Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – २८१

शरीराचे रूपांतरण

तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर आधारावरच व्यक्ती ‘ईश्वरी’ कार्यासाठीचे संपूर्णतया प्रभावी असे साधन (instrument) बनू शकते.

व्यक्ती असे साधन झाली तरीदेखील अजून या साधनभूत व्यक्तीचे गतिमान रूपांतरण (dynamic transformation) साध्य करून घेणे शिल्लक असते. आणि ते रूपांतरण मन, प्राण आणि शरीरामध्ये होणाऱ्या उच्चतर आणि अधिक उच्चतर अशा चेतनाशक्तीच्या अवतरणावर अवलंबून असते. अतिमानसिक ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ यांच्या जे अधिकाधिक समीप आहे, त्याचा अर्थबोध येथे ‘उच्चतर’ अस्तित्व या शब्दाने होतो.

मी ज्याचा उल्लेख केला त्याच्या आधारावरच या उच्चतर शक्तीचे अवतरण करणे शक्य असते. त्यासाठी चैत्य पुरुष (psychic being) सातत्याने अग्रभागी राहणे तसेच साधनभूत झालेल्या मन, प्राण व शरीर आणि अस्तित्वाच्या या उच्चतर स्तरांच्या दरम्यान त्याने मध्यस्थ म्हणून कार्य करणे आवश्यक असते. म्हणून प्रथम हे पायाभूत स्थिरीकरण (stabilisation) पूर्ण झाले पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये उच्चतर स्तरावरील समग्र ऊर्जा किंवा अनुभूती खाली उतरविणे शक्य नसते. रूपांतरणकार्यासाठी साहाय्य करण्यासाठी म्हणून त्यांचा फक्त प्रभाव खाली येतो. एकदा का हे रूपांतरण घडून आले की मग, शरीर अधिक सक्षम होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 362-363)

साधना, योग आणि रूपांतरण – २८०

शरीराचे रूपांतरण

(शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे जाणे आणि व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये जे काही उद्भवते त्याच्यावर मात करणे किंवा त्यामध्ये परिवर्तन करणे अध्याहृत असते; जेणेकरून तो भाग, उच्चतर गोष्टींना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु समग्र व्यक्तित्वामध्ये संपूर्ण परिवर्तन हे ‘ऊर्ध्वस्थित’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत केलेल्या आरोहणाद्वारे आणि ‘ईश्वरा’च्या अवतरणाद्वारे शक्य होते. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘आत्म्या’चा साक्षात्कार आणि अगदी शारीर-स्तरापर्यंत येत, उच्चतर शांतीचे झालेले संपूर्ण अवतरण ही त्याची पहिली पायरी असते.

*

हो, नक्कीच. आणि म्हणूनच मी, ज्या जडभौतिक भागाने स्वतःला इतके अग्रस्थान देऊ केले आहे, त्या भागामध्ये साक्षात्कार व्हावा यावर एवढा भर देत आहे. व्यक्तीमधील एखादा भाग जेव्हा अशा रीतीने स्वतःचे सारे दोष व मर्यादा दाखवून देत लक्ष वेधून घेतो, तेव्हा त्या गोष्टींवर मात केली जावी या हेतुने तो पृष्ठस्तरावर येत असतो. येथे (तुमच्या उदाहरणामध्ये) जडत्व किंवा अक्षमता (अप्रवृत्ती), अंधकार किंवा विस्मरण (अप्रकाश) या साऱ्या गोष्टी, त्या नीट व्हाव्यात या हेतुने आणि त्यांचे प्रथमतः किंवा प्राथमिक रूपांतरण व्हावे यासाठी पृष्ठस्तरावर आल्या आहेत.

मनामध्ये शांती आणि प्रकाश, हृदयामध्ये प्रेम आणि सहानुभूती, प्राणामध्ये शांतस्थिरता आणि ऊर्जा, शरीरामध्ये स्थायी ग्रहणशीलता व प्रतिसाद (प्रकाश, प्रवृत्ती) या गोष्टी निर्माण होणे म्हणजे आवश्यक असणारे परिवर्तन होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 366)

साधना, योग आणि रूपांतरण – २७९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

साधनेच्या वाटचालीदरम्यान आता तुमची चेतना ही कनिष्ठ शारीर-प्रकृतीच्या (lower physical nature) संपर्कामध्ये आली आहे. आणि मनाद्वारे, किंवा अंतरात्म्याद्वारे किंवा आध्यात्मिक शक्तीद्वारे नियंत्रित केलेली नसताना ती जशी असते तशीच ती तुम्ही पाहत आहात. ही प्रकृती मुळातच कनिष्ठ आणि अंधकारमय इच्छावासनांनी भरलेली असते. मानवाचा तो सर्वाधिक पशुवत भाग असतो. तेथे काय दडलेले आहे हे कळावे यासाठी आणि त्याचे रूपांतरण करण्यासाठी व्यक्तीला या भागाच्या संपर्कात यावेच लागते.

पारंपरिक प्रकारातील बरेचसे साधक आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रांतामध्ये उन्नत होण्यामध्ये धन्यता मानतात आणि या कनिष्ठ शारीर-प्रकृतीला आहे तशीच सोडून देतात. परंतु त्यामुळे ती होती तशीच, म्हणजे तिच्यामध्ये काही परिवर्तन न होता तशीच शिल्लक राहते. भलेही ती बहुतांशी शांत झाली असली तरीसुद्धा तिच्यामध्ये संपूर्ण रूपांतरण शक्य होत नाही.

उच्चतर ‘शक्ती’ने या अंधकारमय शारीर-प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवावे यासाठी तुम्ही अविचल व स्वस्थ राहा आणि त्या शक्तीला त्यावर कार्य करू द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359)

साधना, योग आणि रूपांतरण – २७८

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही तुमच्या साधनेमध्ये दीर्घकालीन विश्रांतीच्या किंवा रितेपणाच्या कालावधीमध्ये पोहोचला आहात, असे मला जाणवले. विशेषतः व्यक्ती जेव्हा शारीर आणि बहिर्वर्ती चेतनेमध्ये ढकलली जाते तेव्हा सहसा हे असे घडून येते. अशा वेळी मज्जागत व शारीरिक भाग हे प्रमुख होतात आणि योगचेतना लुप्त झाल्यामुळे, ते भागच व्यक्तित्वाचे जणू प्रमाण असल्यासारखे वाटू लागतात. आणि तेव्हा मग तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे बाह्य, छोट्याछोट्या गोष्टींबाबत तुम्ही (अति)संवेदनशील होता. तथापि, नव्या प्रगतीपूर्वीची ही मध्यंतराची स्थिती असू शकते.

तुम्ही काय केले पाहिजे? तर, ध्यानासाठी काही वेळ राखून ठेवण्याबाबत आग्रही राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्यावेळी अगदी कमीत कमी अडथळा येईल अशी दिवसभरातील कोणतीही वेळ निवडावी. ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही (योगचेतनेच्या) पुन्हा संपर्कात आले पाहिजे. शारीर-चेतना ही अग्रभागी आल्यामुळे काही अडचणी येतील परंतु चिकाटीने बाळगलेल्या अभीप्सेमुळे, योगचेतना पुन्हा प्राप्त करून घेता येईल.

(अशा रीतीने) आंतरिक आणि बाह्य अस्तित्वामधील संबंध पुनर्प्रस्थापित झाल्याचे तुम्हाला एकदा का जाणवले की मग, सर्वाधिक बाह्य मन आणि अस्तित्वामध्ये नित्य चेतनेसाठी एक आधार तयार करण्यासाठी, (आवश्यक असणारी) शांती, प्रकाश आणि शक्ती बाह्य अस्तित्वामध्ये अवतरित व्हावी म्हणून त्यांना आवाहन करा. असे केल्यामुळे, ध्यानामध्ये आणि एकांतामध्ये जशी चेतना असते तशीच चेतना तुमच्यासोबत तुमच्या कर्मामध्ये, कृतींमध्येदेखील टिकून राहील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 368)

साधना, योग आणि रूपांतरण – २७७

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

दीर्घ काळ मानसिक व प्राणिक स्तरावर राहिल्यानंतर आता तुम्ही शारीर-चेतनेविषयी (physical consciousness) सजग झाला आहात ही वस्तुस्थिती आहे आणि प्रत्येकामधील शारीर-चेतना ही अशीच असते. ती जड, आणि जे आहे त्यालाच चिकटून राहणारी (conservative) असते, तिला कोणतीही हालचाल किंवा बदल करण्याची इच्छा नसते. ती तिच्या सवयींना (लोकं यालाच त्यांचे व्यक्तिमत्त्व असे संबोधतात.) चिकटून राहते किंवा तिच्या सवयी (सवयीच्या गतिप्रवृत्ती) शारीर-चेतनेला चिकटून राहतात. आणि घड्याळाचे काटे जसे सतत यांत्रिकपणाने फिरत राहतात त्याप्रमाणे त्या सवयी स्वतःची पुनरावृत्ती करत राहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या प्राणाचे काही प्रमाणात शुद्धीकरण करता तेव्हा त्यामधील गोष्टी खाली जातात आणि त्या शारीर-चेतनेमध्ये जाऊन बसतात. तुम्ही स्वतःविषयी सचेत झालात आणि यदाकदाचित तुम्ही दबाव टाकलात तरी, शारीर-चेतना अतिशय संथपणे प्रतिसाद देते. तो इतका संथ असतो की, प्रथमतः त्यामध्ये तसूभरसुद्धा बदल झाल्याचे जाणवत नाही.

त्यावर उपाय काय? तर, स्थिर आणि अविचल अभीप्सा, धीराने केलेले कार्य, शरीरामध्ये अंतरात्म्याची जागृती, आणि या अंधकारमय भागांमध्ये ऊर्ध्वस्थित प्रकाश व शक्तीसाठी आवाहन करणे. प्रकाश येताना स्वतःबरोबर उच्चस्तरावरील चेतना घेऊन येतो, त्याच्यापाठोपाठ शक्तीला यावेच लागते आणि (शारीर-चेतनेमधील अनावश्यक गतिविधींमध्ये) परिवर्तन होत नाही किंवा त्या नाहीशा होत नाहीत तोपर्यंत त्या शक्तीला त्यावर कार्य करावे लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २७६

शरीराचे रूपांतरण

शारीर-साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१) जडभौतिकाच्या जडत्वापासून, आणि शारीर-मनाच्या (physical mind) शंकाकुशंकांपासून, मर्यादांपासून, त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीपासून सुटका करून घेणे.
२) प्राणिक-शारीर (vital physical) नसांच्या सदोष ऊर्जांपासून सुटका करून घेणे, आणि त्याच्या जागी खरी चेतना तेथे आणणे.
३) शारीर-चेतना (physical consciousness) ही ‘ईश्वरी संकल्पा’चे परिपूर्ण साधन व्हावे म्हणून, ऊर्ध्वस्थित असणारा उच्चतर प्रकाश, शक्ती, शांती आणि आनंद त्या चेतनेमध्ये उतरविणे.

*

शारीर-चेतना ही संतुलित व्हावी लागते, ती ऊर्ध्वस्थित असणाऱ्या प्रकाशाने आणि शक्तीने भरून जाणे आवश्यक असते आणि सचेत व प्रतिसादक्षम होणे आवश्यक असते. या साऱ्या गोष्टी एका दिवसात होणे शक्य नसते. त्यामुळे, नाउमेद व अधीर न होता, स्थिरपणाने वाटचाल करत राहा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 367-368, 371)

साधना, योग आणि रूपांतरण – २७५

शरीराचे रूपांतरण

शारीर-चेतनेचे परिवर्तन करण्यासाठी काही जणांकडून अतिरेक केला जातो. परंतु त्याचा काही उपयोग होत असेल यावर माझा विश्वास नाही. शारीर-चेतना ही एक मोठी हटवादी अडचण असते यात काही शंका नाही, परंतु ती शारीर-चेतना प्रकाशित केली पाहिजे, तिचे मतपरिवर्तन केले पाहिजे, तिचे परिवर्तन व्हावे म्हणून (प्रसंगी) तिच्यावर दबाव टाकण्यासही हरकत नाही, पण तिचे दमन करता कामा नये किंवा तिचे परिवर्तन व्हावे यासाठी कोणताही अतिरेकी मार्गदेखील अवलंबता कामा नये. (परिवर्तनासाठी) मन, प्राण आणि शरीराबाबत लोकं अतिरेक करतात कारण ते उतावीळ झालेले असतात. परंतु याबाबतीत माझ्या नेहमीच असे निदर्शनास आले आहे की, त्यामधून अधिक विरोधी प्रतिक्रिया आणि अधिक अडथळे निर्माण होतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही.

*

एकदा का तुम्हाला ‘ईश्वरी शक्ती’चा संपर्क प्राप्त झाला की, त्या शक्तीप्रत खुले होण्यावर लक्ष केंद्रित करा. तिच्या विरुद्ध असणाऱ्या शारीर-चेतनेच्या सूचनांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती, शारीर-चेतनेशी स्वतःला अभिन्न मानता, – खरंतर, तो तुमच्या आत्म्याचा केवळ एक छोटासा बहिर्वर्ती भाग असतो, – परंतु तुम्ही त्याच्याशी स्वतःला अभिन्न मानल्यामुळे सगळी अडचण येत आहे. तुम्ही तुमच्या उर्वरित अस्तित्वामध्ये, म्हणजे जे अधिक खरे, अधिक अंतर्मुख आहे, जे ‘सत्या’प्रत खुले आहे अशा अस्तित्वामध्ये राहण्यास शिकले पाहिजे. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची शारीर-चेतना ही एक बाह्य गोष्ट आहे, आणि तिच्यावर खऱ्या चेतनेच्या माध्यमाद्वारे कार्य करता येणे आणि तिच्यामध्ये ‘दिव्य शक्ती’द्वारे परिवर्तन घडविता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 371, 370)

साधना, योग आणि रूपांतरण – २७४

शरीराचे रूपांतरण

व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक सर्वसाधारण अडचण असते. जडभौतिक प्रकृती ही संथ, सुस्त आणि परिवर्तनासाठी अनिच्छुक असते. ढिम्म राहणे आणि अल्पशा प्रगतीसाठी दीर्घ काळ लावणे ही तिची प्रवृत्ती असते. अतिशय दृढ मानसिक किंवा प्राणिक किंवा आंतरात्मिक संकल्पालासुद्धा या जडतेवर मात करणे अतिशय अवघड जाते. वरून सातत्याने चेतना, शक्ती आणि प्रकाश खाली उतरवीत राहिल्यानेच या जडतेवर मात करता येणे शक्य असते. त्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीकडे सातत्यपूर्ण संकल्प व आस असणे आवश्यक असते. आणि शारीर-प्रकृतीने अतीव प्रतिकार केला तरी त्या प्रतिकारामुळे थकून जाणार नाही असा स्थिर आणि चिवट संकल्प असणे आवश्यक असते.

*

गहनतर शांती इत्यादीचा अभाव हे जडभौतिक नकाराचे मूळ स्वरूपच आहे आणि हा जडभौतिक नकारच जगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे अस्तित्व नाकारण्याचा समग्र पाया असतो. जडभौतिकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टी चिवट, हटवादी असतात आणि त्यांच्यामध्ये जडत्व आणि नकाराची प्रचंड ताकद असते. त्या गोष्टी जर तशा नसत्या तर साधना अतिशय लवकर पूर्ण झाली असती. शारीर-प्रतिकाराच्या या स्वभावधर्माला तुम्हाला सामोरे जावेच लागते आणि तो प्रतिकार कितीही वेळा उफाळून आला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा मात करावीच लागते. पृथ्वी-चेतनच्या रूपांतरणासाठी ही किंमत मोजावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359, 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५०

मानसिक रूपांतरण

शंकाकुशंकांना नकार देणे म्हणजे स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळविणे, हे (तुमचे) म्हणणे निश्चितच योग्य आहे. योगसाधनेसाठी व्यक्तीने आपल्या शरीराच्या हालचालींवर किंवा स्वतःच्या प्राणिक इच्छावासनांवर, आवडीनिवडींवर नियंत्रण मिळविणे जितके आवश्यक असते, तेवढेच विचारांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. परंतु, हे नियंत्रण फक्त योगसाधनेसाठीच आवश्यक असते असे मात्र नाही. एखाद्याचे जर स्वतःच्या विचारांवर नियंत्रण नसेल, तो जर त्या विचारांचा साक्षी, अनुमन्ता, ईश्वर नसेल, तर तो मनुष्य पूर्णपणे विकसित झालेला मनोमय पुरुष आहे असे म्हणता येणार नाही.

इच्छावासना आणि आवेगांच्या वादळामधील सुकाणूविना होडी बनणे जसे योग्य नाही किंवा शरीराच्या जडत्वाचे किंवा आवेगांचे गुलाम बनणे जसे योग्य नाही तसेच व्यक्तीच्या मनोमय पुरुषाने बेलगाम आणि अनियंत्रित विचारांचा टेनिसचा चेंडू होणे हे सुद्धा योग्य नाही. मला हे माहीत आहे की, ही गोष्ट अधिक अवघड आहे कारण मनुष्य हा मूलतः मानसिक प्रकृतीचा प्राणी असल्याने तो मनाच्या गतिप्रवृत्तींशी स्वतःला एकरूप करतो आणि त्यामुळे तो स्वतःला एकाएकी त्या मनापासून अलिप्त करू शकत नाही आणि मनरूपी भोवऱ्याच्या गरगर फिरण्यापासून स्वतःला मुक्तही करू शकत नाही. शरीरावर किंवा शरीराच्या हालचालींच्या काही विशिष्ट भागावर नियंत्रण मिळविणे हे मनुष्याला तुलनेने सोपे असते. प्राणाच्या आवेगांवर आणि इच्छावासनांवर मनाद्वारे नियंत्रण मिळविणे हे काहीसे अवघड असले तरीही काहीशा संघर्षानंतर, ते शक्य असते. परंतु एखादा तांत्रिक योगी नदीच्या पाण्यावर (ध्यानस्थ) बसतो त्याप्रमाणे विचाररूपी भोवऱ्यावर आरुढ होणे हे काही तितकेसे सोपे नाही. असे असले तरीही ते करता येणे शक्य असते.

जी माणसं सर्वसामान्य माणसांच्या पुढे गेलेली असतात अशा सर्व विकसित मानसिक स्तरावरील माणसांना या ना त्या प्रकारे किंवा किमान काही विशिष्ट वेळी आणि काही विशिष्ट हेतुंसाठी मनाच्या दोन भागांना विलग करावे लागते; विचारांचा जणू कारखानाच असणारा असा मनाचा सक्रिय भाग आणि त्याच वेळी साक्षी असणारा, संकल्प करणारा, विचारांचे निरीक्षण करणारा, त्यांचे निर्णयन करणारा, त्यांना नकार देणारा, त्यांना वगळणारा, त्यांना स्वीकारणारा, त्यांच्यामध्ये सुधारणा आणि बदल घडवण्याची आज्ञा देणारा असा मनाचा एक (विचारांवर) प्रभुत्व बाळगणारा अविचल भाग असतो. तो मनाच्या निवासस्थानाचा स्वामी असतो, तो साम्राज्य उभारण्यासाठी सक्षम असतो.

योगी याच्याही अजून पुढे जातो. तो फक्त तेथीलच स्वामी असतो असे नव्हे तर तो मनामध्ये असतानाही, एक प्रकारे, मनातून जणू बाहेर पडतो आणि तो त्या मनाच्या वर उभा ठाकतो किंवा त्याच्यापासून मागे हटतो आणि (अशा प्रकारे तो) त्या मनापासून मुक्त होतो. आणि मग अशा योग्याच्या बाबतीत विचारांचा कारखाना ही प्रतिमा पुरेशी योग्य ठरत नाही. कारण विचार बाहेरून, वैश्विक मनाकडून किंवा वैश्विक प्रकृतीकडून आत येत असताना तो पाहतो. कधी ते विचार आकार धारण करून येतात आणि सुस्पष्ट असतात, तर कधीकधी ते विचार आकारविहीन असतात आणि ते आपल्यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मग त्यांना आकार देण्यात येतो. या विचारतरंगांना (त्याचबरोबर प्राणिक लाटांना, सूक्ष्म शारीरिक ऊर्जेच्या लाटांनासुद्धा) नकार देणे किंवा त्यांचा स्वीकार करणे या दोन्हीपैकी कोणतातरी एक प्रतिसाद देणे किंवा परिसरीय ‘प्रकृती’तील विचारद्रव्याला किंवा प्राणिक गतिविधींना वैयक्तिक-मानसिक रूपाकार देणे हा मनाचा मुख्य उद्योग असतो.

हे सारे मला श्री. विष्णू भास्कर लेले यांनी दाखवून दिले आणि म्हणून मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. ते म्हणाले, “ध्यानाला बसा, परंतु विचार करू नका, नुसते मनाकडे पाहत राहा. तुम्हाला असे दिसेल की विचार आतमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना हद्दपार करा. तुमचे मन पूर्णपणे निश्चल-नीरव होईपर्यंत हे असे करत राहा.” विचार असे बाहेरून दृश्यरूपात मनामध्ये प्रवेश करतात हे मी त्यापूर्वी कधी ऐकले नव्हते परंतु त्याच्या सत्यतेबद्दल किंवा त्याच्या शक्यतेबद्दल शंका घ्यावी असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही, मी ध्यानाला बसलो आणि त्यांच्या सांगण्याबरहुकूम तसे केले. उंच गिरीशिखरांवर निर्वात हवा असावी त्याप्रमाणे माझे मन क्षणार्धात निश्चल-नीरव झाले. आणि तेव्हा मला असे दिसले की एका पाठोपाठ एक विचार बाहेरून मनात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत. मात्र त्यांनी आत प्रवेश करून, माझ्या मेंदूचा ताबा घेण्यापूर्वीच मी त्यांना बाहेरच्या बाहेरच घालवून देत होतो आणि अशा रीतीने मी तीन दिवसातच विचारमुक्त झालो.

आणि तत्त्वतः त्या क्षणापासून माझ्यामधील मनोमय पुरुष जणू मुक्त बुद्धीच झाला होता, तो म्हणजे जणू एक वैश्विक मनच झाले होते. तो आता विचारांच्या कारख्यानात काम करणाऱ्या कामगारासारखा स्वतःच्या संकुचित वर्तुळापुरताच मर्यादित राहिला नव्हता तर, आता तो व्यक्तित्वाच्या शेकडो प्रांतांमधून ज्ञान ग्रहण करणारा झाला होता. दृश्याच्या आणि विचाराच्या साम्राज्यामधून त्याला वाटेल त्याची निवड करण्यास आता तो मुक्त झाला होता. मनोमय पुरुषाच्या संभाव्यता या मर्यादित नसतात आणि तो स्वतःच्या घराचा स्वामी आणि मुक्त साक्षी होऊ शकतो, हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठीच मी याचा उल्लेख केला आहे.

मी या निर्णायक गतिविधींबाबतीत जी त्वरा केली त्याच त्वरेने, आणि ज्या पद्धतीचा अवलंब केला त्याच मार्गाचा अवलंब सर्वजण करू शकतात, असे मला म्हणायचे नाही. (अर्थात, या नवीन बंधनमुक्त अशा मानसिक शक्तीचा संपूर्ण विकास होण्यासाठी मला काही वर्षे लागली.) ज्या व्यक्तीपाशी श्रद्धा असते आणि प्रयत्न करण्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला मनावर स्वामित्व मिळविणे आणि प्रगमनशील स्वातंत्र्य मिळविणे या गोष्टी शक्य असतात.

– श्रीअरविंद (CWSA 24 : 1257-1258)