असे वरदान दे
(जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…)
सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो.
असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये.
असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये.
असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येक क्षणी ‘तुझी’च इच्छा कार्यरत राहील.
‘तुझा’ मानस आमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा, आमच्या प्रत्येक तत्त्वामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून, आम्ही ‘तुझ्या’समोर उभे आहोत.
असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत पूर्णपणे आणि सदोदित एकनिष्ठ राहू. इतर कोणत्याही प्रभावाविना आम्ही पूर्णत: ‘तुझ्या’च प्रभावाला खुले राहू, असे वरदान दे.
असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत एक प्रगाढ आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही.
असे वरदान दे की, ‘तुझ्या’कडून प्रसादरूपाने, हरघडी मिळालेल्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही.
असे वरदान दे की, आमच्यातील सर्वकाही ‘तुझ्या’ कार्यात सहभागी होईल आणि ‘तुझ्या’ साक्षात्कारासाठी सज्ज होईल.
हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी, तुझा जयजयकार असो. आम्हाला ‘तुझ्या विजया’बद्दलची सक्रिय आणि उत्कट, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 382)
- पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी… - April 27, 2026
- योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय - April 26, 2026
- योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल - April 25, 2026






