Tag Archive for: साधना

साधनेची मुळाक्षरे – ११

श्रीअरविंद आपल्याला हे सांगण्यासाठी आले आहेत की, ‘सत्या’चा शोध घेण्यासाठी ही पृथ्वी सोडून जाण्याची आवश्यकता नाही; आपला आत्मा शोधण्यासाठी व्यक्तीने जीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; ‘ईश्वरा’शी संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीने हे जग सोडून जाण्याची किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित विश्वास बाळगण्याची आवश्यकता नाही. ‘ईश्वर’ सर्वत्र आहे, सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे, आणि तो जर गुप्त असेलच तर… त्याचे कारण आपण ‘त्या’ ला शोधण्याचे कष्टच घेत नाही.

आपण केवळ एका प्रामाणिक अभीप्सेद्वारे, आपल्या आतमध्ये असलेला कुलूपबंद दरवाजा उघडू शकतो… ती अशी एक गोष्ट असेल की जी जीवनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकेल; आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर ती असेल; ती गोष्ट आपल्या सर्व समस्या सोडवेल आणि आपल्याही नकळतपणे आपण ज्याची अभीप्सा बाळगतो त्या परिपूर्णत्वाप्रत ती आपल्याला घेऊन जाईल; ती गोष्ट आपल्याला अशा एका ‘सत्यत्वा’प्रत घेऊन जाईल की जे सत्यत्वच केवळ आपले समाधान करू शकते आणि आपल्याला चिरस्थायी असा आनंद, संतुलन, सामर्थ्य आणि जीवन प्रदान करते.

…..याचा आरंभबिंदू कोणता? तर त्यासाठी, आपल्याला ती गोष्ट मिळावी अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे, ती आपल्याला खरोखर हवी असली पाहिजे, आपल्याला तिची निकड भासली पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे अन्य कोणत्याही गोष्टीचा नाही तर, केवळ त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे. एक दिवस असा येतो, अगदी जलदगतीने येतो, जेव्हा व्यक्ती अन्य कोणताच विचार करू शकत नाही.

ही एकच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग नंतर…

मग व्यक्ती तिच्या अभीप्सेची स्पष्ट शब्दांत मांडणी करते, तिच्या अंतःकरणातून, ज्यामधून त्या निकडीची प्रामाणिकता अभिव्यक्त होईल अशी खरीखुरी प्रार्थना उदयाला येते, आणि मग… मग काय घडून येते ते व्यक्तीला दिसेलच.

काहीतरी घडून येईल. नक्कीच काहीतरी घडेल. प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगळेच रूप धारण करेल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 374-375)

साधनेची मुळाक्षरे – १०

चैत्य रूपांतरणामध्ये तीन मुख्य घटक असतात.

१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे, पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.

२) चैत्य पुरुषाचे किंवा आत्म्याचे खुलेपण, ज्यामुळे ते पुढे येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे अनुशासन करतात आणि त्या सर्वांना ‘ईश्वरा’कडे वळवितात.

३) समग्र कनिष्ठ अस्तित्वाचे आध्यात्मिक सत्याप्रत खुले होणे – या अंतिम गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (the psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 332)

साधनेची मुळाक्षरे – ०९

‘चैत्यीकरण’ (Psychisation) म्हणजे कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन, मनामध्ये योग्य दृष्टी आणणे, प्राणामध्ये योग्य आवेग आणि भावना आणणे, शरीरामध्ये योग्य हालचाली व सवयी आणणे. तसेच या साऱ्या गोष्टी एका ‘ईश्वरा’कडेच वळविणे; या साऱ्या गोष्टी प्रेम, भक्ती यांवर आधारित असणे आणि अंतिमतः ‘श्रीमाताजीं’ची जाणीव व दृष्टी सर्वांमध्ये, सर्वत्र तसेच हृदयामध्ये अनुभवास येणे, त्यांचीच शक्ती आपल्या अस्तित्वामध्ये कार्यकारी आहे इ. जाणवणे, तसेच भक्ती, आत्मनिवेदन आणि समर्पण असणे म्हणजे ‘चैत्यीकरण’

शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांचे वरून अवतरण होणे, आत्म्याची आणि ‘ईश्वरा’ची जाणीव होणे आणि उच्चतर वैश्विक चेतना आणि तिच्याप्रत समग्र चेतनेचे परिवर्तन होणे म्हणजे ‘आध्यात्मिक परिवर्तन’ (The spiritual change) होय.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 380)

साधनेची मुळाक्षरे – ०६

सारे काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – कर्म करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी वास्तव (real) चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत – सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी त्या करता कामा नयेत.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच कृती करायला तुम्ही नेहमी शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 254)

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

साधनेची मुळाक्षरे – ०४

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या कर्मव्यवहारामध्ये सदा सर्वकाळ जरी अजून ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे व ते कर्म त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. तुमची पद्धत मात्र मला काहीशी वेदनादायी आणि अवघड असल्याचे दिसते, – कारण तुम्ही मनाच्या ज्या भागाने कर्म करता, त्याच भागाने, त्याचवेळी स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करता असे दिसते. तसे करणे शक्य आहे किंवा नाही, याची मला कल्पना नाही. जेव्हा लोक कर्म करताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग होता – अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआपपणे घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्या सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही जणांना या गोष्टीसाठी जरी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

मानसिक प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही – एवढेच की साऱ्या गोष्टी एखाद्याने स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्मात पारंगत असणाऱ्या व्यक्तींखेरीज (spiritual athletes) इतरांसाठी मात्र त्या गोष्टी कष्टदायक प्रयत्न ठरतात. अन्य पद्धत ही जवळच्या मार्गाचा हव्यास बाळगणारी आहे, असेही मला म्हणायचे नाही. एवढेच की, मी म्हणालो त्याप्रमाणे, त्या पद्धतीचे परिणाम दिसण्यास अधिक वेळ लागतो. धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्ये आवश्यक असतात. बालावानांसाठी सामर्थ्य असणे ठीक आहे पण – अभीप्सा आणि तिला ईश्वरी ‘कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे काही सर्वस्वी आख्यायिका आहेत, असे नाही; या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)

साधनेची मुळाक्षरे – ०३

दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत : हृदय-चक्राने (heart centre) त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी (mind centres) त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे. हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते. ईश्वराने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिलीवहिली उन्मुखता (opening) घडून येते. ‘साधने’च्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे ‘अभीप्सा’, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण ह्या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते. सुरुवातीला मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, जाणिवेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. ईश्वरी शांती, (आधी केवळ ‘शांती’, किंवा ‘शांती व सामर्थ्य’ एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केल्याने, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने ही दुसरी उन्मुखता घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 204-205)

साधनेची मुळाक्षरे – ०२

मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती (surface) मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्या पातळीवर जीवन जगत असतो पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो, त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे; कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित, थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे, या आंतरिक पुरुषाच्या श्रेणींप्रत खुले होणे आणि तेथून बाह्य जीवन जगणे, तसेच या आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने बाह्यवर्ती जीवनाचे शासन करणे, ही योगाची पहिली प्रक्रिया असते. हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो; तो आत्मा म्हणजे त्याच्या मन, प्राण आणि शारीरिक घटकांचे बाह्यवर्ती मिश्रण नसते तर, त्या सर्वांच्या पाठीशी असणारी ती सद्वस्तू (Reality) असते, ‘दिव्य अग्नी’ची ती ठिणगी असते. मनुष्याने स्वतःच्या आत्म्यामध्ये जगण्यास, शुद्धिकरण करण्यास तसेच उर्वरित प्रकृती ‘सत्या’भिमुख करण्यास शिकले पाहिजे. त्यानंतर, त्यापाठोपाठ ऊर्ध्वमुखी खुलेपण (opening) येईल आणि अस्तित्वामध्ये उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548)

मला असा एक माणूस माहीत आहे की, ज्याला त्याची चेतना व्यापक करायची होती; तो म्हणाला की, त्याला त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावर जमिनीवर पाठ टेकून आडवे पडायचे आणि चांदण्यांकडे पाहत राहायचे, त्यांच्याशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करायचा आणि त्या जगड्व्याळ अशा विश्वात खोलखोल दूरवर जायचे. अशा रीतीने ही पृथ्वी, तिच्यावरील छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची व्यवस्था, त्यांचे प्रमाण या सगळ्या गोष्टींबाबतचे भान हरपून जाते आणि तुम्ही आकाशाएवढे विशाल होता – पण तुम्ही ब्रह्मांडाएवढे विशाल होता असे म्हणू शकत नाही कारण आपण जे पाहतो तो त्याचा (ब्रह्मांडाचा) केवळ अंशभागच असतो, परंतु तुम्ही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाएवढे विशाल होता, असे म्हणू शकता. आणि अशा रीतीने, काही कालावधीसाठी तरी तुमच्यातील छोट्या छोट्या अशुद्धता गळून पडतात आणि व्यक्ती एका अतिविशाल मापदंडाद्वारे गोष्टी समजावून घेते. हा खरोखर चांगला प्रयोग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)

निसर्गाचे रहस्य – १४

‘निसर्गा’च्या शक्ती या अंध आणि हिंस्त्र असतात, असे म्हटले जाते. परंतु तसे अजिबातच नसते. माणूस स्वतःची फूटपट्टी ‘निसर्गा’ला लावून, त्याकडे बघत असतो म्हणून त्याला तसे वाटते. थोडं थांबा, आपण एक उदाहरण घेऊया. एखादा भूकंप झाला की, अनेक बेटं पाण्याने वेढून जातात आणि त्यामध्ये लाखो माणसं आपला जीव गमावतात. तेव्हा लोकं म्हणतात, “निसर्ग किती क्रूर आहे!”

मानवाच्या दृष्टिकोनातून पाहता हा निसर्ग क्रूर आहे. निसर्गाने काय केले आहे? त्याने हलकल्लोळ माजवला आहे. पण विचार करा, तुम्ही जेव्हा उड्या मारता, धावत असता किंवा तसेच काही करत असता, तेव्हा कधीतरी तुम्ही पडता-आपटता, तुम्हाला मार बसतो आणि तुमच्या शरीराचा तो भाग काळानिळा पडतो. आपल्या पेशींच्या दृष्टीने तो एक भूकंपच असतो, तुम्ही अगणित पेशी नष्ट केलेल्या असतात. हा प्रमाणाचा प्रश्न आहे. आपल्यासाठी, आपल्या छोट्याशा चेतनेसाठी, अगदी लहान असणाऱ्या आपल्या चेतनेसाठी हे सारे फार महाभयंकर असते पण पृथ्वीच्या दृष्टीने तो केवळ एक लहानसा मुकामार असतो. आपण येथे फक्त पृथ्वीबद्दलच बोलत आहोत. पृथ्वी म्हणजे तरी काय? पृथ्वी म्हणजे काहीच नाही, पृथ्वी म्हणजे विश्वामधील जणू एक छोटेसे खेळणे आहे. आपण जर या विश्वाबद्दल बोलू लागलो तर, जगतांचे नाहीसे होणे हे एखाद्या मुक्यामारासारखेच असते. ते अगदीच किरकोळ असते.

शक्य झाले तर व्यक्तीने स्वत:ची चेतना विशाल केलीच पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)