(इंग्लंड मधील एक स्त्री आश्रमवासी कशी झाली त्याची कहाणी श्रीमाताजी सांगत आहेत…)

वरकरणी पाहिले तर, ती येथे आश्रमात येण्याचे कारण अगदीच मजेशीर होते. ती चारचौघींसारखीच होती, तरुण होती; तिचे लग्न ठरले होते पण ते झाले नाही; तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलेला शब्द पाळला नाही. तेव्हा ती खूप दुःखीकष्टी झाली. ती खूप रडायची आणि त्यामुळे तिचा सुंदर चेहरा खराब होऊन गेला, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. आणि जेव्हा ती त्या दुःखाच्या भरातून बाहेर पडली, तेव्हा तिचे सौंदर्य लोप पावले होते. त्यामुळे ती खूप त्रस्त झाली. सौंदर्यसेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा तिने सल्लादेखील घेतला. त्यांनी तिला चेहऱ्यावर पॅराफिनची इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले, “तसे केलेस तर मग तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाहीत.” तिला इंजेक्शन्स देण्यात आली पण त्यामुळे ईप्सित परिणाम साध्य होण्याऐवजी, तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर त्याच्या गुठळ्या आल्या. ती दुःखाने चूर झाली कारण आता तर ती पूर्वीपेक्षा अधिकच कुरुप दिसू लागली होती.

मग तिला कोणी एक बुवा भेटले आणि त्यांनी तिला सांगितले, ”तुझा सुंदर चेहरा परत मिळविण्यासाठी येथे इंग्लडमध्ये काही उपाय नाहीत. भारतात जा, तेथे मोठेमोठे योगी आहेत, ते तुझे हे काम करतील.” आणि म्हणून ती इथे पाँन्डिचेरीला आली. तिने आल्याआल्या मला विचारले, ”माझा चेहरा किती खराब झाला आहे पाहा ना, तुम्ही मला माझे सुंदर रूप परत मिळवून द्याल का?” मी म्हणाले, “नाही.”

नंतर ती मला योगासंबंधी प्रश्न विचारू लागली आणि तेथेच ती खऱ्या अर्थाने प्रभावित झाली. तेव्हा ती मला म्हणाली, ”या सुरकुत्यांपासून माझी सुटका व्हावी म्हणून खरंतर मी भारतात आले, पण आत्ता तुम्ही मला जे काही सांगत आहात ते मला अधिकच भावते आहे. पण मग मी इथे कशी आले? इथे येण्याचे माझे खरे कारण तर हे नव्हते.”

तेव्हा मी तिला समजावून सांगितले की, “बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा निराळे असेही काही असते. तुझ्यामधील चैत्य पुरुष (Psychic Being) तुला येथे घेऊन आला. चैत्य पुरुषाद्वारे बाह्य प्रेरणा ह्या केवळ निमित्तमात्र म्हणून वापरल्या जातात.”

– श्रीमाताजी
(CWM 05 : 03-04)

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे.

*

अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे.

*

साधकाने योगमार्ग चालणे सुरु केल्यानंतर, आरंभीआरंभी व पुढेही दीर्घ काळपर्यंत त्याला अनुभव किती वेगाने येतील, अनुभवाची व्यापकता किती असेल, त्यांची तीव्रता किती असेल, अनुभवाच्या फलांची ताकद किती असेल हे सारे मूलतः साधकाच्या अभीप्सेवर आणि त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर अवलंबून असते.

वस्तूंच्या बाह्यवर्ती रूपांमध्ये व त्यांच्या आकर्षणात बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेने मानवी आत्म्याचे वळणे की ज्या अवस्थेत मग विश्वरूप आणि विश्वातीत असलेले तत्त्व व्यक्तिरूपी साच्यात उतरून, व्यक्तिरूप साच्याचे परिवर्तन घडवू शकते, ती प्रक्रिया म्हणजे योगाप्रक्रिया होय. म्हणून या सिद्धीचा पहिला निर्णायक घटक असतो तो म्हणजे, आत्म्याला अंतर्मुख करणाऱ्या शक्तीची, आत्माभिमुखतेची तीव्रता.

साधकाच्या हृदयातील अभीप्सेचा जोर, त्याची इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, त्याच्या प्रयत्नांची चिकाटी आणि शक्तीचे उपयोजन करण्याचा त्याचा निर्धार ह्या गोष्टी म्हणजे ती तीव्रता दर्शविणारे मापदंड असतात….

….ईश्वरप्राप्तीचा हा उत्साह आणि ईश्वरप्राप्तीसाठी हृदयाची तळमळ, व्याकुळता ह्या गोष्टी साधकाचा अहंकार नष्ट करतात आणि त्याचा क्षुद्र, मर्यादित असा जो साचा असतो त्याच्या मर्यादा मोडून काढतात. आणि ज्याच्या भेटीसाठी तो तळमळत होता त्याच्या परिपूर्ण व व्यापक स्वागतासाठी जागा करून देतात. आणि त्यामुळे वैयक्तिक आत्मा व प्रकृती ही कितीही मोठी, कितीही उच्च असली तरी, ज्याचे स्वागत करावयाचे ते ईश्वरीतत्त्व हे विश्वरूप असल्याने अधिक व्यापक असते, आणि ते विश्वातीत असल्याने वैयक्तिक आत्म्याच्या अतीत असते.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 56), (CWSA 29 : 60-61), (CWSA 23 : 58)

मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबत खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता. ही खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे.

त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली.

प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, ”ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”

जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत, अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 157-158)