तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा.

याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा शांत दृष्टिकोन स्वीकारणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, अंतरंगामध्ये अशा कोणत्यातरी गोष्टीचा उदय की जी गोष्ट, तुमच्या प्रकृतीमधील काय बदलायला हवे हे पाहते आणि तो बदल घडविण्याचा जोशही देते.

तिसरी गोष्ट म्हणजे, साधनेमधील चैत्य भावना की जी, भक्तीमध्ये वाढ करेल. अशी भावना की जी, ईश्वराचे स्मरण करण्यात, त्याच्या विषयीच्या बोलण्यामध्ये, त्याच्याविषयी लिहिण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये, ईश्वराचा सतत विचार करण्यामध्ये सहजपणाने आनंद अनुभवेल; अशी भावना ही, बाह्यवर्ती गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा अधिकाधिक अगदी शांतपणे ईश्वराभिमुख होऊन, आत्म-उन्नतीमध्ये परिपूर्णपणे वृद्धिंगत होत राहील.

जेव्हा जाणीव ही वरील गोष्टींनी ओतप्रोत भरून जाईल म्हणजे, जेव्हा अशा प्रकारे पूर्ण चैत्य स्थिती असेल, चैत्य खुले झालेले असेल, तेव्हा आपोआप अनुभव यायला लागतील. प्रथम चैत्य खुलेपण आणि त्यानंतर उच्चतर जाणीव व तिचे अनुभव !

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 347-348)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक प्रेरणांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल, तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष पूर्णत: खुला होईल.

जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण वा प्रेरणेची अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन जर योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी, किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची उर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य (Psychic) हे मुक्त होणार नाही, किंवा ते जर मुक्त झालेच तर अंशत:च होईल किंवा कधीकधीच होईल किंवा परत बंदिस्त होऊन जाईल कारण ते प्राणिक कृतींनी झाकले जाईल; चैत्य अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, जर योगसाधनेमध्ये मन अग्रस्थान घेत असेल आणि आंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया ह्या चैत्य रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तर तशीच अ-क्षमता निर्माण होते.

शुद्धता, साधीसुधी प्रामाणिकता आणि कोणत्याही ढोंगाविना वा मागणीविना, भेसळयुक्त नसलेले अनंहकारी आत्मार्पण ह्या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 30: 349)

चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची मान्यताप्राप्त अशी कोणतीही पद्धत नसते. ते अभीप्सेवर, श्रद्धेच्या, भक्तीच्या वाढीवर, मानसिक, प्राणिक अहंकार व त्याच्या गतिविधींची पकड कमी होण्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे जर विकास होत राहिला तर, एका विवक्षित क्षणी चैत्य पुरुष आणि उर्वरित इतर प्राकृतिक घटक यांमधील पडदा पातळ पातळ होत जातो आणि तो फाटायला सुरुवात होते आणि मग चैत्य पुरुष हा अधिकाधिक दृश्य, सक्रिय बनायला लागतो आणि मग तो ताबा घेतो. कधीकधी तर तो अचानकच पुढे येऊ शकतो, परंतु या बाबतीत एकच एक असा कोणताच नियम नाही.

*

सदोदित प्रेम आणि अभीप्सा यांच्या माध्यमातून चैत्य पुरुष पुढे येतो किंवा मन व प्राण हे वरून होणाऱ्या अवतरणाने आणि शक्तीच्या कार्यामुळे सुसज्ज झाले असतील तर, तेव्हाही तो पुढे येतो.

*

हृदयामध्ये वरून होणाऱ्या गतिशील अवतरणामुळे, चैत्य पुरुष पुढे येण्यास साहाय्य होते पण हे नेहमीच आपोआप घडते असे नाही – एवढेच की, त्यामुळे चैत्य पुरुषासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.

*

चैत्य पुरुष पुढे आणावयाचा असेल तर, स्वार्थीपणा आणि मागण्या (ज्या प्राणिक भावनांचा आधार असतात त्या) हद्दपार झाल्या पाहिजेत – किमान, त्या स्वीकारता तरी कामा नयेत.

*

भूतकाळात घडून गेलेल्या किंवा वर्तमानामध्ये घडणाऱ्या कृत्यांपासून मुक्तता करून घेण्याची आणि चैत्य व आध्यात्मिक चेतनेमध्ये जीवन जगण्याची जर एखाद्या व्यक्तीची खरीखुरी प्रामाणिक इच्छा असेल तर, भूतकाळात घडलेल्या वा वर्तमानात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी, चैत्य पुरुषाला अग्रभागी येण्यापासून रोखू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 361)

एक जण मानवी एकतेचा प्रचार करण्यासाठी जगप्रवास करीत होता. मीरा जपानमध्ये असताना, तिची त्या व्यक्तीशी टोकियो येथे भेट झाली. “अमुक अमुक झाले तर किती बरे होईल? प्रत्येकजण सुखी होईल, प्रत्येक जण दुसऱ्याला समजून घेऊ शकेल, कोणीही कोणाशी भांडणार नाही.” अशा कल्पनेचा प्रचार करीत तो जगभर हिंडत असे. लोक त्याला त्याचे नाव विचारत, तेव्हा तो सांगत असे, “मी टॉलस्टॉय.”

लोक अचंबित होऊन विचारत, “ओ, तुम्हीच का ते टॉलस्टॉय?” बिचाऱ्या लोकांना माहीत नव्हते की ‘लिओ टॉलस्टॉय’ आता हयात नाहीत. लोकांना वाटत असे, व्वा ! आपण किती भाग्यवान ! आपल्याला खुद्द टॉलस्टॉय भेटले.

मीरेने त्यास विचारले, “पण ही मानवी एकता कशी साध्य करावयाची?”

तो म्हणाला, “ते तर अगदीच सोपे आहे. प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण एकाच प्रकारचा पोषाख परिधान करेल, प्रत्येक जण सारखेच जीवन जगेल, प्रत्येक जण सारख्याच प्रकारचे जेवण करेल, अगदी सोपे आहे.”

मीरा म्हणाली, “तर मग ही अशी एकता फारच भयंकर असेल.” पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. मीरा मग पुढे काही बोललीच नाही. कारण मीराला काय म्हणायचे होते ते त्याला समजण्याच्या पलीकडचे होते.

वरील तथाकथित मानवी एकतेचे प्रचारक सुविख्यात रशियन साहित्यिक ‘लिओ टॉलस्टॉय’ नव्हते तर तो होता त्यांचा एक मुलगा! आणि मीरा म्हणजे ‘मीरा अल्फासा’ अर्थात श्रीमाताजी.

श्रीमाताजी तेव्हा त्याला जे सांगू इच्छित होत्या ते ‘मानवी एकते’चे श्रीमाताजींच्या मनातील चित्र आज साकारू पाहत आहे ‘ऑरोविल’च्या रूपात!

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, अंधारा काळ हा अपरिहार्य आहे. जेव्हा तुमच्यातील चैत्य सक्रिय असतो तेव्हा कोणत्याही स्पष्ट कारणाविना तुम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवतो. तो काही काळ तसाच टिकून राहतो आणि परत कोणत्यातरी मानसिक किंवा प्राणिक प्रतिक्रिया उमटतात आणि परत मग तुम्ही त्याच त्या अंधारात जाऊन पडता. हे काही काळ चालत राहणार.

हळूहळू प्रकाशमान दिवस हे अधिकाधिक काळ टिकून राहू शकतील आणि बऱ्याच कालावधीनंतर कधीतरी मग अंधारा काळ येईल आणि तो सुद्धा कमी काळासाठी येईल. अंतिमत: जोवर तो अंधारा काळ पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत हे असे चालत राहील. तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवावयास हवे की, ढगांमागे सूर्य दडलेला असतोच, तेव्हा तुम्ही काळजी करण्याचे काही कारण नाही.

तुमच्याकडे एखाद्या बालकाप्रमाणे विश्वास असावयास हवा – हा विश्वास की, कोणीतरी तुमची काळजी घेणारे आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकता.

– श्रीमाताजी

*

जेव्हा अहं-केंद्रितता ही मोठ्या प्रमाणात नाहीशी झालेली असते, तसेच श्रीमाताजींप्रत उत्कट भक्ती असते तेव्हा, चैत्य केंद्र थेट खुले होणे हे अधिक सहजसोपे असते. एक प्रकारची आध्यात्मिक विनम्रता आणि समर्पणाची, विसंबून असल्याची भावना ही आवश्यक असते.

– श्रीअरविंद

*

इच्छावासनांचा परित्याग केल्यामुळे, जेव्हा त्या इच्छावासना व्यक्तीचे विचार, भावभावना, कृती यांचे शासन करेनाशा होतात तेव्हा, आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी आत्मार्पण करण्याविषयीची एक स्थिर अशी अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित होते तेव्हा, कालांतराने चैत्य पुरुष सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWM 14 : 247), (CWSA 32 : 163), (CWSA 30 : 349)

सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि केवळ ईश्वराभिमुख होण्याची इच्छा – ही चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची सर्वाधिक उत्तम साधने आहेत, हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.

जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा; शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाशी संपर्क साधायचा आहे अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा विचार करा. जरी तुम्हाला त्यात ताबडतोब यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 363)

चैत्य शिक्षणाचा आरंभबिंदू असा की, तुमच्यामध्येच अशा कशाचा तरी शोध घ्यावयाचा की, जे तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या जीवनातील परिस्थितीहून स्व-तंत्र असेल; तुम्हाला देण्यात आलेल्या मानसिक घडणीतून त्याचा जन्म झालेला नसेल; तुमची भाषा, तुमच्या प्रथापरंपरा, सवयी, तुमचा देश, युग ह्या सर्वांपासून ते निरपेक्ष, स्व-तंत्र असे असेल.

ज्या युगामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुमचा जन्म झाला आहे, तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता तेथील प्रथापरंपरा, चालीरिती, सवयी, तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा या साऱ्यांच्या सापेक्ष नसणाऱ्या ह्या गोष्टीचा; तुमची घडण ज्या मानसिक ठेवणीमधून झाली त्यामधून जिचा उदय झालेला नाही अशी, तुमचे शरीर आणि तुमच्या जीवनातील परिस्थिती यांच्या सापेक्ष नसलेली, स्व-तंत्र अशी, तुमच्या अस्तित्वामध्येच दडलेली जी एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा शोध घ्यावयाचा हा या चैत्य शिक्षणाचा (Psychic Education) आरंभबिंदू आहे.

तुमच्या अस्तित्वाच्या आत खोलवर अशी एक गोष्ट आहे की, जी स्वत:मध्ये विश्वव्यापकता, अमर्याद विस्तार, अखंड सातत्याची एक भावना बाळगून आहे, त्या गोष्टीचा शोध तुम्ही घ्यावयास हवा.

त्यानंतर तुम्ही स्वत:ला विकेंद्रित करता, विस्तृत करता, व्यापक करता; तुम्ही सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये जगू लागता; एकमेकांना परस्परांपासून विभिन्न करणारे सारे बांध ढासळून पडतात. तुम्ही त्यांच्या विचारांनी विचार करू लागता, त्यांच्या संवेदनांनी स्पंदित होता, त्यांच्या भावभावना तुम्हाला संवेदित होतात, तुम्ही त्यांचे जीवन जगू लागता. आजवर जे जड, अक्रिय वाटत होते ते एकदम जिवंत होऊन जाते, दगडसुद्धा जणु जिवंत होतात, वनस्पतींना संवेदना होतात, त्या इच्छा बाळगतात, त्यांना सुख-दुःख होते, कमीअधिक अस्फुट परंतु स्पष्ट आणि बोलक्या अशा भाषेत प्राणी बोलू लागतात; कालातीत किंवा मर्यादातीत अशा एका अद्भुत चेतनेमध्ये प्रत्येक गोष्ट जिवंत होऊन जाते.

चैत्य साक्षात्काराचा हा केवळ एक पैलू आहे, अजून पुष्कळ पैलू आहेत. तुमच्या अहंकाराचे अडथळे भेदण्यासाठी, तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या भिंती पाडण्यासाठी, तुमच्या प्रतिक्रियांच्या वीर्यहीनतेच्या, आणि तुमच्या इच्छाशक्तीच्या अक्षमतेच्या साऱ्या मर्यादा भेदण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला साहाय्यभूत होतात.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-33)

श्रीअरविंद एकांतवासात असताना, श्रीअरविंदांचे १९२६ ते १९५० या कालावधीमध्ये एकही छायाचित्र काढण्यात आले नाही. आणि नियतीची योजना कशी असते पाहा; १९५० साली म्हणजे ज्यावर्षी श्रीअरविंदांनी देह ठेवला त्यावर्षी श्री. कार्टिअन ब्रेसन हे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आश्रमात आले होते. आश्रमात आल्यानंतर त्यांनी श्रीमाताजींना श्रीअरविंदांचे छायाचित्र घेण्याविषयी परवानगी मागितली. श्रीमाताजींनी मला बोलावून सांगितले, “मी श्री. ब्रेसन यांना छायाचित्र काढण्याची परवानगी दिली आहे. त्यांना काय लागेल ती मदत कर. त्यांना काय हवंनको ते बघ.”

श्री. ब्रेसन यांनी ‘दर्शना’चे छायाचित्र घेतले. श्रीमाताजींनी त्यांना सांगितले होते की, छायाचित्र घेताना फ्लॅशलाईटचा वापर करावयाचा नाही. बिचारे ब्रेसन! फ्लॅशलाईटशिवाय त्यांना छायाचित्र घेणे भाग पडले. त्या काळात कॅमेऱ्याच्या तितक्या प्रगत लेन्सेस नव्हत्या. ब्रेसन श्रीमाताजींना म्हणाले, “या इतक्या मंद प्रकाशात छायाचित्र घेण्याएवढे आपले तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही ह्याचे मला खरंच खूप वाईट वाटतेय. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो.”

‘दर्शना’चे छायाचित्र काढून झाल्यानंतर ‘श्रीअरविंद त्यांच्या खोलीतील नेहमीच्या खुर्चीत बसलेले आहेत’ हे छायाचित्र काढण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. श्रीअरविंद बसलेले आहेत, श्री.ब्रेसन छायाचित्र काढत आहेत, ते श्रीअरविंदांना सांगत आहेत, तुमची मान थोडी अशी करा, थोडे इकडे पाहा, थोडे तिकडे पाहा, इ. इ. आणि ह्या सर्व घटनेचा मी एकटाच साक्षीदार होतो, खूप छान अनुभव होता तो!

छायाचित्र काढून झाल्यानंतर श्री. ब्रेसन मला असे म्हणाले कि, “अजिबात हालचाल न करता किंवा दहा मिनिटांत एकदासुद्धा पापणी न हलवता छायाचित्रासाठी बसून राहिलेले असे मॉडेल मी उभ्या आयुष्यात कधी पाहिले नाही.”

लेखक – श्री. उदार
(One of Mother’s Children : pg.22 – लेखक श्री. उदार)

आत्मज्ञान आणि आत्मनियंत्रण यासाठी जी साधना करणे आवश्यक आहे; त्या साधनेचा आरंभबिंदू म्हणजे ‘चैत्य साधना’ होय. आपल्यामधील आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च सत्याचे स्थान असलेल्या मनोवैज्ञानिक केंद्राला आपण ‘चैत्य’ असे म्हणतो. ते केंद्र, या सर्वोच्च सत्याला जाणून घेऊ शकते आणि त्या सत्याला ते गतिशील, कृतिप्रवण करू शकते. त्यामुळे या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते अस्तित्व हे जोवर आपल्यासाठी एक जिवंत असे वास्तव बनत नाही आणि आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत, त्या अस्तित्वावर लक्ष एकाग्र करणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्या आकलनासाठी आणि अंतिमत: त्याच्याशी तादात्म्य प्राप्त करून घेण्यासाठी अनेकविध पद्धती विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती मनोवैज्ञानिक आहेत, काही धार्मिक आहेत तर काही अगदी यांत्रिक आहेत.

प्रत्यक्षात, प्रत्येक व्यक्तीने तिला सर्वाधिक योग्य असणारी पद्धत शोधून काढावयास हवी आणि जर व्यक्तीकडे अगदी तळमळीची, अविचल अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) असेल, सातत्यपूर्ण व गतिशील इच्छा असेल तर, व्यक्तीला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी मदत म्हणून कोणता ना कोणता तरी मार्ग निश्चितच सापडतो – बाह्यत: पाहता वाचन व अभ्यास, आणि आंतरिकदृष्टीने पाहता एकाग्रता, ध्यान, साक्षात्कार आणि अनुभूती या त्या पद्धती आहेत.

परंतु एक गोष्ट मात्र अनिवार्य आहे; ती म्हणजे शोध घेण्याची आणि साक्षात्कार करून घेण्याची अनिवार इच्छा. त्याचा शोध आणि साक्षात्कार हा आपल्या जीवाचा अगदी मूलभूत असा एकाग्रतेचा विषय असला पाहिजे, हा असा किमती मोती आहे की जो, आपण कोणतीही किंमत देऊन प्राप्त करून घ्यायलाच हवा. तुम्ही काहीही करत असलात, तुम्ही कोणत्याही उद्योगात, कामात व्यग्र असलात तरीही, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढणे आणि त्याच्याशी एकत्व पावणे ही गोष्ट तुमच्यामध्ये नेहमीच जिवंत असली पाहिजे; तुम्हाला जे काही जाणवते, तुम्ही जो काही विचार करता, तुम्ही ज्या कोणत्या कृती करता त्या पाठीमागे कायम तोच ध्यास असला पाहिजे.

आंतरिक शोधाच्या ह्या मोहिमेला पूरक म्हणून, मनाच्या विकसनाकडे दुर्लक्ष न करणे हेसुद्धा हिताचे ठरते. कारण हे मनरूपी साधन खूप साहाय्यकारी ठरू शकते किंवा तितकेच ते मार्गातील मोठी धोंडदेखील ठरू शकते. स्वाभाविक स्थितीत असताना मानवी मनाची दृष्टी नेहमीच संकुचित असते, त्याची समज मर्यादित असते, ते त्याच्या संकल्पनांच्या बाबतीत खूप हटवादी असते आणि म्हणून त्याला व्यापक करण्यासाठी, त्याला अधिक लवचीक आणि अधिक सखोल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे शक्य तेवढे सर्व दृष्टिकोन विचारात घेतले गेले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 4-5)

प्रश्न : आत्मा व्यक्तिभूत होतो आणि क्रमश: चैत्य पुरुषामध्ये रूपांतरित होतो. त्याच्या जलद विकसनासाठी सुयोग्य स्थिती कोणती?

श्रीमाताजी : आत्मा जे प्रगतिशील व्यक्तिरूप धारण करतो त्यामधून चैत्य पुरुष निर्माण होतो, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

कारण आत्मा स्वयमेवच परम ईश्वराचा एक असा भाग असतो की, जो अपरिवर्तनीय आणि शाश्वत असा असतो. चैत्य पुरुष हा प्रगतिशील आणि अमर्त्य असतो.

आत्म-ज्ञानाच्या, आत्म-नियमनाच्या, आत्म-प्रभुत्वाच्या सर्वच पद्धती चांगल्या असतात. जी पद्धत तुमच्या प्रकृतीशी मिळतीजुळती आहे आणि जी सहज स्वाभाविकरितीने तुमच्यापाशी आलेली आहे, अशी पद्धत तुम्ही निवडली पाहिजे. आणि एकदा का ती पद्धत तुम्ही निवडली की, मग मात्र कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले तरी, तुम्ही त्यापासून न ढळता प्रयत्न करत राहिले पाहिजे, तुमची बौद्धिक इच्छाशक्ती तिथे उपयोगात आणली पाहिजे. हे एक असे दीर्घकालीन आणि बारकाव्याने करावयाचे काम आहे की, जे अगदी प्रामाणिकपणानेच हाती घेतले पाहिजे आणि चढत्या वाढत्या प्रामाणिकपणाने, इमानेइतबारे आणि समग्रतेने ते चालू ठेवले पाहिजे. सोपे मार्ग बहुधा कोठेच घेऊन जात नाहीत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 246-247)