Tag Archive for: साधना

श्रीमाताजी आणि समीपता – २२

साधक : माझी चेतना ही फक्त श्रीमाताजींच्या हृदयावर स्थिरावलेली आहे, जणू काही ती चेतना त्यांच्यामध्येच वसत असावी आणि त्यांच्याशी एकात्म पावलेली असावी. ती केवळ श्रीमाताजींशी एकत्व पावण्याचाच विचार करत असते, ती म्हणते, “मी त्यांच्यामध्ये वसत आहे, आणि माझी वसती तेथेच असली पाहिजे. मला एवढेच पुरेसे आहे, मला त्याव्यतिरिक्त अन्य काहीच नको.” माझी चेतना या विचारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विचारांना थाराच देत नाही, अगदी उच्चतर किंवा आध्यात्मिक विचारांनासुद्धा त्यामध्ये थारा नाही. या माझ्या भूमिकेकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता?

श्रीअरविंद : साधारणपणे, आंतरिक अस्तित्व आणि चैत्य अस्तित्व (psychic) जागृत करण्यासाठी ही भूमिका ठीक आहे. परंतु तुम्हाला जर उच्चतर अनुभव आलाच तर त्याला मात्र अडवू नका.

*

साधक : श्रीमाताजींच्या प्रेमाचा भौतिक आविष्कार जेव्हा माझ्या अनुभवास येत नाही, तेव्हा मी विचलित होतो.

श्रीअरविंद : प्रेमाच्या भौतिक आविष्काराची ही अपेक्षा नाहीशी झालीच पाहिजे. साधनेच्या मार्गावरील हा एक घातक असा अडथळा आहे. अशा अपेक्षेची पूर्ती व्हावी म्हणून जी प्रगती घडून येते ती असुरक्षित असते, आणि ज्या शक्तीने ही अपेक्षा निर्माण केलेली असते त्या शक्तीकडून ती प्रगती कोणत्याही क्षणी फेकून दिली जाऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 470, 474)

श्रीमाताजी आणि समीपता – २१

साधक : मला नेहमीच असे आढळून आले आहे की, जेव्हा जेव्हा दिव्यत्वाबद्दल एक प्रकारचे आंतरिक प्रेम उफाळून वर येते तेव्हा डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागतात.

श्रीअरविंद : ते भक्तीचे आंतरात्मिक (psychic) अश्रू असतात.

*

साधक : (थोडे दिवसांसाठी आश्रमात वास्तव्यास आलेल्या) एक साधिका आज आश्रमातून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. जेव्हा श्रीमाताजींच्या दर्शनाचा कार्यक्रम संपला आणि श्रीमाताजी जिन्याने वर जाऊ लागल्या, तेव्हा त्या साधिका रडू लागल्या. काही काळासाठी त्यांचे चैत्य अस्तित्व (psychic) अग्रभागी आल्याचा परिणाम म्हणून त्या रडू लागल्या असाव्यात का?

श्रीअरविंद : चैत्य अस्तित्व अग्रभागी येण्याशी अथवा न येण्याशी याचा काही संबंध नाही. त्यांचे चैत्य अस्तित्व जागृत झालेले आहे आणि आंतरिक स्तरावर त्या श्रीमाताजींच्या दीर्घकाळपासून संपर्कात आहेत.

*

साधक : श्रीमाताजींच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा माझी चेतना निःस्तब्ध आणि रोमांचित झाली होती. तो एक अद्भुत अनुभव होता आणि त्यामुळे माझा चैत्य पुरुष अग्रभागी आला. माझी काया अशा रीतीने रोमांचित का झाली आणि काही काळासाठी माझा देह असा स्तब्ध का झाला?

श्रीअरविंद : अर्थातच, श्रीमाताजींच्या उच्च स्तरावरून होणाऱ्या स्पर्शामुळे तुमची काया रोमांचित झाली होती आणि त्या स्पर्शाचे अस्तित्व अंतरात्मा आणि प्राण या दोघांनाही एकत्रिपणे जाणवले.

*

साधक : चैत्य पुरुष (psychic being) पूर्णतः अग्रभागी येण्याआधी अंतःकरणातील चैत्य अस्तित्वाच्या माध्यमातून श्रीमाताजींशी सचेत संपर्क साधणे शक्य आहे का?

श्रीअरविंद : हो. शक्य आहे. चैत्य अस्तित्व नेहमीच तेथे असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)

श्रीमाताजी आणि समीपता – २०

साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या सन्निध आहे, जणू काही आम्हा दोघांमध्ये काही द्वैतभावच शिल्लक राहिलेला नाहीये. पण हे कसे शक्य आहे? कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये केवढी मोठी दरी आहे? मी मानसिक स्तरावर आहे आणि त्या तर अत्युच्च अतिमानसिक (Supramental) स्तरावर आहेत.

श्रीअरविंद : श्रीमाताजी या फक्त अतिमानसिक स्तरावरच नाहीत तर त्या सर्व स्तरांवर असतात. आणि विशेषतः त्या आंतरात्मिक भागामध्ये (अंतःकरणामध्ये) सर्वांच्या अगदी निकट असतात, आणि म्हणून जेव्हा तो भाग खुला होतो तेव्हा साहजिकपणे ही निकटतेची भावना जागी होते.

*

साधक : मी ज्या ज्या वेळी श्रीमाताजींचे दर्शन घेतो त्या प्रत्येक वेळी मला प्रेम आणि आनंद का जाणवत नाही?

श्रीअरविंद : प्रेम आणि आनंद या गोष्टी अंतरात्म्याच्या (psychic) अग्रभागी येण्यावर अवलंबून असतात.

*

साधक : दोन दिवस माझ्या मनात श्रीमाताजींबद्दल आणि तुमच्याबद्दल अगदी उत्कट प्रेम दाटून आले होते, माझे संपूर्ण अस्तित्व त्या प्रेमाने भारून गेले होते. आणि नंतर मात्र त्याचा परिणाम अंशतःच टिकून राहिला. म्हणजे तुमच्याबद्दल आणि श्रीमाताजींबद्दल उत्कट आणि अपार आदर आणि कोणत्याही ऐहिक सुखाने मिळणार नाही असा आनंद तेवढा शिल्लक राहिला.

श्रीअरविंद : अर्थातच तो आनंद आंतरात्मिक (psychic) होता.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 467-468)

श्रीमाताजी आणि समीपता – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधक : श्रीमाताजींच्या नुसत्या दर्शनानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव (psychic feeling) आहे.

साधक : श्रीमाताजींच्या स्मरणानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.

साधक : श्रीमाताजींच्या विरोधात कोणी काही बोललेले ऐकले की काळजाला घरं पडतात, ही कोणत्या प्रकारची भावना आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.

साधक : श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या खूप दूर असूनसुद्धा, श्रीमाताजींचे अस्तित्व हृदयामध्ये अनुभवास येते, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे?

श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे.

साधक : मी आंतरात्मिक प्रेमाच्या पूर्ण स्थितीमध्ये आहे हे मला कसे जाणता येईल?

श्रीअरविंद : अहंकाराचे अस्तित्व नसणे, शुद्ध भक्ती, आणि ईश्वराप्रति शरणागतता आणि समर्पण यांद्वारे ते जाणून घेता येईल.

*

साधक : जेव्हा सारे काही स्थिर, आणि शांत असते तेव्हा मला माझ्या हृदयात खोलवर असे काहीतरी अनुभवास येते, अंतरंगातून सातत्याने सर्वांसाठी समानतेने एक प्रकारची अतिशय मधुर अशी भावना उचंबळून वर येते. आणि ती सातत्याने श्रीमाताजींपाशी जाऊन पोहोचते. ईश्वराबरोबर असलेल्या एका मधुर नात्याची जाणीव त्यामध्ये असते. त्यामुळे माझे संपूर्ण अस्तित्व अगदी मृदुमुलायम होऊन जाते; ते स्थिरचित्त, शांत, मधुर शांतीने आणि समाधानाने भरून जाते.

श्रीअरविंद : याला म्हणतात ‘आंतरात्मिक प्रेम’! (psychic love.)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 466-467)

श्रीमाताजी आणि समीपता – १७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

श्रीमाताजींचे प्रेम सदोदित असतेच आणि त्यांच्या प्रेमापुढे मानवी प्रकृतीच्या अपूर्णतांचा पाडावच लागू शकत नाही. एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे, तुम्हाला ते प्रेम सदोदित मिळत असल्याची जाणीव असणे आवश्यक असते. तुमचा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येण्यासाठी ती गोष्ट आवश्यक असते कारण त्या चैत्य पुरुषाला त्याची जाण असते; मन, प्राण आणि शरीर हे घटक फक्त बाह्य वरवरच्या दृष्यांकडे पाहत असतात आणि ते त्या दृष्यांचा चुकीचा अर्थ लावतात. आणि असे होऊ नये म्हणून श्रीमाताजींची शक्ती कार्यरत असते.

जेव्हा जेव्हा तुमचा चैत्य पुरुष पृष्ठभागाजवळ आलेला होता तेव्हा तेव्हा तुम्हाला श्रीमाताजींच्या प्रेमाची आणि त्यांच्या समीपतेची जाणीव झाली होती. परंतु तुमच्या इतर भागांनाही तीच जाणीव होण्यासाठी, तसाच अनुभव येण्यासाठी त्या भागांचीही तयारी होणे आवश्यक असते आणि त्यासाठी वेळ लागतो. म्हणून धीर धरणे आवश्यक असते. साधनेमध्ये कितीही अडीअडचणी आल्या, दिरंगाई झाली तरी त्या सर्व गोष्टींमधून मार्ग काढत, श्रीमाताजी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्या तुम्हाला त्यांच्या परमधामी घेऊन जाणार आहेत याची खात्री बाळगणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481)

श्रीमाताजी आणि समीपता – १६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच तुमच्या प्रकृतीचे मुख्य सारथी बनते. आणि त्याचबरोबर इतरांविषयी एक प्रकारची सद्भावना, सुसंवाद, दयाळूपणा किंवा आत्मीयता या भावनासुद्धा उदयाला येतात.

श्रीमाताजींची बालके असणाऱ्या सर्वच जिवांशी आपल्या आत्म्याचे जे आंतरिक नाते असते त्याचा हा परिणाम असतो आणि त्यामुळे त्यामध्ये (व्यक्तीचे) वैयक्तिक असे काही नसते. या आंतरात्मिक भावनेमध्ये काही अपाय नाही, उलट ती भावना संतोष आणि सुसंवाद निर्माण करते. आंतरात्मिक भावनेमुळे अंतरात्म्याचे श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये विकसन होण्यास साहाय्य लाभते आणि त्यामुळे कार्यालाही हातभार लागतो तसेच आंतरिक जीवन वृद्धिंगत होण्यासदेखील मदत होते.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारे प्राणिक प्रेम (vital love) तेवढे नाकारले पाहिजे कारण ते प्रेम ‘ईश्वरा’प्रति करायच्या पूर्ण आत्म-निवेदनापासून (consecration) व्यक्तीला दूर नेते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)

श्रीमाताजी आणि समीपता – १५

माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या तथाकथित प्रेमाचा अंशभागसुद्धा मिसळलेला असता कामा नये. ईश्वराबद्दलचे खरे प्रेम म्हणजे आत्मदान (self-giving) असते, ते निरपेक्ष असते, ते शरणागती आणि समर्पण यांनी परिपूर्ण असते; ते कोणताही हक्क सांगत नाही, ते कोणत्याही अटी लादत नाही, कोणताही व्यवहार करत नाही; मत्सर, अभिमान किंवा क्रोधाच्या हिंसेमध्येही सहभागी होत नाही कारण या गोष्टी मूलतःच सामान्य प्रेमामध्ये नसतात.

खऱ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून, ‘दिव्य माता’ स्वतःच तुमची होऊन जाते, अगदी मुक्तपणे! अर्थात हे सारे आंतरिकरित्या घडत असते. तिची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये जाणवते; तिची शक्ती तुमचे दिव्य प्रकृतीमध्ये पुनःसृजन करत असल्याचे तुम्हाला जाणवते; ती तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या वृत्ती-प्रवृत्ती हाती घेऊन त्यांना पूर्णत्वप्राप्तीचे आणि कृतार्थतेचे वळण देत असल्याचे तुम्हाला जाणवते; तिचे प्रेम तुम्हाला कवळून घेत आहे आणि आपल्या कडेवर घेऊन ती तुम्हाला ईश्वराच्या दिशेने घेऊन चालली आहे, असे तुम्हाला जाणवू लागते. या गोष्टींचा अनुभव यावा आणि अगदी जडभौतिकापर्यंत तुमचे सर्वांग तिने व्यापून टाकावे अशी आस तुम्ही बाळगली पाहिजे. आणि येथे काळाची किंवा पूर्णतेची कोणतीच मर्यादा असत नाही. एखादी व्यक्ती जर खरोखरच तशी आस बाळगेल आणि तिला ईप्सित ते साध्य होईल तर, तेथे अन्य कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही वगैरे गोष्टींना वावच उरणार नाही. व्यक्ती जर खरोखर तशी आस बाळगेल तर तिला ते निश्चितपणे प्राप्त होते, व्यक्तीचे जसजसे शुद्धीकरण होत जाईल आणि तिच्या प्रकृतीमध्ये आवश्यक असणारा बदल जसजसा होत जाईल तसतसे तिला ते अधिकाधिक प्राप्त होते.

कोणत्याही स्वार्थी हक्काच्या आणि इच्छांच्या मागण्यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; तसे ते झाले तर तुम्हाला असे आढळेल की, तुम्ही जेवढे पेलू शकता, आत्मसात करू शकता तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 461)

श्रीमाताजी आणि समीपता – १४

तुम्हाला जर सदोदित श्रीमाताजींच्या संपर्कात राहायचे असेल तर निराशेमधून, औदासिन्यातून आणि त्यामधून ज्या मानसिक कल्पना तुम्ही करत राहता, त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घेतली पाहिजे. त्यापेक्षा अन्य कोणतीच गोष्ट मार्गामध्ये इतका अडथळा निर्माण करणारी असत नाही.
*
कोणालाही दुसऱ्याविषयी किंवा दुसऱ्या गोष्टीबाबत मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही; कारण सर्वांना श्रीमाताजी व श्रीअरविंदांचा जो संपर्क लाभतो त्याव्यतिरिक्त, त्या दोघांशी संपर्क साधण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून एक कारण असते, ते अन्य कोणाकडेच नसते.
*
तुम्ही जर ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेच्या संपर्कात राहिलात तर तो संपर्कच तुम्हाला सर्व खऱ्या अभीप्सांच्या पूर्ततेप्रत आणि सर्व आवश्यक त्या साक्षात्कारांप्रत घेऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459, 459, 457)

श्रीमाताजी आणि समीपता – १३

साधक : एखादी व्यक्ती जर स्वतःच्या अंत:करणामध्ये डोकावून पाहील तर तिथे व्यक्तीला निश्चितपणे श्रीमाताजींचे स्मितहास्य आढळून येईल. असे असताना मग हृदयातून बाहेरच का पडायचे आणि त्यांचे स्मितहास्य बाहेर शोधत का हिंडायचे?

श्रीअरविंद : अंतरंगामध्ये राहणे आणि अंतरंगामध्ये राहून, भौतिक जीवनाला नवीन आकार देणे हे आध्यात्मिक जीवनाचे पहिले तत्त्व आहे. परंतु बरेच जण बाह्य गोष्टींमध्येच रममाण होण्यावर भर देतात, त्यामुळे त्यांचे श्रीमाताजींशी असलेले नाते हे आध्यात्मिकीकरण न झालेल्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या सामान्य प्रतिक्रियांनीच संचालित होत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453)

श्रीमाताजी आणि समीपता – १२

साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे नातेसंबंध तोडण्याची माझी तयारी आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते कृपा करून मला सांगाल का? श्रीमाताजींनी मला आंतरिकरित्या आणि बाह्यतः देखील साहाय्य करावे, अशी माझी प्रार्थना आहे.

श्रीअरविंद : तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे, केवळ त्यांच्याकडेच वळले पाहिजे, हीच त्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी पूरक ठरावे म्हणूनच केवळ बाहेरचे अतिरिक्त संपर्क टाळणे आवश्यक असते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे हे अभिप्रेत नाही किंवा त्याची आवश्यकही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती हीच की, तुम्ही स्वतःला पूर्णपणे बहिर्मुख न होऊ देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनिशी भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याशी वागले पाहिजे; त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459)