ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

एकाग्रतेच्या तीन शक्ती आहेत. या तीन शक्तींचा उपयोग करून आपल्याला आपले साध्य साधता येते.

ज्ञानविषयक एकाग्रता :
कोणत्याही वस्तूवर आपण एकाग्रतेचा प्रयोग केला की त्या वस्तूचे ज्ञान आपण करून घेऊ शकतो; त्या वस्तूची दडलेली रहस्ये तिला प्रकट करावयास लावू शकतो. ही एकाग्रतेची शक्ती अनेक वस्तूंचे ज्ञान होण्यासाठी नव्हे, तर एकमेव सद्वस्तु जाणून घेण्यासाठी आपण वापरावयाची असते. ही झाली ज्ञानविषयक एकाग्रता !

संकल्पविषयक एकाग्रता :
दुसरी असते इच्छाविषयक, संकल्पविषयक एकाग्रता. आजवर जे काही साध्य झालेले नसेल, जे काही आपल्या पकडीबाहेर व पलीकडे असेल, त्याच्या प्राप्तीसाठी सर्व संकल्पशक्ती, सर्व इच्छाशक्ती एकाग्रतेने एकवटता येते. ही शक्ती अगोदर पुरेशी शिक्षित केली असेल, ती पुरेशी एकलक्षी असेल, ती पुरेशी प्रामाणिक व स्वत:विषयी खात्री असणारी, केवळ स्वतःविषयीच श्रद्धा बाळगणारी, अतिबळकट श्रद्धा असणारी अशी असेल तर ती एकाग्रतेची शक्ती कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी वापरता येते. परंतु ह्या जगाकडून ज्या साऱ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, त्या मिळविण्यासाठी ही शक्ती न वापरता, पुरुषार्थाच्या योग्यतेचा आणि ज्ञानप्राप्तीच्या योग्यतेचा जो एकमेव विषय – आत्मा – त्याच्या प्राप्तीसाठीच आपण ती शक्ती उपयोगात आणली पाहिजे.

अवस्थाविषयक एकाग्रता :
आता एकाग्रतेच्या तिसऱ्या शक्तीकडे वळू. आपले सर्व अस्तित्व स्वत:च्या कोणत्याही विशिष्ट अवस्थेचे, तिच्या प्राप्तीसाठी एकाग्रतेने चिंतन करील, तर आपल्याला ही विशिष्ट अवस्था प्राप्त करून घेता येते. उदाहरणार्थ, समजा आपण दुबळेपणा व भीती यांचा गोळा असू आणि प्राप्तव्य म्हणून बळ व धैर्य यांचे एकाग्रतेने चिंतन करू तर, आपण बळ व धैर्य यांचा पुंज बनू शकतो. अशाच रीतीने, आपण महान शुद्धता, पावित्र्य आणि शांती ह्यांचे स्थान बनू शकतो; अशाच रीतीने आपण प्रेमाचा एकच एक असा विश्वव्यापी आत्मा बनू शकतो. परंतु, असे म्हटले जाते की, आपण आत्ता ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीच्या तुलनेत वर वर्णिलेली स्थिती कितीही उच्च असली तरी सुद्धा, ह्या गोष्टी मिळविण्यासाठी देखील ही एकाग्रता शक्ती उपयोगात आणता कामा नये. तर सर्व गोष्टींच्या अतीत असणारी, सर्व कृती आणि लक्षणे यांच्यापासून मुक्त असणारी, जी एकच एक शुद्ध आणि केवल सद्वस्तु, ती बनण्यासाठी ही शक्ती उपयोगात आणली गेली पाहिजे.

इतर सर्व काही, इतर सर्व प्रकारची एकाग्रता ही पूर्वतयारी म्हणूनच केवळ मोलाची असते. दुराचाराकडे घेऊन जाणाऱ्या आणि आत्मतत्त्वापासून दूर नेणाऱ्या विचारांना, इच्छेला आणि जीवाला त्या भव्य आणि एकमेवाद्वितीय सद्वस्तुकडे घेऊन जाण्याचे, क्रमाक्रमाने प्रशिक्षण देण्यासाठीच्या, आधीच्या पायऱ्या म्हणूनच केवळ त्यांचे मोल असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 318)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

44 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago