विचार शलाका – ०५

प्रश्न : आजारपण येणार असे वाटत असेल तर, व्यक्तीने ते कशा प्रकारे थोपवावे?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या शरीरातील कोणालाच ते हवे असता कामा नये. आपण आजारीच पडता कामा नये, अशी तुमच्यामध्ये अतिशय प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. ही पहिली अट आहे.

दुसरी अट अशी की, प्रकाशाला, साम्यावस्थेच्या प्रकाशाला, शांतीच्या, स्थिरतेच्या आणि समतोलाच्या प्रकाशाला आवाहन करून, तो प्रकाश शरीरातील पेशींपर्यंत पोहोचविला पहिजे. पेशी भयभीत होऊ नयेत म्हणून, त्यांचे प्रशासन केले पाहिजे; ही सुद्धा आणखी एक अट आहे.

तुम्ही आजारपणाला आकर्षित करता कामा नये किंवा त्याने घाबरून देखील जाता कामा नये. आजारपणाच्या भीतीमुळे ते नको असेही तुम्हाला वाटता कामा नये. ‘ईश्वरी कृपे’ची शक्ती तुमचे प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करेल याविषयी, तुम्हाला पूर्ण विश्वास आणि धीरयुक्त खात्री असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीचा विचार करा, त्या आजारपणाचा विचार करणे पूर्णपणे सोडून द्या.

जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे, एकतर तुमच्या इच्छेनिशी तुम्ही आजारपणाला नकार दिला असेल आणि देहपेशींमधील भीतीचा पूर्णपणे निरास होईल असा विश्वास त्या पेशींमध्ये ओतला असेल आणि नंतर आजारपणाविषयी यत्किंचितही विचार न करता, तो अस्तित्वात आहे ह्याचा जराही विचार न करता, दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले असेल तर, अगदी संसर्गजन्य रोग झालेल्या लोकांच्या जरी तुम्ही संपर्कात आलात, तरीही तो आजार तुम्हाला होणार नाही.

पण हे कसे करावयाचे हे तुम्हाला माहीत हवे – अनेक जण म्हणतात, “मी काही घाबरलेलो नाहीये.” अशा वेळी, त्या माणसाच्या मनामध्ये भीती नसते, त्याचे मन घाबरलेले नसते, ते कणखर असते, ते घाबरलेले नसते, पण त्याच्या शरीराचा मात्र थरकाप उडालेला असतो आणि त्याला मात्र ते माहीतच नसते, कारण ही भयकंपितता त्याच्या शरीराच्या पेशींमध्ये असते. त्याचे शरीर प्रचंड चिंतेने थरकापत असते आणि त्यातूनच आजारपणाला निमंत्रण मिळते. आणि अशा वेळीच, व्यक्तिने पूर्ण शांतीची स्थिरता व शक्ती आणि ‘ईश्वरी कृपा’ यांवर संपूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWA 07 : 142-143)

विचार शलाका – ०४

भारतीय धर्माने व्यक्तीला सुप्रस्थापित, सुसंशोधित, बहुशाखीय आणि नित्य विस्तीर्ण होत जाणारा असा ज्ञानाचा तसेच आध्यात्मिक वा धार्मिक साधनेचा मार्ग दाखवून दिला.

त्या उच्च पायऱ्यांवर जाण्याची ज्यांची तयारी झालेली नाही त्यांच्याकरिता, भारतीय धर्माने व्यक्तीजीवन व समाजगत जीवन यासंबंधातील व्यवस्था घालून दिली, व्यक्तिगत शिस्त व सामाजिक शिस्त, व्यक्तिगत वर्तन व समाजगत वर्तन या संबंधात एक आराखडा पुरवला; मानसिक, नैतिक व प्राणिक संवर्धनाची चौकट पुरवली. ही व्यवस्था, आराखडा, चौकट मान्य करून कोणीही आपल्या मर्यादेत, आपल्या प्रकृतीला धरून असे वागू शकतो की, अंतत: श्रेष्ठ अस्तित्वात व जीवनात प्रविष्ट होण्याची त्याची तयारी होते.

हिंदूधर्माने…जीवनाचा कोणताही भाग धार्मिक व आध्यात्मिक जीवनाला परका मानला नाही व ठेवला नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 181)

विचार शलाका – ०३

प्राचीन भारतीय सभ्यता चार मानवी हितसंबंधाच्या पायावर स्पष्टपणे उभी केलेली होती – १) वासना आणि भोग २) मन व शरीर यांची भौतिक व आर्थिक उद्दिष्टे व गरजा ३) नैतिक वर्तन व वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा योग्य नियम ४) आध्यात्मिक मुक्ती; म्हणजेच काम, अर्थ, धर्म, मोक्ष.

संस्कृतीचे व समाजसंघटनेचे हे कार्य होते की, त्यांनी नेतृत्व करून, मानवाच्या या हितसंबंधांना आधार देऊन, मानवाचे समाधान करावे आणि या हितसंबंधांची रूपे व हेतु यांचा शक्यतो समन्वय करावा. क्वचित काही अपवाद सोडता, मानवाच्या वरील तीन ऐहिक हेतूंचे समाधान अगोदर, आणि इतर हेतूचा विचार नंतर, अशी व्यवस्था अभिप्रेत होती; अगोदर जीवनाची पूर्णता आणि नंतर जीवनाला मागे टाकून पलीकडे जाणे, अशी व्यवस्था अभिप्रेत होती.

कुटुंबाचे ऋण, समाजाचे ऋण व देवांचे ऋण ही तीन ऋणे फेडण्यात कसूर न व्हावी असा संस्कृतीचा आदेश होता. पृथ्वीचे देणे पृथ्वीला दिले पाहिजे, सापेक्ष जीवनाला त्याची लीला करू दिली पाहिजे. या जीवनाच्या पलीकडे निरपेक्ष केवलाची शांती आहे, पृथ्वीच्या पलीकडे स्वर्गाचे वैभव आहे, म्हणून पृथ्वी व सापेक्ष जीवन यांजकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा संस्कृतीचा आदेश होता. सर्वांनी गुहेत, मठात जावे असा प्रचार या संस्कृतीत मुळीच नव्हता.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 125)

विचार शलाका – ०२

आपण जेव्हा कधी प्रथमत: युरोपीयन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या प्रकाशाद्वारे स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, विश्व उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची सर्व गोळाबेरीज म्हणजे ‘अपराविद्या’ होय पण त्याहून अधिक उच्च अशी एक ‘विद्या’ आहे, महान असे ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो तेव्हा आपण अशा कल्पनेत असतो की आपणच सर्व काही करीत आहोत आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम आणि सर्वशक्तिमान असावी असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा भ्रमाचा आणि ‘माये’चा दृष्टिकोन आहे. एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरात वसलेल्या ‘ईश्वरा’ची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर केवळ बुद्धीच सर्वोच्च आहे असे तो पुन्हा कधीच मान्य करू शकणार नाही. तेथे एक उच्चतर ध्वनी असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. ईश्वराचा अधिवास हा हृदयात असतो. ‘ईश्वर’ मेंदूमार्फत कार्य करतो पण मेंदू हे त्याचे केवळ एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते ते सर्वप्रथम हृदयाला ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदूच्या पलीकडे हृदयापर्यंत जाऊ शकतो तोच ‘शाश्वता’ची वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 891-892)

विचार शलाका – ०१

विचारांना आकार, रूप (form) असते आणि त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिगत जीवन असते. ते त्यांच्या रचयित्यापासून स्वतंत्र असते. ते विचार त्या रचयित्याकडूनच या विश्वामध्ये प्रवाहित करण्यात आलेले असतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून ते विचार या विश्वामध्ये फिरत राहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, तेव्हा तुमचा तो विचार आकाररूप धारण करतो आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि जेव्हा तुमच्या विचारासोबत एखादी इच्छा जोडलेली असते तेव्हा, तो विचाररूपी आकार (thought-form) तुमच्यामधून बाहेर पडून, ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.

उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्याकडे यावी असे वाटत असते, तशी तुमची तीव्र इच्छा असते आणि त्यासोबत, म्हणजे तुम्ही हे जे काही मानसिक रूप तयार केलेले असते त्याच्या सोबत एक प्राणिक आवेगयुक्त अशी इच्छा असते; मग तुम्ही अशी कल्पना करता की, “जर ती व्यक्ती आली तर असे असे घडेल किंवा तसे घडेल.” मात्र कालांतराने तुम्ही ती कल्पना करणे सोडून देता. परंतु तुम्हाला हे माहीत नसते की, तुम्ही जरी विसरून गेलात तरीही त्या विचाराचे अस्तित्व तसेच कायम शिल्लक राहिलेले असते. कारण तो विचार-आकार अजूनही तसाच कायम असतो, तो तसाच कार्यरत असतो, तुमच्यापासून तो स्वतंत्र झालेला असतो आणि त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी फार मोठी शक्ती असावी लागते. आता तो त्या व्यक्तीच्या वातावरणात त्या व्यक्तीला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीमध्ये तुमच्याकडे येण्याची इच्छा निर्माण करतो. आणि जर का तुमच्या विचार-आकारामध्ये पुरेशी इच्छाशक्ती असेल, जर तुम्ही त्याची सुव्यवस्थित रचना केलेली असेल तर, तो विचार स्वतः प्रत्यक्षीभूत होतोच होतो. परंतु रचनेचा काळ आणि ती प्रत्यक्षात येण्याचा काळ यामध्ये काही विशिष्ट अंतर असते. आणि जर दरम्यानच्या काळात तुमचे मन इतर गोष्टींनी व्याप्त झाले तर, असे घडते की तुमच्या या विस्मृत विचारांची परिपूर्ती झालेली असते, तुम्हाला स्वतःलाच आता त्याची आठवण नसते की एकेकाळी तुम्हीच त्या विचाराला खतपाणी दिले होते आणि तुम्हालाच आता जाण नसते की तुम्हीच या कृतीला उद्युक्त केले होते आणि तीच कृती आता तुमच्या समोर उभी ठाकली आहे. आणि असे बरेचदा घडते की, जेव्हा प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो तेव्हा तुमची ती इच्छा नाहीशी झालेली असते किंवा तुम्हाला त्याची पर्वा नसते.

अशी बरीच माणसं असतात की ज्यांच्याकडे अशी रचना करण्याची खूप प्रबळ शक्ती असते आणि नेहमीच त्यांच्या रचना वास्तवात आलेल्या त्यांना पाहावयास मिळतात. पण त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध असे मानसिक आणि प्राणिक अस्तित्व नसल्याने, आत्ता त्यांना एक गोष्ट हवीशी वाटते तर नंतर दुसरीच एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि मग अशा या विविध किंवा विरोधी रचना आणि त्यांचे परिणाम एकमेकांवर आदळतात, त्यांचा परस्परांशी झगडा होतो. आणि मग अशा लोकांना आश्चर्य वाटू लागते की ते एवढे गोंधळाने आणि विसंवादाने भरलेले जीवन का जगत आहेत! परंतु त्यांना हे समजत नसते की, ते त्यांचे स्वतःचेच विचार होते. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या इच्छांनीच त्यांच्याभोवती तशी परिस्थिती घडवली आहे आणि ती परिस्थिती आता त्यांना विसंगत, परस्परविरोधी वाटत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवन हे असह्य कोटीचे झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 50-51)

साधनेची मुळाक्षरे – २६

मानसिक प्रयत्नांचे जिवंत आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीअरविंद यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. त्यातील हा दुसरा मार्ग….

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करावयाची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केले पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर ज्यामुळे शरीरामध्येच बंदिस्त केली गेली होती, त्या झाकणाच्या वर पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना वैश्विक ‘आत्म्या’च्या, दिव्य ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, ‘शक्ती’च्या, ‘ज्ञाना’च्या, ‘आनंदा’च्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येदेखील या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून ती, तेच होऊन जाते. मनामध्ये स्थिरता प्रस्थापित व्हावी म्हणून अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि ‘आत्म्या’चा व ऊर्ध्वस्थित अशा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये (transcendence) चढून तेथे जीवन जगण्याऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते. काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले, तर ते अधिक इष्ट असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 07)

साधनेची मुळाक्षरे – २५

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)
मानसिक प्रयत्नांचे, जिवंत आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची, असे तुम्ही विचारले आहे. तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या क्रिया पृष्ठस्तरावर सुरु असतात ज्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तराच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. हे पृष्ठस्तरीय मन (surface mind) शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या (चेतनेवरील) एकाग्रतेचे उद्दिष्ट असते. पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना आहे तिची दोन मुख्य केंद्र असतात. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते. हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे, आत्म्याचे किंवा चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, तिला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’च्या दिशेने वळवू लागतो, ‘ईश्वरा’च्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या सर्वोच्चाप्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, आमच्या ऊर्ध्वस्थित राहून, आमची वाट पाहात असते, तिचे आमच्या प्रकृतीमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी तो तिला आवाहन करतो. ईश्वराप्रत स्वतःला अर्पण करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि हृदयातील ‘ईश्वराच्या उपस्थिती’ची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.
(या पत्राचा उर्वरित भाग उद्या देत आहोत…)

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06)

साधनेची मुळाक्षरे – २४

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे – ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ईश्वरी ‘शक्ती’ व तिची ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी आत्मरूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा वापर केला जात आहे – हे आपल्याला जाणवले पाहिजे. ‘ईश्वरी उपस्थिती’ जेव्हा सातत्याने आपल्यामध्ये असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो. एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक साक्षात्कारामध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो. ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात येणारा मुक्त व जीवलग बहर तसेच ‘ईश्वराशी संपर्क’ व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा क्षुल्लक गोष्टी जवळ करण्यापेक्षा, जी ईश्वराचा साक्षात्कार प्रदान करू शकते ती ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक उत्तम. आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचे ईश्वरीकरण (divinization) करणे हा देखील, आम्ही जो दिव्य आराखडा पाहत आहोत त्याचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वाला जाऊ शकतो; ही अशी एक गोष्ट आहे की जी एखाद्या मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर अंतरंगातून बाह्य दिशेनेच ती विकसित होत जाते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05-06)

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
ईश्वराचा शोध घेणे हेच आध्यात्मिक सत्याच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या धडपडीचे खरोखर पहिले कारण आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत आहे. एकदा का ईश्वराचा शोध लागला की त्याचे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर दिव्य चेतनेमध्ये करणे; अनंत शांती, प्रकाश, प्रेम, सामर्थ्य, परमानंद यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ईश्वरच होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे होय. पण भौतिक स्तरावर एकतेचे तत्त्व प्रत्यक्ष कृतीत आणणे किंवा मानवतेसाठी कार्य करणे या गोष्टी म्हणजे सत्याचा चुकीच्या पद्धतीने केला गेलेला मानसिक अनुवाद आहे – या गोष्टी आध्यात्मिक साधनेचे पहिले किंवा खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत. आधी आपण आपला आत्मा शोधला पाहिजे, ईश्वर शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला आत्मा किंवा ईश्वर आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपली कर्में ही त्या ईश्वराचा शोध घेण्याची साधने किंवा त्या शोधासाठी साहाय्यक अशी ठरू शकतात पण त्यांचे इतर कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये. जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो, किंवा आपल्यामध्ये ईश्वराचे आध्यात्मिक सत्य जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपली कर्मे ही खरेतर, त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच एकात्म पावली पाहिजेत. पण त्याआधीच आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे आपले जीवन आणि आपली कर्मे काय असावीत हे ठरविणे म्हणजे आंतरिक आध्यात्मिक सत्याच्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05)

साधनेची मुळाक्षरे – २२

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात. भोजनापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी इच्छा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच काही नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत फक्त त्याच शब्दांना अनुमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास अनुमती द्या.

सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, केवळ बाह्य रूपे नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे जणू टाकून दिलेली जीर्ण वस्त्रे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल. आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-35)