अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

श्रीमाताजी