Tag Archive for: साधना

समर्पण – २९

समर्पणाबद्दलच्या नुसत्या चर्चा किंवा निव्वळ कल्पना किंवा उत्कटतेचा अभाव असलेली आत्मनिवेदनाची अर्धवट इच्छा या गोष्टी काही कामाच्या नाहीत; आमूलाग्र आणि संपूर्ण परिवर्तनासाठी लागणारा एक प्रकारचा जोर तिथे असला पाहिजे. केवळ मानसिक दृष्टिकोन स्वीकारून (समर्पण) ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही किंवा बाह्य पुरुषाला तो जसा आहे त्या अवस्थेत तसाच सोडून देणाऱ्या असंख्य आंतरिक अनुभवांनीदेखील ही गोष्ट साध्य होऊ शकणार नाही. या बाह्य पुरुषाने ईश्वराप्रत उन्मुख झाले पाहिजे, त्याला समर्पित झाले पाहिजे आणि परिवर्तित झाले पाहिजे. त्याने त्याचे अगदी लहानातले लहान स्पंदन, सवय, कृती यांचे समर्पण केले पाहिजे, त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट उचलून, दिव्य प्रकाशाप्रत खुली केली पाहिजे. जेणेकरून त्या गोष्टीची जुनी रूपं आणि उद्देश नाहीसे व्हावेत आणि दिव्य सत्याने व दिव्य मातेच्या रूपांतरणकारी चेतनेच्या कार्याने त्यांची जागा घ्यावी म्हणून त्या साऱ्या गोष्टी दिव्य शक्तिप्रत अर्पण केल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 80-81)

समर्पण – २८

मनाद्वारे आणि इच्छाशक्तीद्वारेदेखील समर्पण करता येणे शक्य असते हे योगिक अनुभव दाखवून देतो; स्वच्छ आणि प्रामाणिक मनाला समर्पणाची आवश्यकता लक्षात येते आणि मग स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छाशक्ती ही अवज्ञाकारी अंगांना समर्पण करण्यास प्रवृत्त करू शकते. अनुभवामधून असेही लक्षात येते की, प्रेमामधून समर्पणाचा उदय होतो असेच केवळ नाही तर उलटपक्षी, समर्पणाद्वारेही प्रेमाचा उदय होऊ शकतो. किंवा समर्पणासोबत अपूर्ण प्रेम हे परिपूर्ण प्रेमामध्ये वृद्धिंगत होऊ शकते. व्यक्ती ईश्वराला जाणण्याच्या किंवा त्याच्या पर्यंत पोहोचण्याच्या अगदी उत्कट कल्पनेने किंवा इच्छेने आरंभ करते आणि मग ती स्वतःच्या सर्वसामान्य वैयक्तिक कल्पना, इच्छाआकांक्षा, आसक्ती, कर्म करण्याच्या प्रेरणा, कृतींच्या सवयी इ. साऱ्या गोष्टी ईश्वराने हाती घ्याव्यात म्हणून त्या सर्व गोष्टींचे अधिकाधिक समर्पण करते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 385)

समर्पण – २७

समर्पण आणि प्रेम-भक्ती या काही परस्परविरोधी गोष्टी नाहीत – त्या एकमेकांसोबत जातात. हे खरे आहे की, प्रथमतः मनाद्वारे ज्ञानाच्या माध्यमातून समर्पण करणे शक्य असते परंतु त्यामध्ये मानसिक भक्ती अंतर्भूत असते आणि ज्या क्षणी समर्पण हृदयापर्यंत जाऊन पोहोचते, त्या क्षणापासून भक्ती ही भावना बनून आविष्कृत होते आणि भक्तिभावनेबरोबर प्रेम येतेच.

*

आत्म-समर्पण आत्मज्ञानाद्वारे घडण्याआधी, ते प्रथम प्रेम आणि भक्ती यांच्या माध्यमातून घडून येते. परंतु हे ही खरे आहे की, आत्मज्ञानामुळे संपूर्ण समर्पण हे अधिक शक्य होते.

*

पूर्ण प्रेम आणि भक्ती यांच्या द्वारा निःशेष समर्पण सर्वोत्तमरित्या घडून येऊ शकते. भक्तीचा प्रारंभ समर्पणाविना होऊ शकतो; मात्र स्वाभाविकपणे ती समर्पणाच्या दिशेनेच जाते; कारण तिची घडणच समर्पणासाठी झालेली असते.

*

भक्ती आणि समर्पण या गोष्टी उच्चतर आध्यात्मिक स्तरावर असू शकतात पण या गोष्टी अंतरात्मामध्ये जशा अपरिहार्य असतात तशा त्या उच्चतर आध्यात्मिक स्तरावर अपरिहार्य असत नाहीत. उच्चतर मनामध्ये व्यक्ती ‘ब्रह्मा’ बरोबरील एकत्वाबाबत इतकी सचेत असू शकते की तिच्या ठायी, भक्ती अथवा समर्पण असे वेगळे काही शिल्लकच उरलेले नसते.

– श्रीअरविंद
(CWSA 29:78), (CWSA 29:78), (SABCL 23 : 909),(CWSA 29:78)

समर्पण – २५

समर्पणाचा दृष्टिकोन हा प्रारंभापासूनच अगदी परिपूर्ण असा असू शकत नाही परंतु तो खराखुरा असू शकतो – जर केंद्रवर्ती इच्छा ही प्रामाणिक असेल आणि श्रद्धा व भक्ती असेल तर समर्पणाचा दृष्टिकोन खराखुरा असू शकतो.काही विरोधी गतिविधीदेखील असू शकतील, परंतु त्या गतिविधी मार्गामध्ये दीर्घ काळ अडसर बनू शकणार नाहीत आणि आंतरिक दृष्टिकोनाच्या व्यापकतेमध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये, कनिष्ठ भागांधील समर्पणाची अपूर्णता ही गंभीररित्या हस्तक्षेप करू शकणार नाही.

*

व्यक्तीने आपल्या मनाची आणि प्राणाचीइच्छा ईश्वरावर लादू नये तर ईश्वराची इच्छा स्वीकारून, तिचे अनुसरण करावे, हा साधनेचा खरा योग्य दृष्टिकोन आहे. “माझा हा हक्क आहे, माझी ही मागणी आहे, माझा हा दावा आहे, माझी ही गरज आहे, ही आवश्यकता आहे, तर मग मला ती गोष्ट का मिळत नाही?” असे व्यक्तीने म्हणता कामा नयेतर स्वतःला देऊ केले पाहिजे, समर्पित केले पाहिजे, व्यक्तीने दुःख करता कामा नये किंवा बंडही करता कामा नये, आणि ईश्वर जे काही देईल त्यात आनंद मानला पाहिजे, हाच अधिक चांगला मार्ग आहे. मग तुम्हाला जे काही प्राप्त होईल तीच तुमच्यासाठी सुयोग्य गोष्ट असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 72), (CWSA 29:75)

समर्पण – २४

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी इच्छेकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही माणसाला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही. त्यासाठी व्यक्तीकडे प्रथमतः काय असावयास हवे? तर, ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते अशी नित्य धारणा! आणि जरी हे असे कसे हे मनाला कळले नाही तरीही, ही धारणा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नव्हती ती गोष्ट संन्यस्त वृत्तीने स्वीकारली पाहिजे. आणि अशा रीतीने एका स्थिर समत्वाकडे जाऊन पोहोचले पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या हालचाली कदाचित असू शकतील परंतु तेव्हाही या स्थिर समत्वापासून विचलित होता कामा नये. आणि एकदा का हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग इतर सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

*

अहंभावात्मक इच्छेचा निरास करण्यापूर्वी, – कारण यासाठी बराच काळ लागतो – व्यक्तीने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी अहंभावात्मक इच्छा ईश्वरी संकल्पाप्रत समर्पित करण्यापासून सुरूवात केली पाहिजे आणि अखेरतः हे सातत्यपूर्ण रीतीने केले पाहिजे. आणि यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे, आपल्यापेक्षा ईश्वराला अधिक चांगले समजते, हे जाणणे होय. केवळ आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच नव्हे तर, आपल्या भौतिक स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आणि आपल्या जीवाच्या सर्व क्रिया-प्रक्रिया योग्य रीतीने कार्यरत राहाव्यात म्हणून आपल्यासाठी काय चांगले आहे, काय खरोखर आवश्यक आहे, हे आपल्याला समजते त्यापेक्षा ईश्वराला ते अधिक चांगले समजते; हे जाणणे हे पहिले पाऊल आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 224)

समर्पण – २३

… तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेला उधार देऊन, तुम्ही साक्षात्कार अधिक त्वरेने घडवून आणू शकता. हे सुद्धा निराळ्या रूपातील समर्पणच असते. ज्यामुळे तुम्ही एखाद्या ठोकळ्यासारखे बनाल असे निष्क्रिय समर्पण तुमच्याकडून अपेक्षित नाही तर, तुम्ही तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेच्या स्वाधीन केली पाहिजे.

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्या रात्रींविषयी जागृत होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊ. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागृत बनावे अशी ईश्वराची इच्छा असेल तेव्हा मी जागृत बनेन.”

दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ईश्वराला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल, आणि म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागृत होईन.” येथे तुम्ही, असे असे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ईश्वरार्पण करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागृत बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ईश्वराच्या इच्छेद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते.

तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नाही तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे.

तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे परिणाम हे तुम्ही ज्याची अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण!

– श्रीमाताजी
(CWM 03 : 18-19)

समर्पण – २१

संयम सोडून देणे म्हणजे प्राणाच्या मुक्त क्रीडेला वाव देणे आणि त्याचाच अर्थ असा की, सर्व प्रकारच्या शक्तींना आत शिरकाव करण्यास मुभा देणे. जोपर्यंत अतिमानस चेतना ही अधिमानसापासून त्या खाली असणाऱ्या सर्व जीवांमधील सर्व गोष्टींचे नियंत्रण व भेदन करत नाही, तोवर शक्तींचा दुटप्पी खेळ सुरूच राहणार आणि प्रत्येक शक्ती, मूलतः कितीही दिव्य असली तरी, ती प्रकाशाच्या शक्तींकडूनही वापरली जाऊ शकते किंवा ती शक्ती मन आणि प्राणांच्या माध्यमातून जात असल्याने, तिच्यामध्ये अंधकाराच्या शक्तींकडूनही विक्षेप आणला जाऊ शकतो. जोपर्यंत संपूर्ण विजय प्राप्त केला जात नाही आणि जोपर्यंत चेतना रूपांतरित होत नाही तोपर्यंत दक्षता, विवेक, नियंत्रण या गोष्टी सोडून देता येऊ शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 119)

समर्पण –२०

जरी अजून तुम्हाला सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ईश्वराचे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ईश्वराचे स्मरण करणे आणि त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. जेव्हा लोक काम चालू असताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. जरी काही जणांना या गोष्टीसाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा वर असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)

समर्पण – १९

ज्या क्षणी तुम्ही स्वतःला असे विचारू लागता की, “ईश्वराला अर्पण या विचाराने मी ही कृती केली का? ईश्वराला अर्पण करत आहोत अशी माझी भावना होती का?” त्या क्षणापासून जीवनातील प्रत्येक बारकावा आणि प्रत्येक कृती, विचारांचे प्रत्येक स्पंदन, अगदी प्रत्येक संवेदना, भावना जिला एरवी फार महत्त्व दिले गेले नसते ती गोष्ट आता निराळीच बनून जाते. जर तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी याचे स्मरण ठेवू शकाल तर, तुमचा दृष्टिकोन आधी होता त्यापेक्षा पूर्णपणे बदलून जातो. तो अधिक व्यापक होतो. असंख्य छोट्या छोट्या गोष्टींची एक अखंड मालिका आहे, तिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे असे एक स्थान असते. याआधी तुम्हाला या साऱ्याची जाण नसल्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही नुसत्याच सोडून देत होतात. आता मात्र हा बदललेला दृष्टिकोन तुमच्या चेतनेचे क्षेत्र विस्तीर्ण करतो. जर तुम्ही तुमच्या जीवनातील अर्धा तास दिलात आणि ह्याचा विचार केलात आणि जर तुम्ही स्वतःला हा प्रश्न केलात की, “हे ईश्वरार्पण होते का?” तर तुम्हाला असे आढळेल की, अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा विशाल होतात आणि मग तुम्हाला असे वाटू लागेल की, तुमचे जीवन समृद्ध आणि प्रकाशमान झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 133)

समर्पण – १८

तपशीलवार समर्पण म्हणजे जीवनाच्या सर्व अंग-उपांगांचे समर्पण. अगदी लहानात लहान गोष्टींचे तसेच दिसताना अगदी किरकोळ वाटतील अशा गोष्टींचेही समर्पण करणे म्हणजे तपशीलवार समर्पण. तपशीलवार समर्पणाचा अर्थ असा की, सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये ईश्वराचे स्मरण ठेवणे; आपण जे काही करतो, अनुभवतो किंवा विचार करतो, त्या साऱ्या गोष्टी त्या ईश्वराच्या सन्निध जाण्याचा एक मार्ग म्हणून त्या ईश्वरासाठीच केल्या पाहिजेत, आपण जे बनावे अशी त्याची इच्छा आहे ते अधिकाधिक बनण्यासाठी, त्याची इच्छा पूर्ण प्रामाणिकपणे आणि विशुद्धतेने आविष्कृत करण्यासाठी आपण सक्षम व्हावे, त्याच्या प्रेमाचे आपण साधन बनावे यासाठीच आपली प्रत्येक कृती, आपली भावना तसेच आपले विचार असले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 108)