(श्रीमाताजी जाणीव विशाल कशी करावी ह्या संबंधीचे मार्गदर्शन करत आहेत..)
अजून एक मार्ग आहे. तो म्हणजे पृथ्वीवरील सर्व गोष्टींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या गोष्टीविषयीचा तुमचा दृष्टिकोन संकुचित असतो आणि दुसऱ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची धारणा यामुळे तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही तुमची जाणीव बदलून ती दुसऱ्याच्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांच्या विचार करण्याच्या भिन्नभिन्न पद्धतींशी एकरूप होण्याचा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे.

पण हा मार्ग… काहीसा धोक्याचा आहे. कारण दुसऱ्यांच्या विचारांशी आणि इच्छांशी एकरूप होणे म्हणजे त्यांच्या ढीगभर मूर्खपणाशी व वाईट इच्छांशी एकरूप होण्यासारखे आहे. (श्रीमाताजी हसतात.) आणि त्याचे असे काही परिणाम होऊ शकतात की, जे तितकेसे इष्ट नसतात. तरीसुद्धा काही लोक हे सहजपणे करत असतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी त्यांचा दुसऱ्यांशी मतभेद होतो, तेव्हा ते आपली जाणीव विशाल करण्यासाठी दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण आहोत असे समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टींकडे स्वत:च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जाणीव विशाल होते; पण मी आधी सांगितलेल्या पद्धतींमुळे जाणीव जेवढी विशाल होते, तेवढी ती या पद्धतीमुळे होत नाही. त्या पद्धती अधिक निरुपद्रवी असतात. त्या पद्धतींनी तुम्हाला काही अपाय होत नाही, तर त्यांचा तुम्हाला लाभच अधिक होतो. त्या पद्धती तुम्हाला अधिक शांत करतात.

जाणीव व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती लहानशी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय व्हाल ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

जर तुम्हाला अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-346)

प्रश्न : श्रीमाताजी, आम्ही आमची जाणीव व्यापक कशी करावी?

श्रीमाताजी : जाणीव व्यापक करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी व्यापक, विशाल गोष्टीशी स्वत:ला एकरूप करणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, जाणीव यांत तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो किती दूर दूर दूर दूरवर, सर्व बाजूंनी असा पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग आहे, की तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… तुम्ही असा विचार केलात, तर तुम्हाला असे वाटू लागते, की आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणती मर्यादाच नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने व्यापक होण्यात यशस्वी होतात.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-45)

श्रीमाताजी एक आठवण सांगत आहेत : जेव्हा मी पॅरिसमध्ये राहत असे तेव्हा मी सर्व प्रकारच्या स्नेहमेळाव्यांना जात असे; लोक वेगवेगळी संशोधने करत असत; आध्यात्मिक (तथाकथित आध्यात्मिक), गूढवादी संशोधनं इ. जिथे चालत असत तिथे मी जात असे.

एका तरुण स्त्रीला भेटण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मला वाटते ती स्वीडिश तरुणी होती; तिला ज्ञानप्राप्तीची, नेमके सांगावयाचे तर शिकण्याची एक पद्धत सापडली होती. ती तिने आम्हाला समजावून सांगितली. आम्ही तिघीचौघी जणी होतो. तिचे फ्रेंच काही तितकेसे बरे नव्हते; पण ती जे काही सांगत होती त्याविषयी तिला बऱ्यापैकी खात्री होती.

ती म्हणाली, “हे बघा, तुम्ही कोणतीही एक वस्तु घ्या; किंवा फळ्यावर कोणतेही एक चिन्ह काढा किंवा एखादे चित्र काढा. – ते काही तितकेसे महत्त्वाचे नाही – तुम्हाला जे काही सोयीचे आहे ते घ्या. समजा, उदाहरणादाखल मी तुमच्यासाठी हे चित्र काढते.. (तिच्यापाशी फळा होता.) हं तर मी चित्र काढले आहे.”

तिने एक अर्धभौमितिक असे चित्र काढले. ”आता, तुम्ही या चित्रासमोर बसा आणि तुमचे सर्व लक्ष या चित्रावर एकवटा – हे जे चित्र तुमच्यासमोर आहे त्यावर तुमचे लक्ष एकवटा. तुमच्या जाणिवेमध्ये त्या चित्राशिवाय दुसरे काहीही येऊ देऊ नका – केवळ तेच तुमच्या जाणिवेमध्ये असू दे.”

तुमचे डोळे त्या चित्रावरच खिळलेले असतात आणि तुम्ही तुमची नजर अजिबात हटवत नाही. तुम्ही जणू काही त्या चित्राने संमोहित झाल्यासारखे असता. तुम्ही पाहता, तुम्ही पाहता, पाहता, पाहता… काहींना कमी अधिक वेळ लागतो, पण ज्याला त्याची सवय आहे त्याच्याबाबतीत हे काहीसे लगेच घडून येते. तुम्ही पाहत राहता, पाहता, पाहता आणि एकाएकी तुम्ही ज्या चित्राकडे पाहत असता ते चित्रच तुम्ही बनून जाता. त्या चित्राविना या जगामध्ये दुसरे काही जणू शिल्लकच राहात नाही आणि तेव्हा एकाएकी तुम्ही दुसऱ्या बाजूला जाता; आणि जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला जाता तेव्हा तुमचा एका नवीनच चेतनेमध्ये प्रवेश झालेला असतो आणि तुम्हाला ज्ञान होते. हे सारे अद्भुत होते, त्यामुळे आम्ही खूप हसलो. पण हे काहीसे खरे आहे. सराव करण्याजोगी ही एक चांगली पद्धत आहे.

अर्थात, एखादे चित्र किंवा एखादी वस्तु घेण्याऐवजी तुम्ही एखादी कल्पना, काही शब्द घेऊ शकता. तुम्हाला भेडसावणारी एखादी समस्या असते, आणि तुम्हाला त्या समस्येचे उत्तर माहीत नसते. तुम्ही ती समस्या वस्तुनिष्ठपणे मांडा, ती अगदी नेमकी, अचूक मांडा. शक्य असेल तितक्या संक्षिप्त शब्दांमध्ये मांडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा. तुम्ही केवळ शब्दांवर लक्ष केंद्रित करता पण शक्य असेल तर ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात त्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या समस्येवर लक्ष केंद्रित करा. जोवर दुसरे काही शिल्लकच उरणार नाही तोवर त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हे खरे आहे, एकाएकी, तुमच्यामध्ये काहीतरी खुलेपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल. दुसरी बाजू पण कशाची?

ह्याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जाणिवेचे एक द्वार उघडलेले असते. आणि तुम्हाला ताबडतोब तुमच्या समस्येची उकल होते.

‘व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावावे’ हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

एखादा पाण्याचा कालवा असावा तसे आपण असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी आपल्याला जे मिळाले आहे ते प्रवाहित करण्यास आपण संमती दिली नाही तर ते कुंठित होऊन जाते; ते मिळेनासेदेखील होते. एवढेच नाही, तर त्यात जे जे भरलेले आहे तेही बिघडून जाते.

यापेक्षा जर, प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपल्या किरकोळ व्यक्तित्वाने त्या महान वैश्विक प्रवाहाशी स्वत:ला कसे जोडून घ्यावयाचे हे जर त्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 102)

आध्यात्मिक ज्ञानाचे मन ज्या एकमेव उद्दिष्टाकडे वळले पाहिजे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत परब्रह्म होय. या इथे प्रकृतीच्या धुक्याने परिवेष्टित झालेला आणि अभ्राच्छादित झालेला आत्मा, त्या ‘शाश्वता’वर लक्ष स्थिर करून, स्वत:ची स्वाभाविक असणारी अशी अमर्त्यतेची आणि विश्वातीततेची मूळ चेतना पुन:प्राप्त करून घेऊन, तिचा आनंद घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 415)

जर तुम्हाला साधना करावयाची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच फक्त स्वत:साठीच नसलेल्या कामासाठी दिला पाहिजे. अभ्यास करणे तर चांगलेच; त्याची अत्यंत गरजदेखील आहे, एवढेच नव्हे तर ते अनिवार्यसुद्धा आहे. मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे, तुम्ही लहानपणीच काही गोष्टी शिकल्या पाहिजेत; नाहीतर मोठेपणी त्या साधणे अधिकच कठीण होते.

असे एक वय असते की जेव्हा या अभ्यासाचा एक भक्कम पाया तयार झालेला असतो, मग अशा वेळी तुमचा स्वत:चा असा कोणताही हेतू ज्यामध्ये नाही असे काहीतरी तुम्ही केले पाहिजे. कारण जर एखादी व्यक्ती स्वत:मध्येच मग्न राहत असेल तर ती जणूकाही एखाद्या कवचात बंदिस्त झाल्याप्रमाणे होते आणि तेव्हा ती वैश्विक शक्तींना खुली होऊ शकत नाही.

एखादी लहानशी नि:स्वार्थी कृती, अहंकारविरहित एखादी छोटीशी कृती ही व्यक्तीच्या क्षुद्र व अतिशय खुज्या अशा व्यक्तिमत्त्वापलीकडील आगळ्यावेगळ्या अशा गोष्टींसाठीची दालने व्यक्तीला खुली करून देते. व्यक्ती सामान्यत: स्वत:ला एका कवचात बंदिस्त करून घेते आणि जेव्हा एखादा धक्का तिला बसतो किंवा काही संघर्ष होतो तेव्हाच त्या व्यक्तीला इतर कवचांची जाणीव होते.

परंतु सर्वांच्यामध्ये प्रवाहित असलेल्या एका महान शक्तीची जाणीव होणे, मानवी जीवनाच्या व विश्वातील प्रत्येक जीवाच्या परस्परावलंबी स्वरूपाची जाणीव होणे ही एक दुर्मिळ बाब आहे आणि साधनेतील अपरिहार्य अशा अवस्थांपैकी ही एक अवस्था आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 153)