअरविंद