Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ६३

(साधना, उपासना काहीच घडत नाहीये असे वाटावे) अशा प्रकारचे कालावधी नेहमीच असतात. तुम्ही अस्वस्थ होता कामा नये, अन्यथा ते कालावधी दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात आणि साधनेमध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि कोणत्याही आवेशाविना स्थिरपणे अभीप्सा बाळगली पाहिजे. किंवा तुम्ही परिवर्तनाच्या दृष्टीने जोर लावत असाल तर तोसुद्धा अविचल, स्थिर असला पाहिजे.

*

नेहमीच काही कालावधी असे असतात की, जेव्हा तुम्ही शांत, स्थिर राहून फक्त अभीप्साच बाळगू शकता. जेव्हा संपूर्ण अस्तित्व सज्ज झालेले असते आणि अंतरात्मा सातत्याने अग्रभागी आलेला असतो तेव्हाच फक्त प्रकाश आणि शक्तीची अव्याहत क्रिया शक्य असते.

*

चेतना झाकोळली गेली आहे (असे वाटण्याचे) असे कालावधी प्रत्येकाच्या बाबतीतच येत असतात. तसे असले तरी, तुम्ही साधना करत राहिले पाहिजे आणि तुम्ही ‘श्रीमाताजीं’कडे कडे वळलात आणि तुमच्या अभीप्सेमध्ये सातत्य ठेवलेत तर, असे कालावधी हळूहळू कमी होत जातील आणि मग तुमची चेतना ‘श्रीमाताजी’प्रति अधिकाधिक खुली होत जाईल.
अशा कालावधींमध्ये (निराशा, वैफल्य, निरसता इत्यादी) गोष्टींना तुमचा ताबा घेऊ देण्यास मुभा देऊ नका, त्याऐवजी, तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलग केले पाहिजे आणि त्या गोष्टी जणू काही परक्या आहेत आणि तुम्हाला त्यांना नकार द्यायचा आहे, असे समजा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 63)

साधना, योग आणि रूपांतरण – ६२

अभीप्सेच्या शक्तीमधील आणि साधनेच्या ऊर्जेमधील चढ-उतार अटळ असतात. आणि जोवर साधकाचे संपूर्ण अस्तित्व हे रूपांतरणासाठी तयार झालेले नसते तोवर सर्वच साधकांच्या बाबतीत हे चढ-उतार नेहमीचेच असतात. अंतरात्मा जेव्हा अग्रभागी आलेला असतो किंवा तो सक्रिय असतो आणि मन, प्राण त्याला सहमती दर्शवितात तेव्हा तेथे उत्कटता आढळून येते.

परंतु अंतरात्मा जेव्हा तितकासा अग्रेसर नसतो आणि कनिष्ठ प्राण जेव्हा त्याच्या सामान्य गतिविधी बाळगून असतो किंवा मन हे त्याच्या अज्ञानी कृतीमध्ये मग्न असते आणि तेव्हा जर साधक अगदी सतर्क नसेल तर विरोधी शक्ती साधकामध्ये प्रवेश करतात. सहसा सामान्य शारीरिक चेतनेमधून जडत्व येते. विशेषतः जेव्हा साधनेला प्राणाचा सक्रिय आधार मिळत नाही, तेव्हा जडत्व येते. उच्चतर आध्यात्मिक चेतना सातत्याने अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये खाली उतरवीत राहिल्यानेच या गोष्टींचे निवारण करणे शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 61)

साधना, योग आणि रूपांतरण – ६१

(साधनेमध्ये काही कालखंड प्रगतीचे तर काही कालखंड नीरसपणे जात आहेत अशी तक्रार एका साधकाने केलेले दिसते. त्याला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही ज्या चढ-उतारांविषयी तक्रार करत आहात, त्याचे कारण असे की, चेतनेचे स्वरूपच तशा प्रकारचे असते; म्हणजे, काही काळ जागे राहिल्यानंतर थोडी निद्रेची गरज भासते. बरेचदा सुरुवातीला सजग अवस्था थोड्या वेळासाठी असते आणि निद्रा दीर्घ असते; नंतर दोन्हीचा कालावधी समसमान होतो आणि त्यानंतर निद्रेचा कालावधी कमी-कमी होत जातो.

या चढ-उतारांचे आणखी एक कारण असे असते की, जेव्हा तुम्ही ग्रहण करत असता तेव्हा, ते आत्मसात करण्यासाठी तुमच्या प्रकृतीला स्वतःला बंदिस्त करून घेण्याची गरज जाणवते. कदाचित तुमची प्रकृती खूप जास्त ग्रहण करू शकते परंतु जेव्हा तो अनुभव येणं सुरू असते तेव्हा त्याबरोबर जे येत असते, ते प्रकृती योग्य रीतीने पचवू शकत नाही आणि म्हणून ते आत्मसात करण्यासाठी ती स्वतःला बंदिस्त करून घेते.

रूपांतरणाच्या कालावधीमध्ये आणखी एक निमित्त कारण ठरते. ते असे की, तुमच्या प्रकृतीमधला एक भाग परिवर्तित झालेला असतो आणि तुम्हाला बराच काळ असेच वाटत राहते की झालेला बदल हा संपूर्ण आणि चिरस्थायी आहे. परंतु तो बदल नाहीसा झालेला आढळताच तुम्ही निराश होता आणि मग त्या पाठोपाठ, चेतनेचे निम्न स्तरावर पतन होण्याचा कालावधी येतो. हे असे घडते कारण आता चेतनेचा दुसरा एखादा भाग परिवर्तन व्हावे म्हणून अग्रभागी आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ, पूर्वतयारीचा व पडद्यामागे चालू असणाऱ्या कामाचा कालावधी सुरू होतो आणि तो कालावधी तुम्हाला अंधकाराचा किंवा त्याहूनही वाईट असा वाटू लागतो.

साधकाच्या उत्सुकतेला आणि अधीरतेला या गोष्टी हुरहूर लावतात, कधी निराश करतात तर कधी व्याकुळ करतात. परंतु तुम्ही जर त्या अविचलपणे स्वीकारल्या आणि त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा किंवा योग्य दृष्टिकोन कसा अंगीकारायचा हे जर तुम्हाला ज्ञात असेल तर, या अंधकाराच्या कालावधींनादेखील तुम्ही सचेत साधनेचा एक भाग बनवू शकता. आणि म्हणूनच वैदिक ऋषींनी या चढ-उतारांचे वर्णन “रात्र आणि दिवस दोघेही आळीपाळीने दिव्य शिशुला स्तनपान करवितात,” असे केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 59)

साधना, योग आणि रूपांतरण – ६०

(ध्यानामध्ये प्राप्त झालेली) चांगली अवस्था कायम टिकून राहत नाही ही बऱ्यापैकी सार्वत्रिकपणे आढळणारी घटना आहे. चांगली अवस्था येणे व निघून जाणे अशी दोलायमान स्थिती नेहमीच आढळून येते. जो बदल होऊ घातलेला आहे तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही, तोपर्यंत अशी ये-जा चालूच राहते. हे दोन कारणांमुळे घडून येते. प्राण आणि शरीर दोघेही आपापल्या जुन्या गतिविधी एकदम सोडून देण्यास आणि नवीन गतिविधींशी जुळवून घेण्यास असमर्थ असतात हे पहिले कारण. आणि वरून (उच्च शक्तीचा) दबाव आला तर प्रकृतीमध्ये कोठेतरी दडून बसायचे आणि संधी मिळताच डोकं पुन्हा वर काढायचे ही जी (जड)द्रव्याची सवय असते, ती सवय हे दुसरे कारण असते.

*

(तुमच्या प्रकृतीमधील) सर्व घटक खुले होईपर्यंत ही दोलायमानता नेहमीच चालू राहते. दोनपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे हे घडू शकते.

०१) तुमच्या अस्तित्वामधील एखादा लहानसा भाग किंवा एखादी गतिविधी उफाळून पृष्ठभागावर येते, जो भाग (दिव्य शक्तीप्रत) खुला नाहीये आणि त्याच्यामध्ये उच्चतर शक्तीचा प्रभाव निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

०२) बाह्यवर्ती शक्तीकडून तुमच्यावर एक प्रकारचे सावट टाकण्यात आले आहे आणि ते सावट तुमच्यामध्ये तुमचा जुना अडथळा परत निर्माण करत आहे असे नाही, पण काहीसा तात्पुरता अंधकार किंवा अंधकाराचा वरकरणी आभास निर्माण करत आहे.

अस्वस्थ होऊ नका, परंतु लगचेच अविचल होऊन स्वतःला खुले करण्याचा प्रयत्न करा. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, ती जुनी चिवट अडचण आणि गोंधळ यांना पुन्हा परतून येण्यास मुभा देऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भलेही हा अंधकार काही गंभीर व्यत्यय निर्माण करणारा नसला तरीसुद्धा या अंधकाराला दीर्घ काळ टिकून राहण्याची मुभा देऊ नका. अविचल, सातत्यपूर्ण इच्छाशक्ती बाळगली की, अगदी गंभीरातल्या गंभीर अडचणींना तुम्ही अटकाव करू शकता. तुम्ही अविचल आणि स्थिरपणे सातत्याने उन्मुख राहिलात तर कोणत्याही दीर्घ पीडेचे निवारण होईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 60)

साधना, योग आणि रूपांतरण – ५९

साधक : जपाबद्दलची माझी जुनीच प्रतिक्रिया पुन्हा एकदा उफाळून आली आहे, त्याबद्दल मला वाईट वाटत आहे. नामजपाचे परिणाम दिसून यावेत म्हणून कदाचित माझे मन त्याचा अतिरेक करत असावे.

श्रीअरविंद : व्यक्तीने जपाचा अर्थ समजून घेतला, आणि त्या अर्थानिशी नामजप केला, तसेच त्या नामजपामधून ज्या ‘देवते’चा बोध होतो त्याविषयीचे एक आकर्षण, तिचे सौंदर्य, तिची शक्ती किंवा तिचे स्वरूप मनामध्ये साठवून जर नामजप केला आणि या गोष्टी चेतनेमध्ये उतरविल्या तर नामजप यशस्वी होतो. हा नामजपाचा मानसिक मार्ग झाला. किंवा जर तो नामजप हृदयामधून उदित होत असेल किंवा तो नामजप ज्यामुळे चैतन्यमय होईल अशी भक्तीची भावना किंवा तशी विशिष्ट जाणीव जर व्यक्तीमध्ये निनादत राहिली तर मग तो नामजप यशस्वी होतो, हा नामजपाचा भावनिक मार्ग आहे.

जप हा सहसा वरील दोनपैकी कोणत्या तरी एका परिस्थितीमध्ये यशस्वी होतो. जप यशस्वी होण्यासाठी त्याला मनाचा किंवा प्राणाचा आधार द्यावा लागतो किंवा त्याचे पोषण करावे लागते. परंतु जर जपामुळे मन रूक्ष होत असेल आणि प्राण अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये या आधाराचा किंवा पोषणाचा अभाव असतो हे निश्चित समजावे.

अर्थात आणखी एक तिसरा मार्गसुद्धा असतो. आणि तो म्हणजे त्या नामाच्या किंवा मंत्राच्या शक्तीवरच विश्वास ठेवायचा. परंतु जोवर ती शक्ती व्यक्तीच्या आंतरिक अस्तित्वावर त्या जपाच्या स्पंदनांचा प्रभाव उमटवीत नाही तोवर व्यक्तीने नामजप चालूच ठेवणे आवश्यक असते; असा प्रभाव पडल्यावर, मग कधीतरी अवचित एखाद्या क्षणी व्यक्ती ईश्वरी ‘अस्तित्वा’प्रत किंवा त्याच्या ‘स्पर्शा’प्रत खुली होते. परंतु हे घडून यावे म्हणून जर अट्टहास किंवा संघर्ष केला जात असेल तर, ज्या प्रभावाला मनाच्या अविचल ग्रहणशीलतेची आवश्यकता असते त्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि म्हणूनच मनावर अधिक ताण न देता किंवा अतिरिक्त प्रयत्न न करता, मनाच्या अविचलतेवर अधिक भर देण्यास मी सांगत होतो. ग्रहणशीलतेची आवश्यक परिस्थिती मनामध्ये आणि अंतरात्म्यामध्ये विकसित व्हावी म्हणून त्यांना अवधी देणे आवश्यक असते. व्यक्तीला काव्याची किंवा संगीताची जशी स्फूर्ती प्राप्त होते त्याप्रमाणेच ही ग्रहणशीलतादेखील अगदी स्वाभाविक असते.

…सर्व ऊर्जा जपावर किंवा ध्यानावर खर्च करणे ही गोष्ट ताण निर्माण करणारी असते; व्यक्तीला वरून येणाऱ्या अनुभूतींचा अव्याहत प्रवाह जेव्हा अनुभवास येत असतो अशा काही कालावधींचा अपवाद वगळला तर, ज्यांचा यशस्वी ध्यानधारणेचा अभ्यास आहे त्यांनासुद्धा ही गोष्ट काहीशी अवघड वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – ५८

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि (असे असेल तरच) तुम्हाला ध्यान करणे शक्य होईल असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही आवश्यक गोष्ट आहे. डोकं रिकामं करणे याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वरा’च्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल. त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यतः ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता मात्र बदललेली असेल. जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले असल्याचे तुम्हाला जाणवेल. एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, अढळ अशी निश्चल शक्ती तुम्हाला जाणवेल.

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात; त्यासाठी विविध शक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. …पण त्यामध्ये त्या काही प्रमाणातच यशस्वी होतात. तुम्ही प्रगती करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी जेवढ्या प्रमाणात बाधा पोहोचविणे आवश्यक असेल तेवढ्याच प्रमाणात त्या तुम्हाला बाधा पोहोचवितात. जेव्हा कधी तुमच्यावर जीवनाकडून आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केलीच पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही ताठ मानेने आनंदाने म्हणता, “मला काय शिकले पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे. मला माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे”… अशी तुमची वृत्ती असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 121-122)

साधना, योग आणि रूपांतरण – ५७

(कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

यापैकी कोणतीच गोष्ट घडली नाही तर अशा वेळी (विचारांना) नकार देण्याची सातत्यपूर्ण सवय ही आवश्यक ठरते. येथे तुम्ही त्या विचारांशी दोन हात करता कामा नयेत किंवा त्यांच्याशी संघर्षही करता कामा नये. फक्त एक अविचल आत्म-विलगीकरण (self-separation) आणि विचारांना नकार देत राहणे आवश्यक असते. सुरुवातीला लगेच यश येते असे नाही, पण तुम्ही त्या विचारांना अनुमती देणे सातत्याने रोखून ठेवलेत, तर अखेरीस विचारांचे हे यंत्रवत गरगर फिरणे कमीकमी होत जाईल आणि नंतर ते बंद होईल. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आंतरिक अविचलता (quietude) किंवा निश्चल-नीरवता (silence) प्राप्त होईल.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता, योगिक प्रक्रियांचे परिणाम हे त्वरित दिसून येत नाहीत आणि म्हणून, परिणाम दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रक्रिया अगदी धीराने अवलंबल्या पाहिजेत. व्यक्तीची बाह्य प्रकृती (मन, प्राण आणि शरीर) खूप विरोध करत असेल तर, हे परिणाम दिसून येण्यास कधीकधी बराच कालावधी लागू शकतो.

जोपर्यंत तुम्हाला उच्चतर ‘आत्म्या’ची चेतना गवसलेली नाही किंवा तिचा अनुभवच जर तुम्हाला आलेला नाही, तर तुम्ही तुमचे मन त्या उच्चतर आत्म्यावर कसे काय स्थिर करू शकता? तुम्ही ‘आत्म्या’च्या संकल्पनेवरच लक्ष एकाग्र करू शकता किंवा मग तुम्ही ‘ईश्वरा’च्या किंवा ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर, चित्रावर किंवा भक्तीच्या भावनेवर लक्ष एकाग्र करू शकता; ‘ईश्वरा’ने किंवा ‘दिव्य माते’ने तुमच्या हृदयात प्रविष्ट व्हावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला तुम्ही आवाहन करू शकता किंवा तुमच्या शरीर, हृदय आणि मनामध्ये ‘दिव्य शक्ती’ने कार्य करावे म्हणून, तसेच तुमची चेतना मुक्त करून, तुम्हाला तिने आत्म-साक्षात्कार प्रदान करावा म्हणून, तुम्ही ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करू शकता.

तुम्ही जर ‘आत्म्या’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू इच्छित असाल तर ती संकल्पना मन आणि त्याचे विचार, प्राण आणि त्याची भावभावना, शरीर आणि त्याच्या कृती यांपासून काहीशी भिन्न असलीच पाहिजे; या सर्वापासून अलिप्त असली पाहिजे, ‘आत्मा’ म्हणजे एक ‘अस्तित्व’ किंवा ‘चेतना’ आहे अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजेत. म्हणजे आजवर मन, प्राण, शरीर यांच्या गतिविधींमध्ये मुक्तपणे समाविष्ट असूनही त्यांच्यापासून अलिप्त असणारा ‘आत्मा’ अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 303-304)

साधना, योग आणि रूपांतरण – ५५

किरकोळ बारीकसारीक विचार मनामध्ये सातत्याने घोळत राहणे हे यांत्रिक मनाचे स्वरूप असते, मनाची संवेदनशीलता हे त्याचे कारण नसते. तुमच्या मनाचे इतर भाग हे अधिक शांत आणि नियंत्रणाखाली आले आहेत, आणि त्यामुळेच यांत्रिक मनाची ही खळबळ तुम्हाला अधिक ठळकपणे लक्षात येत आहे आणि ती मनाचा अधिकांश प्रदेशदेखील व्याप्त करत आहे. तुम्ही त्यांना सातत्याने नकार देत गेलात तर ते विचार सहसा आपोआप निघून जातात.

*

यांत्रिक मनाच्या मनोव्यापारापासून स्वतःला विलग करता येणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तसे करता आले तर यांत्रिक मनाचे ते किरकोळ विचार जणू रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गोंगाटाप्रमाणे वाटू लागतील आणि मग तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकाल. आणि मग ते विचार पुन्हापुन्हा जरी मनात उद्भवत राहिले तरी आता मनाची अविचलता आणि शांती न ढळता तशीच कायम राहू शकेल. वरून शांती आणि निश्चल-नीरवता या गोष्टी अवतरित होत राहिल्या तर त्या बहुतेक वेळी इतक्या प्रबळ होतात की, कालांतराने त्या शारीर-मनावर नियंत्रण मिळवितात.

*

कदाचित तुम्ही या यंत्रवत विचारांकडे फारच लक्ष देत आहात. यंत्रवत चाललेल्या त्या कृतीकडे दुर्लक्ष करून तिला तशीच पुढे निघून जाऊ देणे आणि एकाग्रता साधणे हे सहज शक्य असते.

*

बाह्यवर्ती अस्तित्वामध्ये अंतरात्म्याचा प्रभाव जसजसा अधिकाधिक विस्तारत जाईल तसतशा अवचेतन मनाच्या यंत्रवत गतिविधी शांत होत जातील. हा सर्वोत्तम मार्ग आहे. मन शांत करण्यासाठी थेट प्रयत्न करणे ही काहीशी अवघड पद्धत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 314), (CWSA 29 : 314-315), (CWSA 29 : 315), (CWSA 29 : 315)

साधना, योग आणि रूपांतरण – ५४

(आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आजवर ध्यान म्हणजे काय, ध्यान आणि एकाग्रता यांमध्ये काय फरक आहे, हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे समजावून घेतले. ध्यान कसे करायचे या बाबतीतले अनेक बारकावेदेखील समजावून घेतले. श्रीअरविंद आणि श्रीमाताजींना, साधकांनी ध्यानात येणाऱ्या अडचणींविषयी वेळोवेळी विचारले आहे आणि त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत, त्या अडचणींचे निराकरण करण्याचे मार्ग सुचविले आहेत, ते आपण आजपासून विचारात घेणार आहोत.)

साधक : कधीकधी मी माझे मन शांत करण्याचा तर कधीकधी समर्पण करण्याचा प्रयत्न करतो, आणि कधी माझा चैत्य पुरुष (psychic being) शोधण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु अशा प्रकारे मी कोणत्याच एका गोष्टीवर माझे अवधान (attention) केंद्रित करू शकत नाही. यांपैकी कोणती गोष्ट मी सर्वप्रथम केली पाहिजे?

श्रीमाताजी : सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि जी गोष्ट ज्यावेळी उत्स्फूर्तपणे करावीशी वाटेल त्यावेळी ती केली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 51)

साधना, योग आणि रूपांतरण – ५३

तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर आणि अविचल स्थितीमध्ये प्रवेश केलेला असतो. पण जर व्यक्ती अशा स्थितीमधून अगदी अचानकपणे बाहेर सामान्य चेतनेमध्ये आली तर, तुम्ही म्हणता तसा मज्जातंतुला किंचितसा धक्का बसू शकतो किंवा थोड्या वेळासाठी हृदयाची धडधड वाढू शकते. आंतरिक स्थितीमधून डोळे उघडून बाहेर येताना, काही क्षणांसाठी शांत-स्थिर, अविचल राहणे हे नेहमीच उत्तम असते.

*

ध्यानानंतर काही कालावधीसाठी शांत, निश्चल-नीरव आणि एकाग्रचित्त राहणे हे निश्चितपणे अधिक चांगले. ध्यान गांभीर्याने न घेणे ही चूक आहे कारण तसे केल्याने व्यक्ती ध्यानामध्ये काही ग्रहण करू शकत नाही किंवा तिने जे ग्रहण केलेले असते ते सर्व किंवा त्यातील बहुतांश भाग वाया जातो.

*

तुमचे ध्यान व्यवस्थित चालू असते पण जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर येता तेव्हा लगेच सामान्य चेतनेमध्ये जाऊन पडता आणि हीच अडचण आहे. कामकाजामध्ये गढलेले असतानादेखील, तुमची खरी चेतना कायम ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. असे केलेत तर मग साधना सदासर्वकाळ चालू राहील आणि मग तुमची अडचण नाहीशी होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313-314)