विचार शलाका – १५

एकदा का तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात की, तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. मनामधील, प्राणामधील, शरीरामधील भीती, ही भीती तर शरीराच्या पेशीपेशींमध्ये भिनलेली असते; या सर्व प्रकारच्या भीतीपासून सुटका करून घेतली पाहिजे. तुम्हाला योगमार्गावर जे धक्के खावे लागतात त्याचा एक उपयोग म्हणजे या भीतीपासून तुमची सुटका करणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या या भीतीच्या कारणांपासून मुक्त, निर्लिप्त, अस्पर्शित आणि शुद्ध असे त्यांच्यासमोर उभे ठाकू शकत नाही तोपर्यंत ही भीतीची कारणे तुमच्यावर पुन्हापुन्हा हल्ला करतच राहतात. एखाद्याला समुद्राची भीती वाटते तर दुसऱ्या एखाद्याला आगीची भीती वाटते. दुसऱ्याला कदाचित असे आढळेल की, त्याला वारंवार वणव्यापाठीमागून वणव्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या शरीरातील एकूण एक पेशीचे भीतीने थरकापणे बंद होण्याइतपत जोवर तो प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहते. ज्याला तुम्ही घाबरत असता, ती भीती जोवर जात नाही तोवर ती गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यापाशी येत राहते. जो रूपांतरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि जो या मार्गाचे अनुसरण करणारा आहे त्याने पूर्णतः निर्भय बनले पाहिजे. त्याच्या प्रकृतीच्या कोणत्याही भागामध्ये भीतीचा लवलेशदेखील राहता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 57)

विचार शलाका – १४

तुम्ही जर ‘दिव्य चेतने’शी एकरूप झालेले असाल तर, जी गोष्ट करायची आहे ती करायला मानवी गणनेनुसार एक वर्ष लागते की हजार वर्षे लागतात, या गोष्टीला फारसे काही महत्त्व नाही; कारण तेव्हा तुम्ही मानवी प्रकृतीच्या सर्व गोष्टी तुमच्या बाहेर ठेवता आणि ‘दिव्य प्रकृती’च्या अनंततेमध्ये आणि शाश्वततेमध्ये प्रवेश करता. तेव्हा मग, घाईगडबडीच्या अतीव उत्सुकतेच्या भावनेपासून तुमची सुटका झालेली असते. माणसं अक्षरशः या भावनेमुळे पछाडलेली असतात कारण त्यांना गोष्टी पूर्ण झालेल्या पाहायच्या असतात. क्षोभ, घाईगडबड, अस्वस्थता या गोष्टीतून काहीच साध्य होत नाही. या गोष्टी समुद्रावरील फेसासारख्या असतात; जर सतत धावपळ करत राहिले नाही आणि कोणत्यातरी कार्यांत स्वतःला झपाटल्यासारखे गुंतवून घेतले नाही तर, आपण काहीच करत नाहीये अशी माणसांची एक समजूत झालेली असते. या सगळ्या तथाकथित हालचालींमुळे गोष्टी बदलतात असे मानणे हा एक भ्रम आहे. जणू एखादा कप घ्यावा आणि त्यामध्ये पाणी ढवळत राहावे तसे हे आहे. ते पाणी हिंदकळताना दिसते पण तुमच्या त्या ढवळण्याने त्या पाण्यामध्ये तीळमात्रही बदल झालेला नसतो. असा कार्यभ्रम हा मानवी प्रकृतीच्या मोठमोठ्या भ्रमांपैकी एक मोठा भ्रम आहे. यामुळे प्रगतीला बाधा पोहोचते कारण त्यामुळे सतत काहीतरी उत्तेजित हालचाली करत राहण्याची घाई करण्याची आवश्यकता तुम्हाला भासत असते. जर तुम्हाला यातील भ्रम कळेल आणि हे किती निरुपयोगी आहे, त्यामुळे कोणतीच गोष्ट बदलत नाही, हे कळेल तर किती बरे होईल! तुम्हाला यामधून काहीच साध्य होत नसते. अशा रीतीने जे घाईगडबडीत असतात ती माणसं शक्तींच्या हातातील साधने असतात, आणि अशा माणसांना त्या शक्ती स्वतःच्या मनोरंजनासाठी नाचायला लावत असतात; आणि या शक्ती चांगल्या नसतात.

या जगामध्ये ज्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा व्यक्तींकडून घडलेल्या आहेत की ज्या व्यक्ती कृतींच्या पलीकडे, शांतीमध्ये उभ्या राहू शकतात. कारण या व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’ची माध्यमं असतात. अशा व्यक्ती सक्रिय प्रतिनिधी असतात, जागृत साधने असतात. या व्यक्ती अशा शक्तींचे अवतरण घडवितात ज्यामुळे हे विश्व बदलून जाते. गोष्टी अशा प्रकारे घडविल्या जातात, घाईगर्दीच्या कृतीमुळे नाहीत. शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच या विश्वाची रचना झाली आणि जेव्हा कधी खरेखुरे असे काही घडवायचे असते, तेव्हा ते शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच केले पाहिजे. जगासाठी काही करावयाचे तर सर्व प्रकारच्या निष्फळ गोष्टींवर काम करत सकाळपासून रात्रीपर्यंत धावत राहिले पाहिजे, ही समजूत अज्ञानीपणाची आहे.

एकदा का तुम्ही या गरगर फिरणाऱ्या शक्तींपासून मागे हटून शांत प्रांतामध्ये प्रवेश केलात की, मग तुमच्या लक्षात येईल की, तो केवढा मोठा भ्रम होता. माणसं म्हणजे आंधळ्या प्राण्यांचा एक समूह आहे आणि ते काय करत आहेत, ते का करत आहेत हे काहीही माहीत नसताना उगाच धडपडणाऱ्या, एकमेकांवर आदळणाऱ्या आणि ठोकरा खाणाऱ्या प्राण्यांचा तो समूह आहे, असे तुम्हाला वाटू लागेल. आणि यालाच ते कर्म आणि जीवन असे संबोधत असतात. ही तर फक्त पोकळ खळबळ असते, हे कर्म नव्हे, हे खरे जीवन नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 66-67)

विचार शलाका

जीवन आणि आध्यात्मिकता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, असा विचार करणे चुकीचे आहे, हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो.

…’श्रीकृष्ण’ ‘अर्जुना’ला पुन्हापुन्हा अत्यंत तळमळीने सांगत आहे की, “युद्ध कर आणि तुझ्या विरोधकांचा पाडाव कर”. “माझे स्मरण कर आणि लढ!”, “कोणत्याही अभिलाषेपासून मुक्त असलेले कर्म, कोणत्याही स्वार्थी दाव्यांपासून मुक्त असलेले असे कर्म आणि आध्यात्मिकतेने काठोकाठ भरलेल्या हृदयानिशी केलेले सर्व कर्म मला अर्पण कर आणि लढ!” …कुरुक्षेत्राचा सारथी अर्जुनाचा रथ हा उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रामधून घेऊन जात आहे असे कर्मयोगाचे वर्णन आहे, ते कर्मयोगाचे प्रतीक आहे. कारण शरीर हा रथ आहे, इंद्रियं ही त्या रथाला जोडलेले घोडे आहेत आणि या रक्तपात आणि चिखलाने माखलेल्या जगाच्या मार्गावरून, श्रीकृष्ण मानवी आत्म्याला वैकुंठाच्या दिशेने घेऊन जात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 12)

विचार शलाका – १३

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या रात्रींविषयी जागरूक होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊया. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागरूक बनावे अशी ‘ईश्वरा’ची इच्छा असेल तेव्हा मी जागरूक होईन.” दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ‘ईश्वरा’ला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल आणि तुम्ही म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागरूक होईन.” येथे तुम्ही, तसे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ‘ईश्वरार्पण’ करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागरूक बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ‘ईश्वरी’ संकल्पाद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते. तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नव्हे तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही असते पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे जे काही परिणाम असतील ते स्वीकारणे म्हणजे समर्पण. अगदी ते परिणाम तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण. या उलट दुसरीकडे, जर तुमचे समर्पण निष्क्रिय असेल तर तुम्ही काहीच करणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, धडपड करणार नाही; तुम्ही सुखाने झोपी जाल आणि चमत्कार घडण्याची वाट पाहत राहाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19)

विचार शलाका – १२

प्रश्न : आपल्या अस्तित्वामध्ये एकता आणि एकसंधता प्रस्थापित करण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : आपला संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी गतीविधींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरो’न्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, ‘मला तुझे होऊन राहायचे आहे.’ आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून दूर ठेवू शकत नाही. जेव्हा जिवात्मा (the central being) स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि घट्ट असते की, त्यामुळे अशा व्यक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणाला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

विचार शलाका – १०

प्रकृती गुप्तपणे विकास पावत आहे. तिच्या ठिकाणी जे दिव्य ईश्वरी तत्त्व दडलेले आहे ते शोधून काढण्याच्या व त्याची परिपूर्ती करण्याच्या दिशेने प्रकृतीचा गुप्तपणे विकास घडून येत आहे; या विकासाच्या योगाने ‘ते’ दिव्य तत्त्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे, …मन, प्राण, शरीर ही आपल्या प्रकृतीची सर्व रूपे प्रकृतीच्या उपरिनिर्दिष्ट विकासाची साधने आहेत; परंतु मानव म्हणजे मन, प्राण, शरीर एवढेच अस्तित्व नव्हे, त्यांच्या पलीकडे पण तो आहे आणि त्याचे ते पलीकडले जे अस्तित्व आहे, ते त्याच्या पूर्णत्वाची गुरुकिल्ली आहे; तेथून जो प्रकाश येतो त्या प्रकाशात मानवाला त्याच्या अस्तित्वाचे उच्च व विशाल सत्यरूप समग्रतेने दिसू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 617)

विचार शलाका – ११

अतिमानस योगाचा (पूर्णयोगाचा) पहिला शब्द ‘समर्पण’ हा आहे आणि त्याचा अंतिम शब्ददेखील ‘समर्पण’ हाच आहे. दिव्य चेतनेमध्ये उचलून घेण्यासाठी म्हणून, पूर्णत्वासाठी म्हणून आणि रूपांतरणासाठी म्हणून, व्यक्तीची त्या शाश्वत ‘दिव्यत्वा’प्रत आत्मदान करण्याची इच्छा, यापासून या ‘योगा’चा प्रारंभ होतो. आणि निःशेष आत्मदानामध्ये त्याची परिणती होते. कारण जेव्हा आत्मदान पूर्णत्वाला पोहोचते, तेव्हाच या योगाची पूर्णत्वदशा येते, तेव्हाच प्रकृतीचे रूपांतरण होणे, व्यक्तीला पूर्णत्वप्राप्ती होणे आणि अतिमानसिक ‘दिव्यत्वा’मध्ये समग्रतया उन्नत होणे, या गोष्टी घडून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 367)

विचार शलाका – ०८

सर्वसामान्य सिद्धान्त हे खूपच यांत्रिक असतात – पाप आणि पुण्याच्या कल्पनांच्या बाबतीत आणि पुढील आयुष्यातील त्यांच्या फलाबाबतीत देखील तसेच आहे. गतजन्मामध्ये ज्या ऊर्जा उपयोगात आणल्या गेल्या होत्या त्यांचे परिणाम नक्कीच होतात पण इतक्या बाळबोध तत्त्वानुसार ते होत नाहीत. पारंपरिक सिद्धान्तानुसार चांगल्या माणसाच्या वाट्याला आलेले दु:खभोग म्हणजे तो मनुष्य गत जन्मात फार मोठा दुर्जन असला पाहिजे ह्याचा पुरावाच समजला जातो आणि एखाद्या खलपुरुषाच्या वाट्याला जर समृद्धी आली असेल तर त्याच्या गतजन्मामध्ये तो पृथ्वीवर जणूकाही देवदूतासमान असावा आणि त्याने तेव्हा सद्गुणांचे आणि सत्कृत्यांचे खूप धान्य पेरले असावे आणि त्यामुळे त्याला असे हे सद्भाग्याचे पुष्कळ पीक हाती लागले आहे, ह्याचा पुरावा समजला जातो. हे इतके एकसारखे, सममित (symmetrical) आहे की हे खरे असणे शक्य नाही. जन्माचे प्रयोजन हे अनुभवाद्वारे जीवाची वाढ हे होय, गतकर्मांचे परिणाम, प्रतिक्रिया म्हणून जे काही येईल त्याद्वारे जिवाने शिकावे आणि वाढावे असे त्याचे प्रयोजन आहे. वर्गातील चांगल्या मुलांना लॉलीपॉप आणि वाईट मुलांना छडी मारण्यासारखे हे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 533)

विचार शलाका – ०७

व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते.

ही गोष्ट समूहांप्रमाणेच व्यक्तींनादेखील लागू पडते. त्या समूहाच्या धर्माच्या, त्याच्या ध्येयांच्या मूल्यावर, म्हणजे, ज्याला ते त्यांच्या अस्तित्वाची सर्वोच्च गोष्ट मानतात त्यावर त्या समूहांचे मूल्य अवलंबून असते, ते त्याच्या अगदी समप्रमाणात असते.

अर्थातच आपण जेव्हा धर्माविषयी बोलतो, तेव्हा आपल्याला जर ‘प्रमाण धर्म’ असे म्हणायचे असेल तर, व्यक्तीला त्याची जाण असो वा नसो, अगदी ती व्यक्ती ज्या धर्माचा नावलौकिक आहे, परंपरा आहे अशा एखाद्या धर्माशी संबंधित असली तरीही खरोखरच प्रत्येक व्यक्तीला तिचा तिचा एक धर्म असतो. एखादी व्यक्ती जरी त्यातील सूत्रे मुखोद्गत म्हणू शकत असेल, ती व्यक्ती विहित विधी करीत असेल तरीदेखील प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या पद्धतीने धर्म समजून घेते आणि तशी वागते; धर्माचे नाव केवळ एकच असते पण हा समान धर्म, ज्याचे ते परिपालन करीत आहेत असे ते समजतात तो धर्म, प्रत्येक व्यक्तीगणिक समानच असतो असे नाही.

आपल्याला असे म्हणता येते की, त्या ‘अज्ञाता’विषयीच्या किंवा परमश्रेष्ठाविषयीच्या कोणत्याही अभीप्सेच्या अभिव्यक्तीविना मानवी जीवन जगणे हे खूप अवघड झाले असते. प्रत्येकाच्या हृदयात जर अधिक चांगल्या गोष्टीविषयीची, भले ती कोणत्याही प्रकारची असो, आशा नसती, तर जीवन जगत राहण्यासाठीची ऊर्जा मिळविणे व्यक्तीला कठीण झाले असते.

पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 355-356)

विचार शलाका – ०६

प्रश्न : माताजी, सामान्य माणसाच्या जीवनात धर्माची आवश्यकता आहे का?

श्रीमाताजी : समाजजीवनात या गोष्टीची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते. हे लक्षात येण्यासारखे आहे, उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते.

त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो… ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल : मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणीवही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो ते शब्दांत सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी तो आदर्श हे एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल…

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-355)