Posts

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

साधनेची मुळाक्षरे – ३३

(श्रीअरविंदलिखित पत्रामधून…)

हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा तरी आहे, म्हणजे असे की, यामध्ये, संपूर्ण जीवच त्याच्या सर्व अंगांनिशी ‘ईश्वरा’कडे वळणे अभिप्रेत आहे.

याचा अर्थ असा की, तेथे ज्ञान, कर्म तसेच ‘भक्ती’देखील असली पाहिजे. त्यात अधिकची भर म्हणजे, त्यामध्ये प्रकृतीच्या पूर्ण परिवर्तनाचा, परिपूर्णत्वाच्या ध्यासाचा समावेश होतो, ज्यामुळे प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकात्म होईल. केवळ हृदयच ईश्वराकडे वळले आणि त्याचे परिवर्तन झाले, असे होऊन चालणार नाही, तर मनसुद्धा ईश्वराकडे वळले पाहिजे आणि म्हणून ज्ञानसुद्धा गरजेचे आहे; त्याचबरोबर इच्छाशक्ती, कर्मशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा ईश्वराकडे वळली पाहिजे म्हणून कर्मसुद्धा आवश्यक आहे.

या ‘योगा’मध्ये इतर ‘योगमार्गां’च्या पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे – उदा. ‘पुरुष-प्रकृती’ची पद्धत, परंतु अंतिम उद्दिष्टाबाबत मात्र फरक आहे. ‘पुरुषा’चे ‘प्रकृती’पासून विलगीकरण येथेही आहे, पण ते तिचा त्याग करण्यासाठी नाही तर, पुरुषाने स्वतःला आणि प्रकृतीला जाणावे या हेतूने आहे. पुरुष हा प्रकृतीचे खेळणे म्हणून नव्हे तर प्रकृतीचा ज्ञाता म्हणून, स्वामी म्हणून आणि पालनकर्ता म्हणून असावा, या हेतुने हे विलगीकरण आहे; आणि हे असे घडत असताना किंवा झाल्यानंतर, व्यक्ती स्वतःचे सर्वस्व ईश्वरार्पण करते.

व्यक्ती ज्ञानापासून किंवा कर्मापासून किंवा ‘भक्ती’पासून वा परिपूर्णत्वासाठी (प्रकृतीचे परिवर्तन) आत्म-शुद्धिकरणाच्या ‘तपस्ये’पासून प्रारंभ करू शकते आणि उर्वरित गोष्टी या त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रक्रिया म्हणून विकसित करू शकते किंवा व्यक्ती या साऱ्या गोष्टी एकाच प्रक्रियेमध्येदेखील समाविष्ट करू शकते. सर्वांसाठी एकच एक असा नियम नाही, ते व्यक्ती आणि तिच्या प्रकृतीवर अवलंबून असते.

समर्पण ही या ‘योगा’ची मुख्य ताकद आहे, परंतु समर्पण हे प्रगमनशील (Progressive) असले पाहिजे, प्रारंभीच संपूर्ण समर्पण शक्य नसते, तर प्रारंभी, त्या संपूर्णतेची जिवामध्ये असलेली ती एक इच्छाच असते – वस्तुतः या साऱ्याला वेळ लागतो. आणि जेव्हा समर्पण परिपूर्ण होते तेव्हाच साधनेचा पूर्ण बहर शक्य असतो. तोपर्यंत, समर्पणाच्या चढत्यावाढत्या वास्तवानिशी वैयक्तिक प्रयत्न असणे देखील आवश्यक असते. व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’च्या सामर्थ्याला आवाहन करते आणि एकदा का ती शक्ती त्या जिवामध्ये अवतरित व्हायला सुरुवात झाली की, मग ती सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांना आधार पुरविते, नंतर ती हळूहळू व्यक्तीची समग्र कृतीच हाती घेते, अर्थात यासाठी साधकाची संमती असणे ही बाब नेहमीच गरजेची असते.

एकदा ‘शक्ती’ने कार्य हाती घेतले की, साधकाच्या दृष्टीने ज्या ज्या विभिन्न प्रक्रिया आवश्यक असतात, त्या साऱ्या प्रक्रिया ती घडवून आणते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्ञानाच्या, ‘भक्ती’च्या, आध्यात्मिक कर्माच्या प्रक्रिया, प्रकृतीच्या रूपांतरणाच्या प्रक्रिया ती घडवून आणते. या साऱ्या प्रक्रिया एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत, ही कल्पना दोषपूर्ण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 207-208)

साधनेची मुळाक्षरे – ३२

हृदयाच्या दृष्टीने विचार केला तर, ईश्वरभेटीच्या तळमळीपोटी येणारे भावनावेग, रडू येणे, दुःखीकष्टी होणे, व्याकूळ होणे या गोष्टी ‘पूर्णयोगा’मध्ये गरजेच्या नाहीत. एक दृढ अशी अभीप्सा जरूर असली पाहिजे, त्याबरोबरच एक उत्कट आसदेखील असू शकते, उत्कट प्रेम आणि ऐक्याची इच्छा असली पाहिजे पण दु:ख किंवा अस्वस्थता असण्याचे काही कारण नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 377)

साधनेची मुळाक्षरे – ३१

तुम्ही मनाला शांत करण्याचा थेट प्रयत्न करत असाल, तर तसे करणे ही अवघड गोष्ट आहे, जवळजवळ अशक्यच असे म्हटले तरी चालेल. कारण मनाचा जो सर्वांत भौतिक भाग असतो तो त्याची क्रिया कधीच थांबवत नाही – एखादे न थांबणारे रेकॉर्डिंग मशीन असावे तसा मनाचा तो भाग चालूच राहतो. त्याने ज्या ज्या गोष्टींची नोंद घेतलेली असते, त्या त्या साऱ्या गोष्टी तो पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर आणत राहतो आणि त्याला थांबविण्यासाठी लागणारे बटण जोपर्यंत आपल्याकडे नसते तोपर्यंत तो थांबत नाही, तो चालूच राहतो, तो अनंतकाळपर्यंत चालूच राहतो. उलट, तुम्ही जर तुमची चेतना ही सामान्य मनाच्या वर असणाऱ्या, उच्चतर क्षेत्रामध्ये नेऊ शकलात तर, ‘प्रकाशा’प्रत झालेल्या या उन्मुखतेमुळेच मन शांतस्थिर होते, मग आता त्यामध्ये कोणतीही खळबळ होत नाही, आणि अशा रीतीने मिळविलेली मानसिक शांतता ही नित्याचीच होऊन जाते. तेथे बाह्यवर्ती मन हे कायमस्वरूपी शांतस्थिर झालेले असते. एकदा का तुम्ही या प्रांतात प्रवेश केलात की मग, तुम्ही कदाचित तिथून कधीच बाहेर येऊ इच्छिणार नाही.

‘उच्चतर प्रकाशाप्रत अभीप्सा’ हाच मन शांत करण्याचा एकमेव उपाय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 182)

साधनेची मुळाक्षरे – ३०

श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील मजकूर –

‘योगसाधने’मध्ये प्रार्थना किंवा ध्यान या दोन्हीचे खूप महत्त्व असते, अगदी खोल अंत:करणातून उदित झालेली प्रार्थना ही भावनांच्या किंवा अभीप्सेच्या शीर्षस्थानी असायला हवी; ईश्वरविषयक आनंद किंवा प्रकाश यांच्या समवेत आतून जिवंतपणे उमलून येणारी बाब म्हणून ‘जप’ किंवा ध्यान व्हायला हवे. जर ह्या गोष्टी केवळ यांत्रिकपणे केल्या आणि केवळ कर्तव्य म्हणून केल्या तर त्या रूक्षपणा आणि निरसता यांच्याकडे झुकतात आणि त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याची शक्यता असते.

तुम्ही अमुक एखादा परिणाम घडून येण्यासाठी, एक साधन म्हणून जरुरीपेक्षा जरा जास्तच प्रमाणात ‘जप’ करत आहात असे मला वाटते, असे जेव्हा मी म्हणालो, तेव्हा मला असे म्हणावयाचे होते की, – तुम्ही विशिष्ट गोष्टी घडून येण्यासाठी एक प्रक्रिया म्हणून, एक साधन म्हणून जपाचा अधिक उपयोग करत आहात आणि म्हणूनच मला तुमच्यामध्ये मानसिक, आत्मिक अशी अवस्था विकसित व्हावी असे वाटत होते, कारण जेव्हा चैत्य पुरुष पुढे आलेला असतो तेव्हा प्रार्थनेमध्ये आनंद आणि जिवंतपणा यांचा अभाव नसतो; तेव्हा त्यामध्ये अभीप्सा असते, एक धडपड, एक आस असते; अशा वेळी भक्तीचा अखंड पाझर चालू राहण्यामध्ये कोणतीही अडचण नसते. मन जेव्हा शांत, स्थिर असते, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख असते तेव्हा ध्यानामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यामध्ये रस वाटत नाही असेही होत नाही. ध्यान ही ज्ञानाभिमुख अशी एक प्रक्रिया आहे आणि ती ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रगत होते; ती मस्तकाशी संबंधित बाब आहे, हृदयाशी नाही; तेव्हा तुम्हाला जर ध्यान हवे असेल तर, तुम्ही ज्ञानाकडे पाठ फिरविता कामा नये.

हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे ध्यान नव्हे; तर ती आपल्या ‘प्रियकरा’ला, ‘ईश्वरा’ला दिलेली हाक आहे. ‘पूर्णयोग’ म्हणजे केवळ ‘ज्ञानयोग’ नव्हे – ज्ञानयोग हा एक मार्ग झाला; परंतु आत्मदान, समर्पण, भक्ती हा पूर्णयोगाचा पाया आहे आणि अंतिमत: हा पाया नसेल तर काहीच होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226-227)

साधनेची मुळाक्षरे – २९

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम नैतिक वा आदर्शवादी अशा ज्या ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी असल्याचे मानवी मन मानते, त्या गोष्टीसुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची सुरुवातदेखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

या वृत्तीने केलेले कर्म हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये शब्दातीत ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी इच्छे’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’ पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; व्यक्तीचे कार्य ‘विश्वशक्ती’च करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहत असल्याची किंवा तो साक्षीदार असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्वमाता किंवा परम-‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने ‘ईश्वरा’प्रत सतत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदित केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत खुले होत असल्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. अंतिमतः कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते – त्यालाच आपण ‘प्रकृतीचे रूपांतरण’ (Transformation of the nature) असे संबोधतो.

अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात. ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही राजमार्ग नाही.

सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीही निश्चितच वगळण्यात आलेली नाही, कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, त्याच गोष्टी म्हणजे अनिवार्यपणे भक्तीचीही एक प्रक्रिया आहे…

एवढेच की, जीवनापासून पलायनवादी एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र योगाची संपूर्ण प्रक्रिया म्हणून येथे स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती विशुद्ध ध्यानमग्न अशा रीतीने तासन् तास बसत असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र ‘पूर्णयोग’ नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-218)

साधनेची मुळाक्षरे – २८

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही – पण ती अधिकाधिक सजग करणे आवश्यक असते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधी अवस्थेमध्येच असले पाहिजे, असे काही आवश्यक नसते.

*

वाचत असताना किंवा विचार करत असताना, मस्तकाच्या शीर्षस्थानी किंवा मस्तकाच्या वर असणारे स्थान, ‘योगिक’ एकाग्रता करण्यासाठी योग्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 250), (CWSA 30 : 250), (CWSA 29: 311)

साधनेची मुळाक्षरे – २७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे.

सत्यचेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे एक केवळ साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 300)

साधनेची मुळाक्षरे – २६

प्रश्न : ध्यानाची उद्दिष्टे काय असायला हवीत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असतील ती! परंतु जर का तुम्ही मला निरपवाद उत्तर विचारत असाल, तर मला असे म्हटले पाहिजे की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनांवर मनाने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो ‘देव’ ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘एकमेव आत्मा’ आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, त्या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

साधनेची मुळाक्षरे – २५

प्रश्न : ध्यानासाठी अगदी आवश्यक असणारी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नाही, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गलक्यामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे.

मनाचे सैरावैरा भरकटणे, विस्मरण, झोप, शारीरिक आणि स्नायुगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार व भावनांचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक आणि नैतिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)