भारत – एक दर्शन ०८
भारताला मानवाच्या पलीकडे असलेल्या अगणित देवदेवता दिसल्या, या देवदेवतांच्या अतीत असणारा ‘ईश्वर’ दिसला आणि त्या ‘ईश्वरा’च्या अतीत मानवाची स्वतःची अनिर्वचनीय अशी अनंतता दिसली. भारताला असे दिसून आले की, आपल्या जीवनाच्या पलीकडे जीवनाच्या अनेक श्रेणी आहेत, तसेच आपल्या सद्यकालीन मनाच्या अतीत असलेल्या मनाच्या अनेक श्रेणी त्याला दिसल्या आणि या साऱ्याच्या अतीत भारताला चैतन्याचे वैभव दिसले. मग त्या अंतर्ज्ञानाच्या शांत धडाडीने, ज्या धडाडीला भीती माहीत नाही, आणि आध्यात्मिक असो, बौद्धिक असो, नैतिक असो किंवा प्राणिक धैर्य असो, त्या धैर्याच्या कृतीपासून जी धडाडी कच खात नाही किंवा जिच्यामध्ये न्यूनगंडाची कोणतीही भावना नसते, अशा धडाडीने भारताने उद्घोषित केले की, मानवाने जर त्याच्या इच्छाशक्तीला आणि ज्ञानाला वळण लावले तर उपरोक्त गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट अप्राप्य नाही. मानव मनाच्या या श्रेणींवर विजय प्राप्त करून घेऊ शकतो, तो स्वतः आत्मा बनू शकतो, तो स्वतः देव बनू शकतो, तो स्वतः ‘ईश्वरा’शी एकात्म पावू शकतो, तो स्वतःच अनिर्वचनीय ‘ब्रह्म’ बनू शकतो.
आणि मग भारतीय मानसिकतेचे वैशिष्ट्य असलेल्या तर्कशुद्ध व्यावहारिकतेने आणि वैज्ञानिक दृष्टीने आणि सुरचित पद्धतीने, भारताने त्वरेने त्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यामुळे, युगानुयुगांपासून चालत आलेल्या या अंतर्दृष्टीमुळे आणि अभ्यासामुळे, भारताची आध्यात्मिकता, त्याची शक्तिशाली आंतरात्मिक प्रवृत्ती, अनंताशी दोन हात करून, त्या अनंताला प्राप्त करून घेण्याची उत्कट आस, त्याची अतूट अशी धार्मिक भावना, त्याचा आदर्शवाद, त्याचा योगमार्ग, कला आणि तत्त्वज्ञानाकडे असलेला सातत्यपूर्ण कल या गोष्टी भारताच्या रोमारोमांत ठासून भरल्या आहेत.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 07]
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…