भारत – एक दर्शन ३२
हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.
आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.
आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.
– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]
*
भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.
भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.
– श्रीमाताजी [CWM 13 : 353]
- पूर्णयोगातील दुहेरी प्रक्रिया - August 25, 2026
- उच्चतर चेतनेचे अवतरण - August 24, 2026
- चेतनेचे आरोहण आणि अवरोहण - August 23, 2026






