प्रामाणिकपणा – ३६
आपण ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा ‘असुर’सुद्धा ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते. सुरुवाती सुरुवातीला नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो.
मला एक असे मूल माहीत आहे, की जे स्वत:च खेळता-खेळता एका दारावर धडकले आणि नंतर मात्र त्यानेच त्या दाराला जोरात लाथ मारली. ही गोष्टही अशीच आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक त्या दुसऱ्यानेच केलेली असते. बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी असाच मूर्खपणा करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर मी पण असा वागलो नसतो.’’ पण वास्तविक, हे याच्या अगदी उलट असायला हवे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची असली पाहिजे, भले मग तुमच्या सोबतची ती व्यक्ती, तसे करो वा न करो. यालाच मी ‘प्रामाणिक असणे’ असे म्हणते.
एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात तर तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे. ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्याविषयी तर मी बोलतच नाहीये. मी तुम्हाला सांगते : तुम्ही तुमची वृत्ती कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा, जर तुम्ही भेदकपणे स्वतःचे निरीक्षण केलेत तर, शेकडो वेळा तरी तुम्हाला स्वतःमधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. तेव्हा प्रामाणिकपणे वागणे हे किती कठीण असते हे तुमच्या लक्षात येईल.
– श्रीमाताजी [CWM 05 : 06]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…