ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सामूहिक सूचनांची गर्दी

एकत्व – ०९

 

इच्छावासना आणि त्यासारख्या इतर गोष्टी शंभरापैकी नव्वद वेळा तरी तुमच्याकडे इतर कोणाकडून तरी, किंवा एका विशिष्ट परिस्थितीमधून, किंवा परिस्थितीच्या संचाकडून आलेल्या असतात किंवा एखाद्या दुसऱ्याच व्यक्तिकडून किंवा इतर अनेक लोकांकडून आलेले ते स्पंदन असते. त्यामधील फरक कळणे ही गोष्ट खूपच सोपी आहे, फरक करण्याची पहिली कोणती गोष्ट असेल तर ती हीच. ते एक असे स्पंदन असते की, जे अचानकपणे तुमच्या मधील त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या कशाला तरी जागे करते. कशाचातरी तुमच्यावर प्रभाव पडतो आणि ह्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये एक प्रतिसाद जागा होतो, ज्याप्रमाणे तुम्ही एखादा स्वर वाजवत असता तेव्हा होते तसेच. वासनेचे एक स्पंदन येते आणि विशिष्ट प्रकारे तुमच्यावर हल्ला करते आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देता.

व्यक्ती सातत्याने सामूहिक सूचनांच्या गर्दीमध्ये वावरत असते, अगदी सातत्याने. उदाहरणार्थ, मला माहीत नाही, तुम्ही कधी अंत्ययात्रेला गेलेला आहात की नाही ते, किंवा एखाद्या घरात जिथे व्यक्तिचे निधन झाले आहे, अशा घरात तुम्ही गेला आहात की नाही ते मला माहीत नाही. अर्थातच तुम्ही स्वतःचे थोडेफार तरी निरीक्षण करत असला पाहिजेत, तसे नसेल तर मग तुम्हाला काहीच जाणवणार नाही – परंतु तुम्ही थोडेफार जरी निरीक्षण करत असाल तर, तुमच्या असे लक्षात येईल की, त्या निधन पावलेल्या व्यक्तिबद्दल दुःख वाटावे, शोक वाटावा असे खरंतर काहीच कारण नव्हते; तुमच्या लेखी ती व्यक्ती इतर अनेक व्यक्तिंप्रमाणेच होती. वास्तविक सामाजिक परिस्थितीचा सामायिक परिणाम म्हणून तुम्ही त्या घरी गेलेला असता. आणि तेथे, का कोण जाणे पण एकाएकी, काहीही कळत नसताना, तुम्हाला एकदम खूप दुःख, गहिरे दुःख जाणवते, तशी खूप तीव्र भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, “मी इतकी का बरे दुःखी आहे ?” तर त्याचे उत्तर असे की, ती भावना म्हणजे दुसरी तिसरी काही नसते, तर त्या स्पंदनांनी तुमच्यामध्ये प्रवेश केलेला असतो.

हे निरीक्षण करण्यासाठी अगदीच सोपे आहे. मी अगदी लहान होते तेव्हा हा अनुभव मला आलेला होता. तेव्हाही मी योगसाधना करत होते पण ती जागरुकपणे करत नव्हते. आणि तरीदेखील मी याचे अगदी स्पष्टपणे निरीक्षण केले होते. मी मलाच समजावून सांगितले, “नक्कीच, जे मला जाणवत आहे ते त्या इतरांचे दुःख आहे, कारण त्या व्यक्तिच्या जाण्याचा माझ्यावर काही खास परिणाम व्हावा असे काहीच कारण नाहीये.” आणि त्याचवेळी अचानक माझे डोळे अश्रूंनी भरून आले; गळा दाटून आला आणि मला रडावेसे वाटू लागले, जणू काही मी खूप दुःखामध्ये आहे – मी तेव्हा अगदीच लहान होते पण तेव्हा देखील चटकन माझ्या लक्षात आले की, “त्यांच्या दुःखाने माझ्यामध्ये प्रवेश केला आहे.”

हीच गोष्ट रागाबाबत देखील असते. हे अगदी उघड आहे, व्यक्ती कोणत्यातरी व्यक्तिकडून किंवा वातावरणातून – हो, वातावरणामध्ये तो असतो – त्या वातावरणातून अचानकपणे तो राग तुमच्यामध्ये शिरतो आणि तो सहसा खालून तुमचा ताबा घेतो, तो वर वर चढत जातो आणि तो राग मग तुमच्या मस्तकात जातो. अगदी एक मिनिटापूर्वी तुम्ही शांत असता, तुम्ही अगदी स्वतःमध्ये मग्न असता, तुमचा तोल ढळण्याचे तसे कोणतेच कारणही नसते. आणि अचानक तो राग तुमचा इतक्या ताकदीने ताबा घेतो की, तुम्हाला तो आवरतच नाही कारण तुम्ही पुरेसे जागृत नसता, तुम्ही त्याला खुशाल आत शिरकाव करू देता आणि मग तो तुमचा वापर करतो.. ज्याला तुम्ही स्वतः असे म्हणता, त्याचा वापर तो करतो. म्हणजे तुमच्या शरीराचा ! कारण वरवर पाहता तरी, शरीर हीच तुमच्यातील अशी गोष्ट असते की, जी तुम्हाला तुमच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तिच्या शरीरापेक्षा वेगळी करते. अर्थात, हा सुद्धा एक दृष्टिभ्रम आहे; कारण वस्तुतः सदासर्वकाळ ज्याला सूक्ष्मकण म्हणता येतील असे अगदी भौतिक कण असतात, फाकले जाणारे किरण असावेत तसे ते तुमच्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि इतरांच्या सूक्ष्मकणांमध्ये मिसळत असतात. आणि त्यामुळेच व्यक्ती जर पुरेशी संवेदनशील असेल तर, दुसऱ्याचे अस्तित्व एखाद्या व्यक्तिला दूर अंतरावरून देखील जाणवू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 53-55)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

42 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago