ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अभीप्सेची ज्योत

आध्यात्मिकता ३५

एक अशा प्रकारचे ध्यान असते, ज्या ध्यानामध्ये व्यक्ती कोणत्याही विचारांना थांबविण्याचा प्रयत्न करत नाही, पण शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण जे विचार निव्वळ यांत्रिक स्वरूपाचे असतात, ते तुम्ही थांबविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील, आणि तरीसुद्धा तुम्हाला परिणामाची खात्री देता येणार नाही. म्हणून विचार थांबविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, (अशा प्रकारच्या ध्यानामध्ये) तुम्ही तुमची सर्व चेतना एकवटून, शक्य तितके शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बाह्य गोष्टींमध्ये आता स्वारस्य उरलेले नसल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त करा, आणि मग अचानक, तुमच्या अभीप्सेची ज्योत प्रज्वलित होईल. तुमच्यापाशी जे जे काही येते ते ते सारे तुम्ही या अभीप्सारूपी अग्नीमध्ये हवन करा, ज्यामुळे ती ज्वाला अधिकाधिक उच्च, उच्चतर होत जाईल. तुम्ही त्या अभीप्सारूपी ज्वालेशी एकात्म व्हा आणि उर्ध्वगामी होत, तुम्ही तुमच्या चेतनेच्या आणि अभीप्सेच्या सर्वोच्च बिंदुपाशी जाऊन पोहोचा. अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. ही अभीप्सा वर वर उसळत राहते, ऊर्ध्वगामी होत राहते, ती किंचितदेखील परिणामाचा विचार करत नाही, परिणाम काय होईल किंवा विशेषतः काय होणार नाही याचा क्षणमात्रदेखील ती विचार करत नाही, एवढेच नव्हे तर, वरून काही अवतरित व्हावे अशी इच्छादेखील ती बाळगत नाही तर इथे केवळ, ऊर्ध्वगामी होत राहणाऱ्या अभीप्सेचा आनंद तेवढा असतो. सातत्याने केलेल्या एकाग्रतेमुळे ती अभीप्सा अधिकाधिक उत्कट होत राहते. आणि अशा वेळी मी तुम्हाला खात्री देऊ शकते की जे काही घडेल ते, सर्वोत्तम शक्य असेल तेच घडेल. म्हणजे असे की, तुम्ही जेव्हा हे सारे करता तेव्हा, तुमच्या क्षमता साकार होण्याची ती परम सीमा असते. या क्षमता प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असू शकतात.

पण तुम्ही असे केलेत तर, शांत राहण्याचा प्रयत्न, दृश्य रूपांच्या मागे जाण्याचा प्रयास, प्रतिसाद देणाऱ्या शक्तीला आवाहन, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळावे म्हणून खोळंबून राहणे, या साऱ्या गोष्टींबाबतच्या चिंता, अ-वास्तव असणाऱ्या एखाद्या वाफेप्रमाणे नाहीशा होऊन जातात. तुम्ही या अभीप्सारूपी ज्वालेमध्ये, या ऊर्ध्वगामी झालेल्या अभीप्सेच्या स्तंभामध्ये, जाणीवपूर्वक जीवन जगण्यात जर यशस्वी झालात तर याचा परिणाम अगदी त्वरित जरी आढळून आला नाही तरी, कालांतराने काहीतरी नक्कीच घडून येणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 104-105]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…

12 hours ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…

1 day ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…

2 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…

3 days ago

चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण

साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…

4 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…

5 days ago