Tag Archive for: साधना

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०८

धम्मपद : सावधानता हा अमरत्वाकडे वा निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे, बेसावधपणा हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. सावध मनुष्य कधीही मृत्यू पावत नाही, बेसावध मनुष्य हा मृतवतच असतो.

श्रीमाताजी : सावधानता म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, प्रामाणिक असणे – कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करावयाची असते, तेव्हा जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करावयाची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकावयाचे की गाढ झोपी जायचे, “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहावयाचे, यांपैकी एकाची हरक्षणी निवड करावयाची असते.

तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करावयाचा एवढाच सावधानतेचा अर्थ नाही, तर प्रगतीकडे घेऊन जाणारी कोणतीही संधी तुम्ही गमावणार नाही यासाठी जागरुक राहावयाचे हाही त्याचा अर्थ आहे. एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखणे, काही नवीन शिकण्याची, काही दुरुस्त करण्याची, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी न गमावणे म्हणजे सावधानता होय. तुम्ही जर का सावध असाल, जागरुक असाल तर तुम्हाला जे करावयास काही वर्ष लागली असती, ते तुम्ही काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर सावध असाल, दक्ष असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक हालचालीला, तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या संधीमध्ये तुम्ही बदलवून टाकू शकता.

सावधानता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय. तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा वा तुम्ही मोहात पडण्याचा क्षण असेल तर अशा वेळी सावधनता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर प्रगतीच्या संधीच्या शोधात असणारी सक्रिय सावधानता ही प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेऊन त्वरेने प्रगती करण्यासाठी धडपडत असते.

तुम्हाला पडण्यापासून वाचविणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.

जो सावधान, दक्ष नाही तो जणू काही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी त्याचा असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो.

अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका विवरात पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 202-203)

धम्मपद : सदाचरणी मनुष्यास इहलोकामध्ये आनंद होतो व परलोकामध्येही आनंद होतो. आपले शुद्ध कर्म पाहून त्याला संतोष वाटतो.

श्रीमाताजी : यावरून असे वाटते की, बौद्ध धर्माने स्वर्ग व नरक या कल्पनांचा स्वीकार केला आहे, पण असे केल्याने केवळ वरवरचा अर्थ घेतल्यासारखे होईल, कारण अधिक खोल अर्थाने पाहिले असता, ही बुद्धांची विचारप्रणाली नव्हती. उलट, त्यांचा या कल्पनेवर भर असे की, तुम्ही ज्या जगात वावरणार आहात ते जग तुमच्या आचरणाने आणि तुमच्या चेतनेच्या स्थितीनुसार, तुम्हीच निर्माण करता. मनुष्य ज्या जगात जगत असतो, आणि देह सोडल्यानंतरदेखील ज्या जगात तो जगणार असतो, ते जग तो स्वत:मध्येच बाळगत असतो. कारण बुद्धांच्या शिकवणुकीनुसार देहात असतानाचे जीवन व देहोत्तर जीवन यामध्ये काही फरक नाही….

…जेव्हा तुम्ही सदाचारी असता, उदार, उदात्त, नि:स्वार्थी, दयाळू असता, त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये व तुमच्याभोवती एक विशिष्ट वातावरण निर्माण करीत असता. हे वातावरण म्हणजे एक प्रकारची प्रकाशमय अशी मुक्ती असते. सूर्यप्रकाशात बहरून येणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही खुलून येता, त्याच प्रकाशमयतेमध्ये श्वासोच्छ्वास करता. त्यामुळे जीवनात कोणतीही कटुता, विद्रोह, क्लेश, दुःखद प्रतिघात तुमच्यावर होत नाहीत. अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्या भोवतालचे वातावरण प्रकाशमय होते आणि ज्या हवेत तुम्ही श्वासोच्छ्वास करता ते वातावरण आनंदमय होऊन जाते. देहामध्ये असताना किंवा देहातून बाहेर गेल्यावरही, जागृती किंवा निद्रेमध्ये, जीवनामध्ये किंवा मरणोत्तर नवीन जन्म मिळेपर्यंतच्या जीवनातही तुम्ही त्याच वातावरणात जगता.

छिन्नविछिन्न करून टाकणाऱ्या वाऱ्याप्रमाणे, गोठवून टाकणाऱ्या थंडीप्रमाणे, किंवा भस्मसात करून टाकणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे, दुष्कृत्ये ही मनुष्याच्या जाणिवेवर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात.

सर्व सत्कृत्ये, शुभ कर्मे ही जीवनात प्रकाश, स्वास्थ्य, आनंद आणि पुष्पविकासी सूर्यप्रकाश भरत असतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 199-200)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

धम्मपद : नीट शाकारणी न केलेल्या छपरातून जसे पावसाचे पाणी आत घुसते, तसेच असंतुलित मनामध्ये वासनाविकार, भावनावेग आत शिरतात.

श्रीमाताजी : चीनमध्ये, जपानमध्ये, ब्रह्मदेशात बौद्ध धर्माचे निरनिराळे पंथ अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक पंथ आपापल्या साधनापद्धतींचे अनुसरण करीत असतो. पण मन शांत करणे हीच ज्यांची एकमेव साधनापद्धती आहे, अशा लोकांचा पंथ हा त्यांपैकी सर्वात जास्त दूरवर पसरलेला आहे.

ते दिवसा काही तास आणि रात्रीदेखील ध्यानास बसतात आणि मन शांत करतात. – न भटकणारे, तास न् तास शांत राहू शकणारे अविचल मन ही त्यांच्यासाठी सर्व साक्षात्काराची गुरुकिल्ली असते. ही साधी सोपी गोष्ट असते असे मात्र तुम्ही समजू नका. त्यांच्यापुढे दुसरे कोणतेच उद्दिष्ट नसते. ते कोणत्या एखाद्या विचारावर मन एकाग्र करीत नाहीत, आकलन अधिक उत्तम असावे, अधिक ज्ञान मिळवावे असा कोणताच प्रयत्न ते करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीने एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे मन निश्चल-नीरव करावयाचे. मन शांत करावयाचे, ते पूर्णतया शांत आणि नि:स्तब्ध करावयाचे; या परिणामाप्रत पोहोचण्यासाठी त्यांना कधीकधी तर वर्षेच्या वर्षे खर्ची घालावी लागतात. धम्मपदात येथे सांगितल्याप्रमाणे, जर मन असंतुलित असेल, तर कल्पना एकापाठोपाठ एक या पद्धतीने सतत उसळत राहतात, कधीकधी त्यामध्ये कोणताही विशिष्ट क्रम नसतो, त्या परस्परांना विसंगत वा विरोधी असतात. घटनांविषयी त्यांच्या काही विशिष्ट धारणा असतात, आणि त्यांचा डोक्यात धिंगाणा चाललेला असतो, आणि त्यामुळे जणूकाही छपराला भोकं पडतात. आणि गळक्या छपरातून जसे घरात पाणी आत शिरते त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अनिष्ट लहरी, जाणिवेमध्ये आत शिरतात.

काहीही असले तरी, मन शांत करणे, स्तब्ध, निस्तरंग करणे ह्यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे, प्रत्येकालाच सुचवावी अशी ही साधनापद्धती आहे असे मला वाटते. जो मानसिकदृष्ट्या अधिक विकसित असेल, प्रगत असेल त्याला ही गोष्ट पटकन साध्य होते आणि मन अगदी प्राथमिक अवस्थेत असेल तर, ती गोष्ट अधिक अवघड असते, हे कोणालाही पटेल.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 195)

धम्मपद : वास्तविक जी व्यक्ती अजूनही अशुद्ध आहे. अजूनही जिच्या ठिकाणी आत्म-संयम आणि निष्ठा यांचा अभाव आहे, अशी व्यक्ती खरंतर भिक्षुची पीत वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेची नसते.

श्रीमाताजी : बौद्ध धर्म ज्याला अशुद्धी म्हणून संबोधतो, त्यात मुख्यत: अहंकार आणि अज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो; कारण बौद्धांच्या दृष्टिकोनातून, सर्वात मोठा कलंक म्हणजे अज्ञान; पण बाह्य गोष्टींचे किंवा प्रकृतीच्या नियमांचे किंवा तुम्ही जे काही शाळेमध्ये शिकता त्याबाबतीतले अज्ञान नव्हे; तर वस्तुमात्राच्या गूढतम सत्याबद्दल असलेले अज्ञान, आपल्या अस्तित्वाच्या मार्गदर्शक तत्त्वाबद्दल, आपल्या जीवितसाराबद्दल असणारे अज्ञान, धर्माबद्दल असणारे अज्ञान.

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आत्मसंयमाचा अभाव व सत्यनिष्ठेचा अभाव या दोन दोषांवर येथे भर देण्यात आलेला आहे. सत्यनिष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी; धम्मपदाने सर्वाधिक धिक्कार ढोंगीपणाचा केला आहे. आपल्याला आध्यात्मिक जीवन जगावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे जगावयाचे नाही, आपल्याला सत्यशोधन करावयाचे आहे असे भासवायचे आणि तसे करावयाचे नाही, दिव्य जीवनासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले असल्याचे ज्यातून दिसून येईल अशा बाह्य गोष्टी धारण करावयाच्या (उदा. पीत वस्त्रे परिधान करावयाची) पण आंतरिकरित्या मात्र स्वत:, स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च्या गरजा यातच गुंतलेले असावयाचे, ह्या सर्व गोष्टींची धम्मपद निंदा करते.

धम्मपदाने आत्मसंयमावर किती भर दिला आहे हे पाहण्यासारखे आहे. कारण बुद्धाच्या शिकवणीनुसार, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. बुद्धाने मध्यममार्गावर, सुवर्णमध्यावर नेहमीच भर दिला आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला अधिक झुकलेले असता कामा नये, किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच. प्रत्येक गोष्टीत समतोल हवा, परिमितता हवी.

म्हणूनच, आंतरिक समतोल असणे, कृतीमध्ये समतोल असणे, प्रत्येक बाबतीत परिमितता असणे, प्रामाणिक असणे, सचोटी व निष्ठा असणे, हे गुण तुम्हाला आध्यात्मिक जीवन आचरण्यासाठी पात्र बनवितात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 190)

धम्मपद : बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या खुरामागोमाग ज्याप्रमाणे बैलगाडीची चाके जातात त्याचप्रमाणे, व्यक्ती जर दुष्ट मनाने बोलत वा वागत असेल तर, त्याच्या पाठी दुःखभोग लागतात.

श्रीमाताजी : सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण धम्मपदातील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.

एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु शेवटी त्या एकाच वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया होय.

निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व. दुष्प्रवृत्त मनापासून सुटका करून घेण्यासाठी, हे सारे करावयाचे कारण आपल्याला असे सांगण्यात आले आहे की, नांगरणाऱ्या बैलाच्या खुरांच्या पाठोपाठ बैलगाडीची चाके जातात त्याप्रमाणे जी व्यक्ती वाईट मनाने बोलत वा वागत असते, तिच्यापाठोपाठ दुःखभोग चालत येतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 183)

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल.

योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे.

पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून)

शरीर हे काही वस्त्रासारखे नाही; किंवा आजारी शरीर हे देखील फाटक्या वस्त्राप्रमाणे नाही. शरीर जरी दुर्बल किंवा आजारी पडले तरी ते स्वतःला परत पुनरुज्जीवित करू शकते, त्याची प्राणिक शक्ती ते परत मिळवू शकते, हे असे हजारो लोकांच्या बाबतीत घडत असते. पण कापडामध्ये मात्र पुनरुज्जीवन करणारी जीवनशक्ती नसते. व्यक्ती जेव्हा पंचावन्न किंवा साठ वर्षे वयाच्या पलीकडे जाते तेव्हा हे पुनरुज्जीवन अवघड होऊन बसते; परंतु अगदी तेव्हासुद्धा आरोग्य आणि शक्ती कायम राखता येते किंवा शरीर सुस्थितीत राखण्यासाठी ते पुन्हा होते तसे होऊ शकते.

तुम्हाला आंतरिक अस्तित्व या शब्दांनी नेमके काय म्हणावयाचे आहे ते मला उमगले नाही. जर तुम्हाला ‘विकास’ या शब्दांनी साधनेचा विकास अभिप्रेत असेल तर, त्यासाठी आरोग्याची पुन्हा प्राप्ती आणि सामर्थ्य आवश्यक आहे. मन आणि प्राणाप्रमाणेच शरीर हे पण साधनेसाठी आवश्यक असे साधन आहे आणि होता होईल तितके ते सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंतरिक अवस्थेच्या तुलनेत त्याला काही फारसे महत्त्व नाही असे समजून, त्याची हेळसांड करणे, हा काही या (पूर्ण)योगाचा नियम नाही.

(CWSA 31 : 558)

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल.

हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील.

तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)

कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो.

ज्यामुळे शरीरात समतोलपणा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची वाढ होण्यास मदत होईल अशाच रीतीने सर्व शारीरिक क्रियांची आखणी केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, कामवासनेच्या उपभोगासकट सर्व प्रकारच्या सुखतृष्णेपासून व्यक्तीने दूर राहिले पाहिजे. कारण कामोपभोगाची प्रत्येक क्रिया म्हणजे मृत्यूकडे नेणारे एक पाऊल आहे. आणि म्हणूनच फार फार प्राचीन काळापासून सर्व पवित्र आणि गुप्त संप्रदायांत, अमरत्वाच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रत्येक साधकाला कामवासना-तृप्तीस पूर्ण बंदी असे. कारण अशा कामतृप्तीच्या मागोमाग कमी-अधिक अचेतनेचा काळ येतो, या स्थितीत सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रभावांना द्वार खुले होते आणि मनुष्याची जाणीव खाली उतरते.

तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर अतिमानसिक जीवन जगण्याच्या इच्छेने स्वत:ची तयारी करावयाची असेल, तर त्याने सुखोपभोगासाठी, एवढेच नव्हे, तर आराम म्हणून किंवा ताण कमी करण्याच्या निमित्ताने सुद्धा आपली जाणीव ढिसाळपणा व निश्चेतनतेपर्यंत कधीच खाली घसरू देता कमा नये. व्यक्तीने शक्ती आणि प्रकाश यामध्येच विश्रांती मिळविली पाहिजे, अंधकार किंवा दुर्बलता यांत नव्हे.

म्हणूनच प्रगतीची आस बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ब्रह्मचर्यत्वाचे व्रत असले पाहिजे; पण विशेषत: ज्यांना स्वत:ला अतिमानसिक शक्तीच्या आविष्कारासाठी तयार करावयाचे असेल, त्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याची जागा संपूर्ण परिवर्जनाने (abstinence) घेतली पाहिजे. हे परिवर्जन बळजबरीने व दमनाने नव्हे तर, एक प्रकारच्या आंतरिक किमयेमुळे साध्य झाले पाहिजे. सर्वसाधारणपणे प्रजननार्थ केलेल्या कृतीमध्ये ज्या शक्ती उपयोगात येतात त्या शक्तींचे, विकास आणि संपूर्ण रूपांतरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शक्तींमध्ये रूपांतर झाल्याचा परिणाम म्हणून ही आंतरिक किमया उदयास येते. हे तर उघडच आहे की, हा परिणाम संपूर्ण व खरोखरीच हितकारी होण्यासाठी मानसिक, प्राणिक जाणिवेतून इतकेच नव्हे तर, शारीरिक इच्छेतूनही सर्व कामप्रवृत्ती व कामेच्छा समूळ नष्ट व्हायला पाहिजेत. सर्व आमूलाग्र व चिरस्थायी रूपांतरण हे आतून बहिर्गामी दिशेने अग्रेसर होते त्यामुळे कोणतेही बाह्य रूपांतरण हे वरील प्रक्रियेचा स्वाभाविक व जवळजवळ अटळ असा परिणाम असते.

मानववंश जसा आहे तसाच चिरस्थायी राखण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, त्या मागणीपुढे मान तुकवून, तिचे हे साध्य यशस्वी व्हावे म्हणून, हा देह प्रकृतीला देऊ करावयाचा का; एका नूतन वंशाच्या निर्मितीच्या दिशेने टाकावयाचे पाऊल बनण्यासाठी, ह्या देहाची तयारी करावयाची ही निर्णायक निवड करावयास हवी. कारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणे शक्य नाहीत; व्यक्तीला भूतकालीन मानववंशाचा एक भाग बनून राहावयाचे आहे की, भावीकाळातील अतिमानववंशाशी संबंधित व्हावयाचे आहे, हे व्यक्तीने प्रत्येक क्षणी ठरवावयाचे आहे.

– श्रीमाताजी

दुर्दम्य हाक आली असेल तर आणि तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो. केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर या योगासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांपैकी ती एक आवश्यक बाब आहे, इतकेच.

*

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहिततता व संपूर्ण शरणागती यांजकडे वाटचाल करण्याचा ज्यांचा दृढ संकल्प आहे केवळ त्यांच्यासाठीच हा योग आहे.

*

पूर्णयोगामध्ये ईश्वराचा केवळ साक्षात्कार अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन अभिप्रेत आहे. तसेच, ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन जोपर्यंत सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते.

*

हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची ‘तयारी असल्या’ची खात्री पटल्याखेरीज, व्यक्तीने या मार्गामध्ये प्रवेश करता कामा नये. ‘तयारी असणे’, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. जर सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छाशक्ती असेल, तरच या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 27)