एकत्व – ०४
जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट अजिबात पटण्याजोगी नसते किंवा ती तुम्हाला अगदी हास्यास्पद वाटते – ‘तो तसा आहे, तो तसा वागतो, तो असे असे म्हणतो, तो अशा अशा गोष्टी करतो.’ – तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हटले पाहिजे, “बरं, ठीक आहे, पण कदाचित मी देखील माझ्या नकळतपणे तशाच गोष्टी करत असेन. टिका करण्यापूर्वी मी माझ्या स्वतःकडेच नीट लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, की मी तीच गोष्ट किंचितशा वेगळ्या पद्धतीने तर करत नाहीये ना ? ह्याची खात्री करून घेतली पाहिजे.” प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचा धक्का बसतो तेव्हा तेव्हा, असा विचार करण्यासाठी लागणारी चांगली जाणीव आणि बुद्धिमत्ता जर तुमच्यापाशी असेल; तर तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये ज्या ज्या अपूर्णता, दुर्बलता आहेत त्या तुम्हाला अगदी सहजतेने आणि अगदी स्पष्टपणे पाहता याव्यात यासाठी, जीवनामध्ये तुमचे इतरांशी असणारे संबंध हे जणू काही एखाद्या आरशाप्रमाणे तुमच्या समोर मांडण्यात येतात.
सर्वसाधारणपणे आणि अगदी निरपवादपणे सांगावयाचे झाले तर, तुम्हाला इतरांमधील जी गोष्ट खटकत असते, अगदी नेमकी तीच गोष्ट तुम्ही स्वतःमध्ये कमीअधिक झाकलेल्या स्वरूपात, कमीअधिक गुप्त स्वरूपात, कदाचित किंचितशा वेगळ्या वेषात बाळगत असता. ही तीच गोष्ट असते जिच्यामुळे तुमची फसगत होत असते. स्वतःमधील जी गोष्ट तुम्हाला फारशी त्रासदायक वाटत नसते तीच जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसते, तेव्हा ती एकदम भयंकर वाटू लागते.
ह्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्याची पुष्कळच मदत होईल. आणि त्यामुळे इतरांबरोबर असणाऱ्या तुमच्या नात्याबाबत तुमच्यामध्ये एक सूर्यवत् सहिष्णुता उदयाला येईल; समजूतदारपणातून येणारी सदिच्छा उदयाला येईल आणि त्यामधून मग बरेचदा, ह्या अगदी निरर्थक झगड्यांचा शेवट होईल.
– श्रीमाताजी
(CWM 10 : 21-22)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…