मानसिक तपस्येचा प्रश्न असे म्हणताच, विचारनियंत्रण आणि त्याची परिणती म्हणून आंतरिक शांती प्राप्त करून देणाऱ्या दीर्घ ध्यानाची कल्पना मनात येऊ लागते. योगसाधनेमधील ध्यानाभ्यास इतका प्रसिद्ध आहे की, त्याविषयी अधिक लिहिण्याची जरूरी नाही.
पण साधारणत: लोकांचे लक्ष जात नाही असे योगाभ्यासांत अंतर्भूत असलेले दुसरेही एक अंग आहे. ते अंग म्हणजे वाक्संयम. काही अगदी थोडे अपवाद सोडले, तर बहुधा बोलण्यातील स्वैरपणास आळा घालण्यासाठी संपूर्ण मौनाचाच मार्ग स्वीकारावा, असे सांगितले जाते. पण तरीही बोलणे अजिबातच बंद करण्यापेक्षा त्यावर संयम मिळविणे ही अधिक मोठी व अधिक लाभदायक अशी तपस्या आहे.
शब्दोच्चाराचा उपयोग करू शकणारा पृथ्वीवरील पहिला प्राणी मनुष्य हाच आहे. पण त्याचबरोबर या वाक्शक्तीचा त्याला विशेष अभिमान असून, कोणताही संयम व विवेक न बाळगता, तो त्याचा उपयोग करतो. त्याच्या शब्दांच्या गोंगाटाने जगाचे कान बधीर झाले आहेत; आणि कधी कधी तर वनस्पतिसृष्टीत आढळून येणाऱ्या सांमजस्यपूर्ण शांतीसही मनुष्य पारखा झाल्यासारखे दिसते.
शिवाय, मानसिक शक्ती जितकी कमी, तितका वाणीचा जास्त उपयोग करावा लागतो ही गोष्टही सर्वांना चांगलीच माहीत आहे. उदाहरणार्थ, अगदी आदिम काळातील माणसे किंवा अशिक्षित माणसे; की ज्यांना बोलल्याशिवाय मुळी विचारच करता येत नाही आणि कमीअधिक मोठ्याने ते स्वत:शी काहीतरी शब्द पुटपुटताना आपल्याला दिसतात. कारण, विचारप्रवाहाचे अनुसरण करण्याचा त्यांच्याकडे तो एकच मार्ग असतो. शब्दोच्चाराशिवाय त्यांच्या ठिकाणी विचाराला मूर्त रूप येऊच शकत नाही.
आपल्याला काय म्हणावयाचे आहे हे प्रत्यक्ष बोलल्याशिवाय ज्यांना कळत नाही असे कितीतरी लोक सुशिक्षितांतही असतात. कारण, ते सुशिक्षित असले, तरी त्यांची मानसिक शक्ती दुर्बळ असते. त्या मुळेच त्यांचे बोलणे संपता संपत नाही आणि कंटाळवाणे होते. कारण, ते बोलू लागले म्हणजेच त्यांचे विचार अधिकाधिक स्पष्ट आणि नेमके होऊ लागतात. त्यामुळे जे काही सांगावयाचे, ते तंतोतंत बरोबर सांगता येईपर्यंत तीच गोष्ट पुन:पुनः सांगणे त्यांना भाग पडते.
असेही काही लोक असतात की, त्यांना जे काही बोलावयाचे असते त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. आयत्या वेळी काही बोलण्याची वेळ आली, तर ते अडखळतात, कारण त्यांना नेमके जे काय म्हणावयाचे असते त्याकरता योग्य शब्दांची क्रमवार सुसंगत जुळणी करण्यास त्यांना आधी वेळच मिळालेला नसतो.
शेवटी, वाणीवर संपूर्ण प्रभुत्व असलेले असेही काही जन्मजात वक्ते असतात. त्यांना जे काही व्यक्त करावयाचे असते, त्यासाठी त्यांना अगदी सहज योग्य शब्द सुचतात आणि त्यामुळे त्यांच्या मनातील आशय ते चांगल्या रीतीने व्यक्तही करतात.
तरीपण, मानसिक तपस्येच्या दृष्टीने या सर्वच गोष्टी ‘वायफळ बोलणे’ या सदरांत मोडतात. कारण, अगदी अटळ, अनिवार्य शब्दांखेरीज कोणताही शब्द उच्चारणे याला मी ‘वायफळ बोलणेच’ म्हणेन. पण हे ओळखावयाचे कसे? असे कोणी विचारील. त्यासाठी उच्चारित शब्दांच्या विविध प्रकारांचे व्यक्तीस ढोबळमानाने वर्गीकरण करावे लागेल.
सुमेळ व प्रगतीसाठी विचार करून नंतर बोला –
प्रथमत: भौतिक जगात व्यवहारासाठी आपण वापरतो ते शब्द. अशा शब्दांची संख्या फार मोठी असून सामान्य जीवनात त्याचाच उपयोग बहुतेक वेळा सर्वात अधिक असतो.
दररोजच्या कामासोबत शब्दांचा एकसारखा गोंगाटही जणू अनिवार्यच होऊन बसलेला दिसतो. तरीही हा गोंगाट कमीत कमी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात, तर शांततेत कितीतरी गोष्टी अधिक चांगल्या आणि जलद करता येतात असे तुम्हास दिसून येईल. त्याचप्रमाणे आंतरिक शांती आणि एकाग्रता टिकविण्यासाठीही त्याचे फार साहाय्य होते हेही तुमच्या ध्यानी येईल.
तुम्ही एकटे नसाल, इतरांबरोबर राहत असाल, तर अशी सवय स्वत:मध्ये विकसित करा की, एकसारखे मोठ्याने बोलून स्वत:स तुम्ही बहिर्मुख करणार नाही. असे केल्याने तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये हळूहळू एक प्रकारची आंतरिक समजशक्ती निर्माण झाली आहे असे तुम्हास दिसून येईल. त्यानंतर अगदी थोड्या शब्दांत किंवा काही न बोलताही तुम्ही परस्परांत व्यवहार करू शकाल. अशी ही बाह्य शांतता, आंतरिक शांतीसाठी अत्यंत अनुकूल असते; आणि त्याच्या जोडीस तुमच्या ठिकाणी सदिच्छा व अखंड अभीप्सा असेल तर तुमच्या प्रगतीस अत्यंत पोषक असे वातावरणही तुम्ही तुमच्या भोवती निर्माण करू शकाल.
सामाजिक जीवनात, भौतिक जीवन आणि व्यवसायादींशी संबंधित वापरावयास लागणाऱ्या शब्दांप्रमाणेच संवेदना, मनोवृत्ती आणि भावभावना व्यक्त करणारे देखील शब्द असतील. येथे बाह्य मौनाची सवय अत्यंत साहाय्यकारी ठरते. कारण, जेव्हा तुमच्यावर एखाद्या भावनेच्या वा संवेदनाच्या तरंगाचे आक्रमण होते, त्यावेळी तुमची ही मौनाची सवय तुम्हाला सारासार विचार करावयास सवड मिळवून देते आणि आवश्यकता पडल्यास, संवेदना वा भावना शब्दांद्वारे व्यक्त करण्यापूर्वी तुम्ही स्वत:वर परत ताबा मिळवू शकता. असे केले तर कितीतरी भांडणे टळतील. केवळ वाणीवर संयम नसल्यानेच निर्माण होणाऱ्या कितीतरी मानसिक अनर्थांपासून व्यक्तीचा बचाव होऊ शकेल.
अशा रीतीने कोणताही अतिरेक न करता, व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नेहमी संयम ठेवला पाहिजे. क्रोध, हिंसा आणि संताप यांच्या आवेगाच्या आहारी आपल्या जिभेला कधीही जाऊ देता कामा नये. भांडणाचे परिणाम वाईट असतात म्हणूनच नव्हे, तर त्यामुळे वातावरणांत अनिष्ट स्पंदने फेकण्यास व्यक्ती आपल्या जिभेला वाव देते, म्हणून ही गोष्ट वाईट आहे कारण, ध्वनींच्या स्पंदनांएवढी दुसरी कोणतीच गोष्ट इतकी सांसर्गिक नसते. वरील भावावेगांना व्यक्त होण्याची संधी देऊन व्यक्ती स्वत:मध्ये आणि इतरांमध्येही अशा गोष्टी चिरस्थायी करावयास संधी देते.
-श्रीमाताजी
(CWM 12 : 57-58)
साधना, योग आणि रूपांतरण – २२७ सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’…
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…