ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधनेची मुळाक्षरे – ०४

प्रश्न : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “ही मुक्ती, हे पूर्णत्व, ही समग्रतासुद्धा आपण आपल्यासाठी मिळविता कामा नये तर ती आपण ईश्वरासाठी मिळविली पाहिजे.” पण आपण जी साधना करतो ती तर आपल्या स्वतःसाठीच करत असतो ना?

श्रीमाताजी : पण श्रीअरविंद येथे नेमकेपणाने तेच तर सांगत आहेत. त्या मुद्द्यावर भर देण्यासाठीच त्यांनी असे लिहिले आहे. म्हणजे, आपण जे पूर्णत्व संपादन करणार आहोत ते आपल्या वैयक्तिक आणि स्वार्थी हेतुसाठी उपयोगात आणायचे नसून, ईश्वराचे आविष्करण शक्य व्हावे म्हणून, ते ईश्वराच्या सेवेत समर्पित करायचे आहे. वैयक्तिक पूर्णत्वाच्या स्वार्थी हेतुने आपण या विकासासाठी प्रयत्नशील नसून, ‘ईश्वरी कार्य’ सिद्धीस जावे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

प्रश्न : पण आपण हे दिव्य ‘कार्य’ का करतो?

श्रीमाताजी : ईश्वराची तशी ‘इच्छा’ आहे, म्हणून आपण ते करतो. ते आपण आपल्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी करत नाही, आणि ते तसे करता कामा नये. आपण ते करतो कारण ती ईश्वरी इच्छा आहे आणि ते ईश्वरी कार्य आहे.

जोपर्यंत कोणतीही वैयक्तिक आकांक्षा किंवा इच्छाआकांक्षा, किंवा एखादी स्वार्थी इच्छा त्यामध्ये मिसळलेली असते, तेव्हा त्यातून एक प्रकारची भेसळ निर्माण होते आणि मग ती ‘ईश्वरी इच्छे’ची तंतोतंत अभिव्यक्ती राहात नाही. केवळ एकच एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे ‘ईश्वर’ ‘त्याचा संकल्प’, ‘त्याचे आविष्करण’ आणि ‘त्याची अभिव्यक्ती’! आणि त्यासाठीच व्यक्ती इथे आहे, व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ती ईश्वरच आहे. पण जोपर्यंत ‘मी’ पणाची भावना आहे, अहंभावना आहे; जोपर्यंत स्व-व्यक्तित्वाची भावना डोकावत असते, तेव्हा त्यातून असे सिद्ध होते की, व्यक्ती जशी असणे आवश्यक आहे तशी ती अजूनपर्यंत झालेली नाही. हे एका रात्रीत करणे शक्य आहे, असे मला म्हणायचे नाही पण तरीही खरंतर हेच सत्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 189-190)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

7 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

16 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago