Tag Archive for: सुसंवाद

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)

सद्भावना – १५

ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीद्वारेच अंतरंगातील एकाकीपण दूर होऊ शकते, कोणतेही मानवी संबंध ही पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक आपुलकीवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य यांच्यावरच आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वर’ गवसतो आणि व्यक्ती ‘ईश्वरा’मध्ये इतरांना पाहू लागते तेव्हा, खरा सुसंवाद घडून येतो. दरम्यानच्या काळात, सामायिक दिव्य ध्येयाबद्दल असलेल्या भावनेच्या आधारावर आणि आपण सारी एकाच ‘माते’ची लेकरे आहोत, या भावनेच्या पायावर सद्भावना आणि एकोपा साधता येणे शक्य आहे. आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक पायावरच खरा सुसंवाद निर्माण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 310-311)

एखादी व्यक्ती जोपर्यंत तुमच्या कल्पना आणि तुमच्या मतांशी सहमत होत नाही तसेच तिची कार्यपद्धती तुमच्या कार्यपद्धतीशी मेळ राखणारी नसते, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंवाद साधू शकत नाही, त्यातून सर्व त्रास निर्माण होतात.

तुम्ही तुमची चेतना अधिक विशाल केली पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीचे तिचे तिचे स्वतःचे असे काही नियम असतात. सर्वांच्या इच्छा आणि कृती अगदी एकसारख्याच असल्या पाहिजेत, असा अट्टहास करता कामा नये; तर वैयक्तिक इच्छांच्या आनंददायी एकीकरणामधून, सुसंवाद आणि समजुतदारपणाचा आधार शोधणे आवश्यक असते.

*

आपला विरोधक कसा चुकीचा आहे आणि आपण कसे बरोबर आहोत, हे सिद्ध करण्यातील आपला उतावीळपणा हा प्रगतिशील सुसंवाद प्रस्थापित करण्यातील एक महत्त्वाचा अडथळा असतो.

*

मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. त्यांच्या स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच त्यांना समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्यांना सहन होत नाही.

*

जी व्यक्ती केवळ स्वतःचेच मत विचारात घेते ती अधिकाधिक संकुचित होत जाते.

*

प्रत्येकालाच समाधान देऊ शकेल असा प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो; परंतु हा आदर्श उपाय शोधण्यासाठी, आपले स्वतःचेच अग्रक्रम इतरांवर लादण्याची इच्छा मनाशी बाळगून तसा प्रयत्न करता कामा नये तर, प्रत्येकालाच त्याची आवश्यकता वाटली पाहिजे.

यासाठी तुमची चेतना विशाल करा आणि सर्वांच्या समाधानाची आस बाळगा.

*

तुम्ही प्रश्नाकडे केवळ तुमच्याच बाजूने पाहता, पण तुम्हाला जर तुमची चेतना विशाल करायची असेल तर, सर्वच बाजूंकडे निःपक्षपातीपणे पाहणे कधीही चांगले. त्यानंतर तुम्हाला असे आढळून येईल की, या दृष्टिकोनाचे खूप फायदे आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 266-268)