एकत्व – ०७
जर तुम्ही काळजीपूर्वक विश्लेषण केलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुम्ही जे काही विचार करत असता, ते इतरांनी केलेले विचार असतात. त्यांचे ते विचार फिरत असतात आणि तुमच्या मधून जात असतात, परंतु ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तुम्ही त्या विचारांचे निर्माणकर्ते नसता. तुमच्या सर्व प्रतिक्रिया या अनुवंशिकतेतून येतात, ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो, ज्या परिसरात तुम्ही जीवन जगत असता, आजवर ज्या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात, त्यातून तुमची घडण झालेली असते. आणि तुम्हाला वाटत असते की, त्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही आहात. असे असूनसुद्धा ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तर तुम्हाला ते जाणवलेले असतात, तुमच्या अनुभवास आलेले असतात. ते विचार जेव्हा तुमच्यामधून जात असतात, तेव्हा तुम्हाला त्यांची जाणीव होते, पण तुम्ही त्यांचे निर्माणकर्ते नसता, म्हणजे तुम्ही त्या विचारांना जन्म दिलेला नसतो.
उदाहरण द्यायचे झाले तर, असे म्हणता येईल की, ते विचार ध्वनींसारखे असतात. कोणत्याही प्रकारचे ध्वनी घ्या – शब्द, संगीत, कोणतेही ध्वनी – जे एका उपकरणाने ध्वनिमुद्रित केलेले असतात आणि ग्रामोफोनसारख्या दुसऱ्या एका उपकरणाच्या माध्यमातून ते परत वाजविण्यात आलेले असतात, त्याप्रमाणे हे असते. तुम्ही जो ध्वनी ऐकत आहात तो ग्रामोफोनने निर्माण केला आहे, असे तुम्ही म्हणाल का? नाही, असा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही. परंतु तुम्हाला तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भास होत असल्याने, तुमच्या मनाच्या माध्यमातून जे विचार दुसरीकडे जातात, ते विचार अभिव्यक्त होतात, तुमच्या प्राणिक अस्तित्वातून ज्या संवेदना जात असतात, त्यांना अभिव्यक्ती मिळते आणि तुम्हाला असे वाटते की, ते विचार, त्या संवेदना तुमच्याकडून आल्या आहेत, परंतु तुमच्याकडून काहीही येत नाही. निर्माण करण्यासाठी मुळात ‘तुम्ही’च असता कुठे ?
तुमच्या अस्तित्वातील सर्जक वास्तवेची तुम्हाला जाण येण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा जो शाश्वत गाभा आहे, तो शोधावयास हवा, त्यासाठी तुम्ही खूप आत, आत, अंतरंगात गेले पाहिजे.
आणि एकदा का तुम्हाला त्या शाश्वत गाभ्याचा शोध लागला की, तुम्हाला जाणीव होईल की, ती एकच एक अशी एकमेव सद्वस्तु आहे, इतर सर्वांमध्येही तीच सद्वस्तु आहे आणि मग असे असेल तर, तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व शिल्लक रहातेच कोठे? काहीच शिल्लक रहात नाही.
हो, ती केवळ ध्वनिमुद्रण करणारी आणि पुन्हा ध्वनी वाजवणारी उपकरणे असतात आणि त्यामध्ये नेहमीच विकार निर्माण होत राहतात. काही विकार चांगल्यासाठी असतात, काही विकार वाईटासाठी असतात, मुळातील विचारांमध्ये फार मोठे बदल घडण्याचीही शक्यता असते. एका व्यक्तिमधून दुसऱ्यामध्ये ते विचार संक्रमित होत असताना, ते जसेच्या तसे संक्रमित होत नाहीत कारण आंतरिक रचनाच तशा असतात, ते उपकरण अतिशय जटिल असे असते.
परंतु ती एकच आणि समान अशी गोष्ट असते की, जी जागृत संकल्पाद्वारे संचालित होत असते, ती सर्व वैयक्तिक इच्छांपासून स्वतंत्र अशी असते.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 51-52)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…