ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रामाणिकपणा – २५

प्रामाणिकपणा – २५

प्रश्न : प्रामाणिकपणा म्हणजे खरोखर नक्की काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. बोलायचे एक आणि विचार मात्र वेगळाच करायचा, दावा करायचा एका गोष्टीचा आणि हवी असते भलतीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी प्राथमिक श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये प्रचंड अभीप्सा आहे, असा जोरकसपणे दावा करत असते, तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे ती म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या अगदी विरोधी अशा गोष्टी करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्या दोषांपासून सुटका हवी आहे” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या दोषांना खतपाणी घालते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, त्यांना घालवून देऊ नये म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडते.

…या दुसऱ्या श्रेणीमध्ये व्यक्तीमधील एखादा भाग अभीप्सा बाळगून असतो आणि तो म्हणत असतो आणि तसा विचारही करत असतो, त्याला असे वाटत असते की, आपल्यातील सारे दोष, अपूर्णता या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत; आणि अगदी त्याच वेळी, त्याच व्यक्तीमधील इतर भाग मात्र या दोषांना आणि अपूर्णतांना दडवून ठेवतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला त्यांना कोणी भाग पाडू नये, अशा रीतीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि शेवटी, आपण पुरेसे पुढे गेलो असू, ‘ईश्वरा’बद्दलच्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादाही भाग जोपर्यंत आपल्यामध्ये असतो तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही अत्यंत दुर्मिळ अशी बाब आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीतील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची ती व्यक्ती काळजी घेते, व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

….हा सर्व अप्रामाणिकपणा आहे. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य ‘उपस्थिती’ची चेतना असते, दिव्य ‘संकल्पा’ची चेतना असते आणि जेव्हा व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जणू काही दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध, संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य ‘अस्तित्वा’चा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा येतो. तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

कोणत्याही क्षणी, काहीही झाले तरी, जेव्हा व्यक्तीने स्वत:ला ‘ईश्वरा’प्रत समर्पित केलेले असते, आणि फक्त दैवी संकल्पाचीच ती व्यक्ती इच्छा बाळगत असते, मग त्यावेळी व्यक्तीच्या बाबतीत काहीही घडले तरी, कोणत्याही क्षणी, नेहमी, तिच्या पूर्ण अस्तित्वानिशी पूर्ण मतैक्याने ती व्यक्ती ‘ईश्वरा’ला म्हणू शकते, ईश्वराविषयी तिची अशी भावना असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे.” जेव्हा हे असे उत्स्फूर्त, संपूर्णपणे, समग्रपणे असते, तेव्हा तुम्ही प्रामाणिक असता.

– श्रीमाताजी [CWM 06 : 397-398]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

17 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago