Tag Archive for: साधना

आपल्या अंतरंगातील देवता कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती दडून बसते; आणि ती स्वत:चेच विस्मरण करविते.

ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मापन करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती कोणत्याही प्रतिबंधाविना पूर्णत्व आणण्याचे कार्य अथकपणे करत राहते; कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येकाला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते.

ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

तिने सर्वकाही तिच्या स्वत:मध्येच धारण केलेले असल्यामुळे, जी सर्वांसाठी असू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट तिच्या मालकीची नसते. तिची सत्ता सर्वत्रांवर चालत असल्यामुळेच ती सर्वांची सेवकही असते. याच कारणासाठी लहान अथवा थोर, जे कोणी तिच्या बरोबर सत्ताधीश होण्याची किंवा तिच्यामधील देवपद मिळविण्याची इच्छा करतात, ते तिच्याप्रमाणे सर्व बांधवांचे सेवक बनून जातात; जुलमी सत्ताधीश बनत नाहीत.

सेवकाची ही विनम्र भूमिका खरोखर किती सुंदर आहे! सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या परमेशाचे संदेशदूत होणे आणि सर्व वस्तूंना जीवन देणाऱ्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणे हे ज्यांचे जीवितकार्य आहे त्या सर्वांचीच अशा प्रकारची सेवकाची भूमिका असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 42-43)

सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण पुढील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.

एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु शेवटी त्या एकाच वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया होय. निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व ह्या त्या चार प्रक्रिया आहेत. दुष्प्रवृत्त मनापासून सुटका करून घेण्यासाठी हे सारे करावयाचे असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 183)

तुम्ही कोणत्यातरी अगदी क्रियाशील कृतीमध्ये गुंतलेले असाल उदा. बास्केटबॉल खेळणे, ज्यामध्ये खूप वेगवान हालचाली कराव्या लागतात. असे असतानादेखील, तुम्ही ईश्वरावरच्या आंतरिक ध्यानाचा आणि एकाग्रतेचा तुमचा भाव ढळू देता कामा नये.

आणि जर तुम्ही तसे करू शकलात तर तुम्हाला दिसेल की, तुम्ही जे काही करत असता त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे; ती गोष्ट तुम्ही फक्त उत्तमच करता असे नाही, तर तुम्ही ती अगदी अपेक्षेपेक्षाही अधिक सामर्थ्यानिशी करता.

आणि त्याचवेळी तुम्ही तुमची चेतना इतक्या उंचीवर नेऊन ठेवता, इतकी शुद्ध राखता की, तुम्हाला तेथून पुढे कोणीच धक्का लावू शकत नाही. आणि लक्षात घ्या की हे इथपर्यंत होते की, एखादी दुर्घटना जरी घडली तरी ती तुम्हाला कोणतीही बाधा पोहोचवू शकत नाही.

अर्थातच, हे अत्युच्च शिखर आहे. ज्याची व्यक्तीने आस बाळगावी असे हे शिखर आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 121)

परिपूर्ण जाणीव प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची सद्यस्थितीतील जाणीव ही तिच्या सवयी व मर्यादा यांच्या पलीकडे वाढविणे; तिला शिक्षण देणे, तिला दिव्य प्रकाशाच्या दिशेने विकसित करणे, तिच्यामध्ये दिव्य प्रकाशाला त्याचे कार्य मुक्तपणे आणि पूर्णपणे करू देणे.

परंतु तो दिव्य प्रकाश तेव्हाच त्याचे कार्य पूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व लालसा आणि भीती यांच्यापासून मुक्त झालेले असता; जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही मानसिक पूर्वग्रह नसतात; कोणत्याही प्राणिक आवडीनिवडी नसतात; तुम्हाला बंधनात पाडणारी किंवा पीडा देणारी, कोणतीही शारीरिक भयशंकितता नसते किंवा कसलेही आकर्षण नसते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)

चैत्य विश्व किंवा चेतनचे प्रतल हा विश्वाचा असा एका भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो. आणि चैत्य पुरुष (Psychic Being) हा अस्तित्वाचा असा एक भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो; येथे विरोधी शक्तीची मात्रा तीळमात्रही चालू शकत नाही.

हे सुसंवादाचे विश्व असते आणि येथे प्रत्येक गोष्ट प्रकाशाकडून प्रकाशाकडे आणि प्रगतीकडून अधिक प्रगतीकडे अशी जात असते. चैत्य अस्तित्व हे दिव्य चेतनचे, व्यक्तीमधील दिव्य आत्म्याचे स्थान असते. ते प्रकाश, सत्य, ज्ञान, सौंदर्य आणि सुसंवाद यांचे केंद्र असते. हे असे केंद्र असते जे, तुमच्या प्रत्येकामधील दिव्य आत्म्याने त्याच्या अस्तित्वाने, अंशाअंशाने निर्माण केलेले असते; ज्या दिव्य चेतनेचे ते अविभाज्य भाग असते तिने ते प्रभावित झालेले असते, तिने घडविलेले असते आणि तिने ते संचालित केलेले असते.

तुमच्यामधील दिव्यतेच्या संपर्कात येण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये खोलवर चैत्य अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे. चैत्य पुरुष हा दिव्य चेतना आणि तुमची बाह्य जाणीव यांधील दुवा असतो. तो तुमच्या आंतरिक जीवनाचा रचयिता असतो; दिव्य इच्छेचा कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी त्याच्याद्वारे बाह्य प्रकृतीमध्ये अभिव्यक्त होत असतात.

जर तुम्ही तुमच्या बाह्य जाणिवेमध्ये तुमच्यामधील ह्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झालात, तर तुम्हाला शुद्ध शाश्वत चेतना गवसेल आणि तुम्ही त्यात जगू लागाल; सामान्यतः मनुष्यप्राणी ज्या अज्ञानाद्वारे संचालित होत असतो त्याद्वारे संचालित होण्याऐवजी, मग तुम्ही तुमच्या अंतरंगातील शाश्वत प्रकाश आणि ज्ञान यांच्या अस्तित्वाविषयी जागृत होता आणि त्यात तुम्ही समर्पण करता, समग्रतया त्यालाच आत्मनिवेदन करता आणि सर्व बाबींमध्ये त्याच्याद्वारेच संचालित होता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 62)

पूर्णयोगामध्ये चक्रांचे संकल्पपूर्वक खुले होणे नसते, तर शक्तीच्या अवतरणामुळे ती आपलीआपण खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर खुली होत जातात, म्हणजे मूलाधार प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, ती वरून खाली खुली होत जातात, परंतु मूलाधारातून शक्तीचे आरोहण निश्चितपणे होते.

पूर्णयोगामध्ये क्वचितच कधीतरी मज्जारज्जूमध्ये प्रवाहाची जाणीव होते, जशी ती इतर नाडीप्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. पूर्णयोगामध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती होत नाही.

ह्या योगामध्ये उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ईश्वरी शक्तीचे वरून अवतरण होते. ती ईश्वरी शक्ती मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या ह्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात.

दिव्य मातेवर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ ह्या गोष्टी पूर्णयोगाचे मुख्य नियम आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460, 462)

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू काही समुद्रात उडी मारल्याप्रमाणे दिव्यत्वामध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर ती केवळ सुरुवात असते. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला दिव्यत्वामध्ये जीवन जगता आले पाहिजे. तुम्ही ते कसे करू शकता? “मी कोठे पडेन? नंतर माझे काय होईल?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहते. पण तुम्ही स्वत:ला जाऊ दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि जर तुम्ही सगळा वेळ असाच विचार करीत बसलात,”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा दगड असेल इ..” तर तुम्ही कधीच उडी घेऊ शकणार नाही.

पण अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला हवा आणि तुम्हाला त्याविषयी काही माहिती हवी त्याप्रमाणेच तुम्हाला दिव्य सद्वस्तूचे आधी थोडे का होईना दर्शन घडलेले असावे. हे दर्शन म्हणजे सहसा चैत्य जाणिवेची जागृती असते. भले त्या दिव्य सद्वस्तूशी अगदी खोलवरचा चैत्यमय वा संपूर्ण संपर्क प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील किमान एक सुस्पष्ट असा मानसिक वा प्राणिक साक्षात्कार तरी तुम्हाला झालेला असला पाहिजे. तुम्हाला सुस्पष्टपणे तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर ईश्वरी उपस्थितीची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला दिव्य विश्वाचा श्वास जाणवला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध अशा या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दाब तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडेल. जर तुम्हाला तसा अनुभव असेल तर तुम्ही केवळ त्या दिव्य सद्वस्तूमध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करावयाचे आहे. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी करावयास हवे. ही उडी तुम्हाला मारावयाची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे योगसाधना करीत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही ह्याची शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि आध्यात्मिक जीवनाची खराखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 21-22)

कधीकधी असेही होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पावलाने देखील तिची पुढे प्रगती होत नाही. असेही घडते की, एखादी व्यक्ती धर्माची अगदी उत्कट भक्त असू शकते पण तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झाले नाही. अशी ही काही माणसं आहेत की, जी अगदी साधीसुधी कामे करायची, उदा. चांभाराने जुन्या चपलाबूट शिवणे इ. आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला होता. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा अनुभव वगैरे गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी आहे, इतकेच काय ते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ईश्वराशी एकत्त्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ईश्वरामध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एकच वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही तत्त्वज्ञानाचे आख्खे पुस्तक वाचूनही काही उपयोग होत नाही. पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी गौण असतात.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण या गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे. जेव्हा एखाद्याला असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे त्याला विरोध करत आहे ते त्याने शोधून काढावयास हवे; आणि मग आवश्यक ती प्रगती करावयास हवी. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा, तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जडवादी असतात पण हे सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो सत्य आहे – तो खरा आहे, कारण ती एकमेवाद्वितीय अशी वस्तुस्थिती आहे. व्यक्ती काय बोलते ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 26-27)

प्रश्न : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आपण बाळगली पाहिजे का?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे.

कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक कृतींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते.

वस्तुत: आध्यात्मिक अनुभव हे सहजस्फूर्तपणे यावयास हवेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून यावयास हवेत, पण केवळ अनुभवासाठी अनुभव अशा पद्धतीने ते यावयास नकोत.

*

आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ईश्वराच्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो.

जर तुम्ही ईश्वराला भेटलात तर ईश्वर तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. परंतु फरक पडत असेल तर त्याचे कारण असे की, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांत मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो आणि तो तुमच्या बाह्य चेतनेमध्ये शब्दांकित होतो. तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित होतो.

केवळ एकच सत्य, एकच वास्तव अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ते वास्तव ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे अनंत आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 432) (CWM 03 : 17)

प्रश्न : आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे येऊ शकतात?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव ही एक अशी गोष्ट असते की, ज्यामुळे तुम्ही नेहमी ज्या चेतनावस्थेत वावरत असता त्यापेक्षा अधिकउच्च अशा चेतनावस्थेशी तुमचा संपर्क येतो. तुम्हाला स्वत:विषयी काहीतरी एक भावना असते, भले तुम्ही त्याविषयी जागृतही नसाल, ती तुमची सामान्य स्थिती असते, ती तुम्हाला माहीत असते. पण जर तुम्हाला तुमच्या अंतरंगातील काही वेगळ्या आणि अधिक उच्च अशा चेतनेची एकाएकी जाणीव झाली तर ती काही का असेना, तरीही तो एक आध्यात्मिक अनुभव असेल.

तुम्ही मानसिक कल्पनेद्वारे त्याची मांडणी कराल किंवा करणार नाही; तुम्ही ते स्वत:लाच स्पष्ट करून सांगाल किंवा सांगणारही नाही, ते उत्स्फूर्त असू शकते. पण जेव्हा हा जाणिवेमधील अनिवार्य असा फरक तुम्हाला जाणवतो, त्याचा परिणाम म्हणून, काही अधिक उच्च, अधिक स्पष्ट, अधिक शुद्ध असे काही जाणवते तेव्हा त्याला आध्यात्मिक अनुभव म्हणता येते. म्हणजेच असे की, अशा हजारो वेगवेगळ्या गोष्टी आहेत की, ज्याला आध्यात्मिक अनुभव असे म्हणता येते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 432)