ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ध्यान आणि प्रगती

आध्यात्मिकता ३४

एका कोपऱ्यात बसून ध्यान करण्याची क्षमता असणे ही आध्यात्मिक जीवनाची खूण आहे, असे काही जणांना वाटते. ही अगदी सार्वत्रिक कल्पना आहे. मला टिका करायची नाहीये पण, जे लोक त्यांच्या ध्यान करण्याच्या क्षमतेचे मोठे अवडंबर माजवतात त्यांच्यापैकी बहुतांश जण, एक तासाच्या ध्यानाच्या बैठकीमध्ये एक मिनिटसुद्धा खऱ्या अर्थाने ध्यानस्थ होत नाहीत. जे खऱ्या अर्थाने ध्यान करत असतात ते त्याची कधीही वाच्यता करत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ती अगदी स्वाभाविक गोष्ट असते. तुम्हाला जेव्हा ध्यानाची मातब्बरी वाटत नाही आणि तुमच्यासाठी ती एक अतिशय स्वाभाविक अशी गोष्ट होते, तेव्हा तुम्ही प्रगती करत आहात, असे तुम्ही म्हणू शकता. जे लोक ध्यानाविषयी बोलत राहतात आणि ध्यान करतात म्हणून इतरांपेक्षा स्वतःला अधिक श्रेष्ठ समजू लागतात, तेव्हा तुम्ही निश्चित समजा की, ते बहुतांश वेळा पूर्णपणे जडतेच्या स्थितीमध्ये असतात.

ध्यान करणे अतिशय कठीण असते. ध्यानाचे अनेक प्रकार असतात… तुम्ही एक कल्पना करू शकता आणि त्या कल्पनेचा मागोवा घेतघेत एका निष्कर्षाप्रत येऊन पोहोचता, हे ‘सक्रिय ध्यान’ असते; ज्यांना एखादी समस्या सोडवायची असते किंवा ज्यांना काही लिखाण करायचे असते, तेव्हा त्यांच्या नकळतपणे ते अशा प्रकारचे ध्यान करत असतात. काहीजण ध्यानाला बसतात आणि एखाद्या कल्पनेचा मागोवा घेण्याऐवजी ते कोणत्यातरी एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करतात — स्वतःची एकाग्रताशक्ती अधिक तीव्र करण्यासाठी एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिंदूवर लक्ष एकाग्र करता तेव्हा सहसा पुढील गोष्टी घडून येतात : एखाद्या बिंदूवर, मग तो बिंदू मानसिक असो, प्राणिक असो किंवा भौतिक असो, जर तुम्ही तुमची एकाग्रतेची क्षमता पुरेशी एकवटण्यामध्ये यशस्वी झालात तर, तुम्ही एका विशिष्ट क्षणी त्या बिंदुतून आरपार जाता आणि एका वेगळ्या चेतनेमध्ये प्रवेश करता. आणि इतर जण मात्र त्यांच्या डोक्यातून सर्व मानसिक आंदोलने, कल्पना, प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया हटविण्यासाठी व एका खरोखर शांत प्रशांत स्थितीप्रत पोहोचण्यासाठी धडपडत असतात. हे अतिशय कठीण असते; अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी पंचवीस-पंचवीस वर्षे प्रयत्न केले होते पण त्यांना यश आले नाही, कारण असे करू पाहणे म्हणजे बैलाची शिंगे पकडून त्याच्या आधारे बैलाला पकडण्यासारखे आहे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 103-104]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

7 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago