आध्यात्मिकता २७
साधक : श्रीअरविंद यांनी असे लिहिले आहे की, “बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण अधिक महत्त्वाचे असते; एखाद्या व्यक्तीला जर का ते मिळाले आणि व्यक्ती श्वासोच्छ्वास करण्यासाठी आणि त्यामध्ये जगण्यासाठी जर स्वतःचे आध्यात्मिक वातावरण तयार करू शकली तर, ती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असते.” व्यक्तीला असे आध्यात्मिक वातावरण कसे मिळू शकेल आणि व्यक्ती खरे आध्यात्मिक वातावरण कशा रीतीने निर्माण करू शकेल?
श्रीमाताजी : नेमकेपणाने सांगायचे झाले तर, आंतरिक साधनेद्वारे हे वातावरण तयार करणे शक्य असते. तुमचे विचार नियंत्रित करून, त्यांना पूर्णपणे साधनेकडे वळवून; तुमच्या कृती नियंत्रित करून, त्यांना पूर्णपणे साधनेकडे वळवून; सर्व वासना आणि निरूपयोगी, बाह्य, सामान्य गतिविधी संपुष्टात आणून; अधिक उत्कट आंतरिक जीवन जगून आणि सामान्य गोष्टी, सामान्य विचार, सामान्य प्रतिक्रिया, सामान्य कृती यांपासून स्वतःला अलग करून, तुम्ही असे वातावरण निर्माण करू शकता. तुम्ही असे केलेत तर तुम्ही स्वतःभोवती अशा प्रकारचे आध्यात्मिक वातावरण तयार करता.
उदाहरणार्थ, कोणतेतरी सवंग साहित्य वाचणे आणि वायफळ गप्पा मारत बसणे आणि काहीबाही करत बसणे यापेक्षा योगमार्गाचे अनुसरण करण्यासाठी साहाय्यकारी साहित्य तुम्ही वाचलेत, ईश्वरी साक्षात्काराकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टींशी साजेशा कृती तुम्ही केल्यात, सर्व वासना आणि बाह्य गोष्टींकडे वळलेले सर्व भावनावेग तुम्ही तुमच्यामधून नष्ट केलेत, तुम्ही तुमचे मानसिक अस्तित्व शांत केलेत, तुमच्या प्राणिक अस्तित्वाचे शमन केलेत, बाहेरून येणाऱ्या सूचनांपासून तुम्ही स्वत:ला संरक्षित केलेत आणि तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांच्या कृतीपासून स्वतःला संरक्षित केलेत, तर ज्याला काहीही स्पर्श करू शकणार नाही असे आध्यात्मिक वातावरण तुम्ही तयार करता. आणि मग ते वातावरण कोणत्याही बाह्य परिस्थितीवर यत्किंचितही अवलंबून नसते किंवा ते वातावरण तुम्ही ज्यांच्यासोबत राहता किंवा ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहता त्या परिस्थितीवर यत्किंचितही अवलंबून नसते. कारण तुम्ही आता तुमच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये सुरक्षित असता.
पण हे स्पष्ट आहे की, जर तुम्ही सर्व दारे उघडलीत, लोक काय सांगतात हे ऐकत राहिलात, अमुक एकाचा सल्ला, आणि तमुक कोणाच्या अंतःसूचनांचे तुम्ही अनुसरण करत राहिलात, आणि बाह्यवर्ती गोष्टींसाठीच्या वासनांनी वखवखलेले राहिलात, तर तुम्ही स्वत:साठी आध्यात्मिक वातावरण निर्माण करू शकणार नाही. तसे वागलात तर, इतर सर्वसामान्यांसारखेच तुमचे वातावरणही सर्वसामान्यच असेल.
– श्रीमाताजी [CWM 06 : 356-357]
साधना, योग आणि रूपांतरण – २७७ शरीराचे रूपांतरण (श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत...) दीर्घ काळ…
साधना, योग आणि रूपांतरण – २७६ शरीराचे रूपांतरण शारीर-साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. १) जडभौतिकाच्या…
साधना, योग आणि रूपांतरण – २७५ शरीराचे रूपांतरण शारीर-चेतनेचे परिवर्तन करण्यासाठी काही जणांकडून अतिरेक केला…
साधना, योग आणि रूपांतरण – २७४ शरीराचे रूपांतरण व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक…
साधना, योग आणि रूपांतरण – २७३ शरीराचे रूपांतरण हट्टीपणा हा शारीर-मनाचा (physical mind) स्वभावधर्म असतो.…
साधना, योग आणि रूपांतरण – २७२ शरीराचे रूपांतरण व्यक्तीला जेव्हा भौतिक जीवनामध्ये काही परिवर्तन करण्याची…