प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.
मानवाला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक जाणिवेमध्ये जगणारा मानव हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, सत्य-चेतना प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी मानवाला सांगितले. ही सत्यचेतना, जिला ते ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधत असत, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 116)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…