आध्यात्मिकता ४७
‘आध्यात्मिकता’ या मालिकेमधून आपण आजपर्यंत आध्यात्मिकता आणि तिचे स्वरूप समजून घेतले, दैनंदिन जीवनामध्ये तिचे आचरण कसे करावे हेदेखील आपण समजून घेतले.
ज्याला एरवी आध्यात्मिकता असे संबोधले जाते त्या जप, तप, नामस्मरण, ध्यानधारणा यांसारख्या गोष्टी हा आध्यात्मिकतेचा केवळ अंशभाग असतो, हे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. तो अंतरंग साधनेचा भाग आहे, परंतु २४ तासापैकी केवळ एखादा तास अशा प्रकारे ‘अध्यात्म’ करायचे आणि उरलेले २३ तास केवळ बाह्यवर्ती चेतनेमध्ये रहात, जीवन व्यतीत करायचे हे ‘पूर्णयोगा’मध्ये अभिप्रेत नाही.
उपरोक्त अंतरंग साधनेमुळे मनाचे उन्नयन होऊ शकेल, पण प्राण आणि शरीर मात्र आहेत तसेच कनिष्ठ प्रकृतीच्या अधिपत्याखाली राहतील, हे ‘पूर्णयोगा’त अभिप्रेत नाही. ‘पूर्णयोगा’मध्ये केवळ मनाचे उन्नयन अपेक्षित नाही, तर त्याच बरोबर प्राणाचे शुद्धीकरण आणि शरीराचे सक्षमीकरण अपेक्षित आहे. सामान्य जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये परिवर्तन घडविणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या मन, प्राण, आणि शरीराचे रुपांतरण आपल्याला घडवायचे आहे.
आपल्याला गाठायचा पल्ला फार दूरचा असल्याने, केवळ एक तासाची अध्यात्मसाधना येथे पुरेशी नाही, तर दिवसातील प्रत्येक तास, प्रत्येक क्षण, आपला प्रत्येक श्वास, आपले प्रत्येक कर्म हीच साधना बनणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे म्हणजे नेमके काय करायचे? या संबंधी श्रीमाताजींनी सूत्ररूपाने काही सांगितले आहे.
चैत्य पुरुष, समर्पण इत्यादी मालिकांमधून आपण आजवर अंतरंग साधनेचा भाग विचारात घेतला होता, त्यामुळे आत्ताच्या या मालिकेमध्ये आपण त्याची पुनरुक्ती केलेली नाही. फक्त संदर्भासाठी म्हणून त्यातील महत्त्वाचा भाग आपण उद्या पाहणार आहोत.
परवाच्या पोस्टमधील भाग थोडासा दीर्घ असणार आहे, पण तो फारच उपयुक्त आहे, असे विनम्रपणे सांगावेसे वाटते. एखाद्या ‘चेकलिस्ट’प्रमाणे आपण संदर्भ म्हणून हरघडी उपयोगात आणू शकतो असे हे लिखाण आहे.
श्रीमाताजी सूत्ररूपाने जे सांगणार आहेत त्याचा भर प्रामुख्याने बहिरंग साधनेवर असणार आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते. २४ तास, प्रत्येक क्षणी, अगदी रोजच्या व्यवहारात राहून, अध्यात्म जगायचे म्हणजे नक्की काय करायचे याचे अगदी सोप्या पद्धतीने उत्तर श्रीमाताजींनी दिले आहे.
उद्याच्या भागात – अंतरंग साधना (शोध कशाचा घ्यायचा?) परवाच्या भागात – बहिरंग साधना (शोध घेताना मार्गक्रमण कसे करायचे?)
संपादक – ‘अभीप्सा’ मासिक
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…