(‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की – “प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि कोणतेच रूपांतरण अव्यवहार्य नाही.” या विधानाचे अधिक स्पष्टीकरण करताना त्या म्हणतात.)

प्राणतत्त्वाला स्वत:च्या शक्तीची चांगली जाणीव असते; आणि म्हणूनच प्राणाला महत्त्व आहे. त्याच्या ठिकाणी प्रचंड कार्यशक्ती असल्याने कोणतीच अडचण ओलांडणे त्याला कठीण नसते; पण त्याने योग्य गोष्टीला साथ द्यावयास हवी. त्याने सहकार्य केले तर सर्वकाही अद्भुत रीतीने घडून येईल. पण त्याच्याकडून असे सहकार्य सतत मिळणे हे काही तितकेसे सोपे नाही.

प्राण हा एक चांगला कार्यकर्ता आहे; तो अत्यंत चांगल्या रीतीने कर्म करणारा आहे. पण कर्म करत असताना स्वत:चे समाधान मिळविण्यासाठी तो नेहमी धडपडत राहतो. कर्मामधून त्याला काहीतरी हवे असते, कर्मातला सर्व आनंद त्याला हवा असतो, सर्व फायदा त्यालाच पाहिजे असतो; आणि जेव्हा या ना त्या कारणाने (कारण अशी कारणे अनेक असू शकतात) हे समाधान त्याला मिळू शकले नाही तर तो दु:खी होतो, त्याचे सुख अजिबात नाहीसे होऊन जाते : ”हे बरोबर नाही; मी कर्म करतो आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीच मिळत नाही?” असे म्हणून तो खट्टू होतो. तो जागचा हलत नाही, तो ढिम्म बनतो, काहीच बोलत नाही आणि कधी कधी तर तो असेही म्हणतो, ”म्हणजे मी कोणीच नव्हे, मला अस्तित्वच नाही.” तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व त्राण निघून जातात, तुम्हाला अतोनात थकवा वाटतो, तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही.

आणि एकाएकी ही परिस्थिती अधिकच बिकट होते कारण, मी तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, मनाचे ह्या प्राणतत्त्वाशी बरेच सख्य असते; तर्कसंगत विचार करणाऱ्या मनाची नव्हे तर, भौतिक मनाची ह्या प्राणतत्त्वाशी अगदी घनिष्ठ मैत्री असते. त्यामुळे जेव्हा प्राणतत्त्व म्हणू लागते, “मला अमुक तमुकशी काही कर्तव्य नाही; मला नीट वागणूक मिळालेली नाही, मला त्याच्याशी काहीही संबंध नको आहे,” त्यावेळी साहजिकच हे भौतिक मन प्राणाला पुष्टी देण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्याला सबळ कारणे पुरविण्यासाठी पुढे सरसावते, आणि मग पुन्हा एकदा तीच रडकथा सुरु होते :

प्राणतत्त्व म्हणू लागते, “जीवनात काही अर्थ नाही; खरेच मला या लोकांचा अगदी वीट आला आहे. सर्वच परिस्थिती माझ्यावर उलटलेली दिसते. आता येथून निघून गेलेलेच बरे.” इ. इ.. असे नेहमी नेहमी घडून येते; पण कधी तरी, कुठेतरी बुद्धीचा प्रकाश दिसतो आणि ती म्हणते, “पुरे झाले आता हे सगळे नाटक.”

पण जर का हे प्रकरण फारच बळावले आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण चांगले वागणारे असतील आणि मला जे काय पाहिजे ते तेथे मला करता येईल.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात.

मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून संगनमताने ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली आहे. कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन. हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये पालटते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.

मी याठिकाणी वाईट वृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते : “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीयेत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील,” असे ते म्हणू लागतात. आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना अद्भुत कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून अजून एक!

निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात.

तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी असाच स्तब्ध राहीन.” तर फारच चांगले; कारण जर तुम्ही तसे केले नाहीत तर, तुमचे कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात धुळीस मिळतात.

(श्रीमाताजी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेतील काही भाग वाचतात आणि म्हणतात की, ‘याठिकाणी आता मी तुम्हाला एक दिलासा दिला आहे.” तो भाग असा -)

“ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी इतका पुरेसा संबंध प्रस्थापित केला आहे की, ज्यामुळे ते अभीप्सा-ज्योती व प्राप्तव्य ध्येयाची जाणीव जितीजागती ठेवू शकतात, त्या लोकांच्या बाबतीत असे आणीबाणीचे कसोटीचे प्रसंग फार काळ टिकत नाहीत. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही. (चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, ध्येयाविषयीच्या या जाणिवेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत जागृत होतो.

(श्रीमाताजी आता पुढे विवेचन करत आहेत) आणि आता हा अखेरचा दिलासा. जे कोणी अंत:करणाने खरेखुरे सच्चे आहेत, जे खरेखुरे सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन होऊ शकतात. ज्या ज्या वेळी तुम्हावर असा आघात होईल, असे वादळ तुम्हामध्ये उठेल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नवीन प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल. ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे त्याला रूप येऊ शकेल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, जर तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता जर तुमच्यापाशी असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही रोखून बघितलेत, अगदी जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल. त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 50-52)

तुम्ही या जगामध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट लोकांमध्ये जन्माला आलेले असता. जेव्हा तुम्ही अगदी लहान असता तेव्हा (काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता), तुमच्या सभोवार जे असते ते तुम्हाला अगदी स्वाभाविक असे वाटत असते कारण तुम्ही त्यामध्येच जन्माला आलेले असता आणि तुम्हाला त्याची सवय झालेली असते. परंतु कालांतराने, म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये आध्यात्मिक अभीप्सा जागृत होते, तेव्हा ज्या वातावरणात आजवर तुम्ही राहत होतात त्याच वातावरणात तुम्हाला पूर्णतया आजारी, अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागते. कारण उदाहरणच घ्यायचे झाले तर, ज्या लोकांनी तुमचे संगोपन केलेले असते त्यांच्यामध्ये तुमच्यासारखी आस नसते किंवा तुमच्यामध्ये ज्या कल्पना विकसित होत असतात, त्याच्याशी पूर्णत: विरोधी अशा त्यांच्या कल्पना असतात.

अशावेळी “बघा, असे हे माझे कुटुंब आहे, आता मी तरी काय करू? मला आईवडील, भाऊबहीण आहेत, इ. इ.” असे सांगत बसण्यापेक्षा…तुम्ही शोधार्थ बाहेर पडू शकता (अगदी प्रवासालाच निघाले पाहिजे असे काही मला येथे म्हणावयाचे नाही.) ज्यांना तुमच्याविषयी आत्मीयता वाटते अशा जीवांच्या शोधात, ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखीच अभीप्सा आहे, अशा व्यक्तींच्या शोधार्थ तुम्ही बाहेर पडू शकता. तुमच्याप्रमाणेच कशाच्या तरी प्राप्तीची आस असणाऱ्या व्यक्तींशी तुमची गाठ पडावी अशी अगदी प्रामाणिक आस तुम्हाला असेल तर, ते तुम्हाला या ना त्या प्रकारे भेटतील असे प्रसंग तुमच्या जीवनात नेहमीच येतात, कधीकधी अशी परिस्थिती अगदी अवचितपणे जुळून येते. आणि तुमच्या मानसिकतेशी अगदी मिळतीजुळती मानसिकता असणाऱ्या अशा एक किंवा अधिक व्यक्तींशी जेव्हा तुमची गाठभेठ होते तेव्हा अगदी सहजस्वाभाविकपणे तुमच्यामध्ये जवळीक, आत्मीयता, मैत्री यांचे अनुबंध निर्माण होतात. आणि तुमच्या आपापसांत एक प्रकारचे बंधुत्वाचे नाते तयार होते, त्याला एक खरेखुरे कुटुंब असे म्हणता येईल.

तुम्ही एकत्र असता कारण तुम्ही एकमेकांच्या जवळचे असता. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्यामध्ये समान अभीप्सा असते. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्या जीवनात तुम्ही समान ध्येय प्राप्त करून घेऊ इच्छित असता. तुमच्या परस्परांमध्ये एक प्रकारचा आंतरिक सुसंवाद असतो आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला त्याचे सहजपणे आकलन होते, चर्चा करत बसण्याची गरज भासत नाही. हे खरेखुरे कुटुंब होय, हे अभीप्सा बाळगणारे खरेखुरे कुटुंब होय, हे आध्यात्मिकतेचा संग असणारे खरेखुरे कुटुंब होय.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 258-259)

मी जेव्हा प्रथमच भारतात जपानच्या बोटीतून आले, त्या बोटीवर दोन पाद्री होते. ते दोघेही भिन्न पंथांचे होते. रविवारचा धार्मिक कार्यक्रम कोणी करावयाचा ह्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. बऱ्याच वेळाने त्यापैकी एकाने माघार घेतली, दुसऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. बोटीवर हा कार्यक्रम जिथे होणार होता तिथे जाण्यासाठी खाली उतरून जावयाचे होते. मला वाटते, तेव्हा आम्ही लाल समुद्रातून प्रवास करीत होतो. त्या दिवशी खूप उकाडा होता, पण सर्वांनी जाकीटे घातली होती, टाय लावले होते, चामडी बूट घातले होते, डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, हातामध्ये बायबल ग्रंथ धरलेला होता. सगळे जण तयार होऊन रांगेने जणू काही मिरवणूकच निघाली असावी अशा रीतीने त्या ठिकाणी गोळा झाले. बोटीवरचे जवळपास सर्व लोक त्यामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभागी झाले. प्रार्थना संपली आणि लगेचच कोणी बारमध्ये, कोणी पत्ते खेळण्यामध्ये, कोणी काही तर कोणी काही करण्यामध्ये गुंगून गेले.

नंतर ते पाद्री माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्ही प्रार्थनेला आला नाहीत?”

मी म्हटले, “माझा धर्मावर विश्वास नाही.”

ते म्हणाले,”अच्छा! म्हणजे तुम्ही जडवादी आहात तर!”

मी म्हटले,”नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही नाराज व्हाल, त्यापेक्षा न बोलणेच बरे.”

त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी त्यांना सांगितले,”तुम्ही आणि इतर लोकही प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. तुम्ही केवळ एक सामाजिक कर्तव्य व सामाजिक प्रथा म्हणून प्रार्थना केलीत, त्यामध्ये ईश्वराशी संपर्क साधण्याचा कोणताही भाव नव्हता.”

ते म्हणाले, “पण ते तर आम्हाला जमत नाही.”

मी म्हणाले, “म्हणूनच तर मी तेथे आले नाही. कारण मला त्यात स्वारस्य वाटत नाही.”

– श्रीमाताजी

(CWM 08:149)

आज ज्या प्रकारची ‘लोकशाही’ अस्तित्वात आहे ती काही अंतिम अवस्था नाही किंवा त्या अवस्थेच्या जवळपास जाईल अशीही ती व्यवस्था नाही. कारण दिसताना जरी ती लोकशाही दिसत असली आणि अगदी ती कितीही उत्तम प्रकारे चालत असली तरीही तेथे केवळ बहुमताचेच राज्य चालते; आणि पक्षीय शासनाच्या सदोष अशा पद्धतीद्वारेच ती कार्यरत असते. …आणि अगदी परिपूर्ण अशी लोकशाही म्हटली तरी ती देखील सामाजिक विकसनाची अंतिम अवस्था असणार नाही.

परंतु असे असून देखील, ज्यायोगे आजही समाज-पुरुषाला त्याचे आत्मभान स्वत:हून येऊ शकेल ह्यासाठी आवश्यक असणारी, एक विशाल ‘आधारभूमी’ म्हणजे लोकशाही होय.

– श्रीअरविंद
(CWSA 25 : 456)

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहुतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे.

म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

“पूर्णत्वप्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे स्वत:विषयी जागृत होणे. आपल्या अस्तित्वाचे भिन्न भिन्न भाग व त्या प्रत्येकाची निरनिराळी कार्ये यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे सापडू शकेल… या क्रियांचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, आपण त्याने दिलेला निर्णय मानण्याची मनापासून खरी इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील अप्रमादशील विवेकशक्ती जागृत होण्याची आशा आपण बाळगू शकू.” श्रीमाताजींनी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये वरील विचार मांडले होते.

त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात – आपल्यामधील ह्या आंतरिक हालचालींचा कोठे, कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो.

तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्याजोगे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकच असावी लागते.

सबंध दिवसातील तुमच्या हालचाली, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यावयाची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. तो प्रकाशयुक्त भाग समोर ठेवून, चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्याच्या समोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजेच असे पाहा की, अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली?

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

इतर काही बाबतीत तुम्हाला असे आढळून येईल की, ज्याची छाया पडली ती गोष्ट म्हणजे तुमचा क्षुद्र घृणास्पद अहंकार होता, अगदी काळा; आणि तुमची कृती, तुमचे विचार विकृत करावयास तो आला होता. नंतर हा अहंकार तुम्ही तुमच्या प्रकाशकेंद्रासमोर ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘मला अशी कृती, असे विचार करावयास लावण्यास, ह्या अहंकाराला काय बरे अधिकार आहे?’

त्यासंबंधीचे कोणतेही विसंगत असे समर्थन ग्राह्य न मानता, तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग एका कोपऱ्यामध्ये दिसेल की, जो विचार करत असतो, म्हणत असतो, “नाही, नाही, मला इतर काहीही चालेल पण हे मात्र नाही.”

तुम्हाला असे स्पष्ट दिसेल की, तो भाग म्हणजे क्षुद्र अभिमान, आत्मप्रीती असते. कुठेतरी दडून असलेली अहंकाराची एक छुपी भावना असते, अशा शेकडो गोष्टी असतात.

या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”ह्या अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे का? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही हे केल्यानंतर खरोखरी हे नाटक संपते. मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यावयाच्या राहिलेल्या असतात.

मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. तुम्ही स्वत:शीच म्हणाल, ”काय? मी अशी होते? अवघडच होते माझे सारे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 38-39)

धीर धरा ! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका; तो आशेचा आणि दिलासादायक संदेश आहे. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा !

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी
(CWM 02:44)

सर्वकाही सर्वांचे आहे. ‘एखादी गोष्ट माझी आहे’ असे म्हणणे वा तसा विचार करणे म्हणजे विलगता निर्माण करण्यासारखे आहे, विभाजन करण्यासारखे आहे, असे विभाजन खरोखर वास्तवातच नाहीये.

सर्वकाही सर्वांचे आहे, आपण ज्यापासून बनलो आहोत ते मूलद्रव्य देखील सर्वांचे आहे. क्रमश: होत जाणाऱ्या वाटचालीमधील एका टप्प्यावर, ज्या अणुरेणूंच्या समुदायापासून आपली संरचना झालेली आहे, आणि ज्यांच्यापासून उद्या दुसरीच संरचना तयार होणार आहे, ते अणुरेणू, ते मूलद्रव्यसुद्धा सर्वांचे आहे.

“एखादी कल्पना ही माझी आहे” असे जे म्हणतात आणि इतरांना त्याचा लाभ घेऊ देण्याची परवानगी देणे म्हणजे आपण फार मोठा परोपकार करत आहेत असा ज्यांचा विचार असतो, ते मूर्ख असतात. कल्पनांचे हे विश्वही सर्वांचे आहे आणि बौद्धिक शक्ती हीदेखील वैश्विक शक्ती आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 103)

आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्याच्या’ महान अशा तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला सत्यसूर्याप्रत, परमप्रकाशाप्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. त्यांनी असे सांगितले आहे की : ”तुमची हृदये करूणेने भरून जाऊ देत, आणि त्यानंतर, दुःखपीडेने छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा, प्रशिक्षक व्हा, आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप पेटवा.”

– श्रीमाताजी
(CWM 02 : 29)

(एका आश्रमवासी साधकाने सांगितलेली ही आठवण.)

मी तेव्हा आश्रमात नुकताच राहिला आलो होतो. दुपारी एका आश्रमवासी साधकाने संभाषणाच्या ओघात मला सांगितले की, “काही लोकांना वाटते की मोठमोठे ग्रंथ वाचणे, प्रवचने ऐकणे, तासनतास ध्यानधारणा करणे म्हणजे साधना. परंतु मी म्हणतो की, जर तुम्हाला श्रीमाताजी काय आहेत हे खरोखरी जाणून घ्यावयाचे असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे, तरच तुम्हाला त्यांच्या शक्तिस्रोताचा प्रत्यय येईल.” त्याच्या या शब्दांचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आणि श्रीमाताजींसाठी काम करावयाचे असे मी मनोमन ठरवून टाकले.

नंतर सुमारे एका वर्षानंतरची गोष्ट. माझ्या सोबत एक पगारी कामगार आणि एक मुलगा होता. कामगार होता, तो होता तंत्रज्ञ. आणि मी होतो अगदीच नवीन, मदतनीस मुलाचे काम असावयाचे ते शिडी इकडून तिकडे हलविण्याचे, तो मुलगा बरेच दिवस गैरहजर असायचा. त्याच्या गैरहजेरीत ‘शिडी हलविण्यासारखे क्षुल्लक काम मी का करावे’ या भावनेने तंत्रज्ञ त्याला हातदेखील लावत नसे. अशाने कामाचा खोळंबा होऊ लागला, तेव्हा मी श्रीमाताजींना सुचविले, “आम्हाला दुसरा एक मदतनीस मुलगा देता का?”

त्या म्हणाल्या, “शिडी उचलायला अजून कोणाची मदत कशास पाहिजे? तुम्ही दोघे मिळून एक शिडी उचलू शकत नाही?” नाही म्हटले तरी ‘मी त्यांचा वरिष्ठ आहे’ असा एक भाव माझ्याही मनात होताच. पण श्रीमाताजींचे म्हणणे मान्य करावयाचे मी ठरविले.

दुसऱ्या दिवशी मदतनीसाची वाट न पाहता मी एकटाच शिडी हलवू लागलो. हे पाहून नाईलाजाने का होईना, पण त्या कामगारानेही शिडी उचलण्यास हातभार लावला. अशाप्रकारे, आपल्या सहकाऱ्यांकडून काम कसे करवून घ्यावयाचे ह्याचा धडाच श्रीमाताजींनी मला दिला होता.