ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सद्भावनेचे सर्वत्र दर्शन

सद्भावना – २७

एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले.

त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा हा एक विधायक मार्ग आहे.”

मला हे फार रोचक वाटले. (हे पत्र काही वर्षांपूर्वी, किमान एक वर्षभर तरी आधी लिहिलेले होते, आणि पवित्रने मला सांगितले की, ते इतर फाईलींमध्ये गहाळ झाले होते, त्यांना ते सापडलेच नव्हते.) आणि ते पत्र जणू मला सांगत होते, “बघ, तू हे आधीच सांगून ठेवले आहेस.” कारण ‘सद्भावना’ म्हणजे सुसंवाद (अर्थात मनोवैज्ञानिक स्तरावरील) होय, सारे काही चांगले व्हावे अशी मानसिक स्तरावरील ती इच्छा असते. मला हे मोठे रोचक वाटले.

पण ते पत्र परत सापडले हे बरे झाले; सद्भावना हे प्रत्येकाच्याच आवाक्यात येऊ शकेल असे एक रूप आहे, जे कोणालाही उमजू शकते. तुमच्याकडून कोणत्याही असाधारण गोष्टींची अपेक्षा केली जात नाही, तर फक्त सद्भावना असावी, एवढीच माफक अपेक्षा केली जाते. मला हे पत्र जेव्हा परत सापडले तेव्हा मी हसले आणि मला ते गमतीशीर वाटले आणि मी म्हणाले, “असेच विधान कदाचित मी प्रसन्नतेबद्दल देखील केले असेल.” मी असे म्हटलेले असेल की, ”प्रसन्न राहा आणि बघा, तुम्हाला सर्वत्र प्रसन्नताच दिसून येईल.” बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. अशा वेळी मला नेहमीच शोभादर्शक यंत्राची (कॅलिडोस्कोप) आठवण येते; ज्यामध्ये काहीतरी निराळेच अभिव्यक्त करण्यासाठी रंगांची अशी एक रचना असते की, ज्या क्षणी ती गोष्ट अभिव्यक्त होते त्याच क्षणी…ती बदलते, नाहीशी होते, साधीसोपी होऊन जाते आणि अंतिमतः ती सर्वांच्या आवाक्यात येते.

पण एक गोष्ट आहे : पृथ्वीवर सध्या एक ‘भयंकर’ संघर्ष चालू आहे, परंतु त्याच बरोबर एक अद्भुत दिव्य कृपाही आहे, जी नेहमीच साहाय्य करत असते, ती नेहमीच अधिक चांगल्यासाठी धडपडत असते आणि दबाव टाकत असते, “या, प्रसन्न राहा, आणि सद्भावना बाळगा, या, समाधानयुक्त आंतरिक सुसंवाद, आशा, श्रद्धा बाळगा. विघटनाची स्पंदने – म्हणजेच ऱ्हासकारक, पतित करणारी, आणि विनाशाच्या दिशेने घेऊन जाणारी स्पंदने स्वीकारू नका.”

– श्रीमाताजी
(Mother’s Agenda, Vol – 08, May 3, 1967)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

3 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago