साधना, योग आणि रूपांतरण – ७३
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
चेतना अंतरंगामध्ये प्रविष्ट झाल्याचा तुम्हाला आलेला हा अनुभव म्हणजे ज्याला सामान्यत: ‘समाधी’ असे संबोधले जाते तो अनुभव होता. वास्तविक त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे मन आणि प्राणामध्ये (तुम्हाला) आलेला निश्चल-नीरवतेचा अनुभव, की जी नीरवता अगदी शरीरापर्यंत पूर्णपणे विस्तारित झाली होती.
निश्चल-नीरवतेची (silence) आणि शांतीची (peace) क्षमता प्राप्त होणे ही साधनेमधील सर्वाधिक महत्त्वाची पायरी असते. ती प्रथमतः ध्यानामध्ये प्राप्त होते आणि ती निश्चल-नीरवता चेतनेस अंतर्मुख करून, तिला समाधी-अवस्थेकडे नेण्याची शक्यता असते. परंतु नंतर ही क्षमता जाग्रतावस्थेमध्ये सुद्धा प्राप्त होणे आवश्यक असते आणि समग्र जीवन व कार्य यासाठी तिने एक स्थायी पाया म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे आवश्यक असते. ही स्थिती ‘आत्म’साक्षात्कारासाठी आणि प्रकृतीच्या आध्यात्मिक रूपांतरणासाठी आवश्यक असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 248)