(ओढवलेल्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे, त्याने नाउमेद न होता, उलट त्या परिस्थितीचा साधनेसाठी कसा लाभ करून घेता येईल, ह्याचा विचार करण्यास येथे श्रीअरविंद सांगत आहेत.)
…असे म्हणता येईल की, वैश्विक शक्तींचा खेळ, विश्वामधील संकल्प हा नेहमीच, कार्याच्या व साधनेच्या थेट दिशेशी सुसंवादी आणि कार्य व साधना सुरळीत घडण्यासाठी अनुकूल कार्य करत असल्याचे दृश्य स्वरूपात दिसत नाही. चढउतार भासतील अशा गोष्टी घडून येतात, किंवा अचानक अशी काही वळणे येतात की ज्यामुळे, जी दिशा पकडलेली आहे त्या मार्गापासून विचलित होणे, किंवा त्यामध्ये खंड पडणे, विरोधी किंवा प्रतिकूल परिस्थिती येणे, असे बरेचदा घडू शकते. किंवा जे तात्पुरते का होईना पण सुस्थिर, प्रस्थापित झालेले होते त्यापासून मूढपणे दूर जाणे या गोष्टी घडू शकतात.
परंतु अशा वेळी एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे, समत्व राखले पाहिजे. आणि साधनेमध्ये किंवा जीवनामध्ये जे काही घडते, तिला प्रगतीची संधी, प्रगतीचे साधन बनविले पाहिजे. वैश्विक शक्तींचा संकल्प आणि वैश्विक शक्तींचा हा जो खेळ सुरू असतो, त्या खेळामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टींचे नेहमीच एक मिश्रण आढळून येते; त्यापाठीमागे त्याच्या अतीत असणारी एक अधिक उच्चतर, गुप्त अशी ईश्वरी ‘संकल्पशक्ती’ कार्यरत असते. आणि व्यक्तीने या ईश्वरी ‘संकल्पशक्ती’ची वाट पाहिली पाहिजे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे; पण त्याचबरोबर ती कार्यपद्धती तुम्हाला नेहमी समजलीच पाहिजे, अशी अपेक्षाही तुम्ही बाळगता कामा नये.
मनाला हे किंवा ते व्हायला हवे असे वाटत असते; त्याने पकडलेली दिशा तशीच कायम राहावी असे त्याला वाटत असते; पण मनाला जे हवेहवेसे वाटत असते ते सर्व नेहमीच, व्यापक हेतूने जे योजण्यात आलेले असते तेच असते असे नाही. व्यक्तीने नेहमीच साधनेच्या निश्चित अशा मध्यवर्ती ध्येयाचे अनुसरण केले पाहिजे, आणि त्यापासून कधीही विचलित होता कामा नये. तथापि व्यक्तीने बाह्य परिस्थिती, स्थिती इ. गोष्टी म्हणजे जणू काही अगदी पायाभूत महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे समजून, त्या पायावर (साधनेची इमारत) उभारता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 564-565)